पेन्शन संघर्ष यात्रा वडवणीत येणार सर्व कर्मचाऱ्यांनी यात्रेच्या स्वागतासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन

    41

    ✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

    वडवणी(दि.१ नोव्हेंबर):-२००५ नंतर शासकीय सेवेत दाखल झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी मुंबई येथील आझाद मैदान या ठिकाणाहून सुरु झालेल्या पेन्शन संघर्ष यात्रा ही आज दि.१ डिसेंबर २०२१ बुधवार रोजी वडवणी शहरात येणार असून याप्रसंगी दुपारी ठीक १ वाजता तहसील कार्यालयासमोरील व पेट्रोल पंपासमोरील छत्रपती संभाजी महाराज चौकात वडवणी तालुक्यातील सर्व डीसीपीएस व एनपीएस कर्मचाऱ्यांनी यात्रेच्या स्वागतासाठी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक १ नोव्हेंबर २००५ नंतर शासकीय सेवेत दाखल झालेल्या सर्व शासकीय/निमशासकीय/अशासकीय कर्मचाऱ्यांना शासनाने डीसीपीएस व एनपीएस ही नविन पेन्शन योजना लागू केलेली आहे. सदरील दोन्ही नविन पेन्शन योजना शासनाने स्वतःच्या फायद्याकरिता कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक पध्दतीने लादलेल्या आहेत. तरी ही नविन पेन्शन योजना रद्द करुन सर्व कर्मचाऱ्यांना पूर्वीचीच जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीकरिता महाराष्ट्र राज्यातील तब्बल ७२ संघटनांनी एकत्रित येत एक समन्वय समिती स्थापन केली असून या समन्वय समितीच्या वतीने मुंबई येथील आझाद मैदानातून दिनांक २२ डिसेंबर २०२१ रोजीपासून पेन्शन संघर्ष यात्रा संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये निघालेली आहे. सदरील पेन्शन संघर्ष यात्रा ही आज दि.१ डिसेंबर २०२१ रोजी आपल्या बीड जिल्ह्यामध्ये दाखल होत असून या अनुषंगाने या यात्रेच्या स्वागतासाठी वडवणी तालुक्यातील सर्व डीसीपीएस व एनपीएस कर्मचारी बांधवांनी व भगिनींनी मोठ्या संख्येने वडवणी शहरातील तहसील कार्यालयासमोरील व पेट्रोल पंपासमोरील छत्रपती संभाजी महाराज चौकात दुपारी ठीक १ वाजता उपस्थित राहून या पेन्शन संघर्ष यात्रा व आपल्या सहकारी बांधवांना पाठबळ द्यावे असे आवाहन वडवणी तालुका डीसीपीएस व एनपीएस कर्मचारी बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच ही पेन्शन संघर्ष यात्रा बीड या ठिकाणी पोहोचल्यानंतर बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह याठिकाणी भव्य अशा पेन्शन मेळाव्याचेही आयोजन करण्यात आलेले असून या पेन्शन मेळावा कार्यक्रमासही संपूर्ण बीड जिल्ह्यातील कर्मचारी बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहनही जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समितीच्या वतीने विष्णू आडे यांनी केले आहे.