आपले महापुरुष’ या पुस्तकाचे प्रकाशन संपन

35

✒️सिद्धार्थ वाठोरे(हदगाव-नांदेड,प्रतिनिधी)मो:-9373868284

नांदेड(दि.28नोव्हेंबर):-समाज प्रकाशन, नांदेड व्दारा प्रकाशित प्रातिनिधिक लेखसंग्रह ‘आपले महापुरुष’ पुस्तक या पुस्तकाचा प्रकाशन कार्यक्रम दि. २६ नोव्हेंबर २०२१ रोजी मोठ्या उत्साहात आंबानगर नांदेड येथे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बामसेफचे वरिष्ठ कार्यकर्ते व्ही. एच. गायकवाड होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय गुरू रविदास समता परिषेदेचे राष्ट्रीय अध्यक्ष इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर आणि बारामतीचे अर्थशास्त्राचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. भिमराव मोरे यांची उपस्थिती होती.

पुस्तकाचे प्रकाशन हिराबाई वाठोरे, सरस्वताबाई गोखले आणि विठ्ठलराव रणवीर यांच्या हस्ते झाले. यावेळी समाज प्रकाशनच्या प्रकाशक विजयमाला वाठोरे यांची उपस्थिती होती.छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करून या कार्यक्रमाला सुरवात झाली. कार्यक्रमाच्या प्रारंभी भालचंद्र वाठोरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी ‘माणसांनी माणसाशी माणसासम वागणे’ हे आरंभ गीत सादर केले.या प्रकाशन कार्यक्रमाला केडगाव जि. पुणे येथील उत्तम कांबळे, अतिग्रेच्या प्रांजली रमेश खबाले, तळवडे ता. हवेली येथून जयद्रथ आखाडे, किनवट येथील महेंद्र नरवाडे, प्रा प्रदीप एडके, बारामतीचे सूर्यकांत भालेराव, चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती येथील शंतनू कांबळे आणि डोंगरकड्याचे बी. सी. पाईकराव यांची उपस्थिती होती.

यावेळी उपस्थित वक्त्यांनी ‘आपले महापुरुष’ या पुस्तकाविषयी आपले विचार मनोगत व्यक्त केले. या पुस्तकात २२ महापुरुषांवर २२ लेखकांचे २२ लेख आहेत, म्हणजे हा एक ऐतिहासिक खजिनाच आहे. आपल्या देशाची जगात जातीप्रधान देश म्हणून ओळख आहे. या जाती तोडून समाज जोडण्याचा विचार आपल्या महापुरुषांनी दिला परंतु आपण आपल्या महापुरुषांना पुन्हा जातीत बंदिस्त आणि विभाजित करीत आहोत. पुन्हा आपल्या देशात पूर्वीचे सोन्याचे दिवस येण्यासाठी या पुस्तकातील आपल्या महापुरुषांचे विचार वाचावे आणि स्वीकारावे लागतील. हे पुस्तक शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांना मोलाचे ठरेल अशा प्रतिक्रिया अनेकांनी यावेळी व्यक्त केल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी बी. वाय. जगताप यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय वाठोरे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. भारत वाठोरे यांनी केले.