स्वप्नंही बेईमान झालीत!

25

प्रिय……
पत्राच्या रीतीरिवाजाप्रमाणे तुला विचारताे, ‘ कशी आहेस तू!’ – रागावलीस ना? पण मी तरी काय करणार.तुझ्या ह्रुदयाचं दार तू बंद करुन टाकलंस.तुझ्या घराच्या फाटकातही आता तुझा नकार ऊभा आहे.ताे मला आत कसा येऊ देईल? वर्तमानकाळाच्या पारदर्शक पडद्यातुन अनेकदा पाराेसा भुतकाळ आठवताे.त्यातील प्रत्येक क्षण तनामनात मुसंडी मारताे.आपली प्रत्येक भेट मनाला घट्ट मिठी मारते.त्या भेटीत एक चेहरा असताे.ताे तुझा असताे .मग भावनिक कल्लाेळाचा हातभर पसारा आणखीच अशांत हाेताे.टीचभर छातीतील भावनिक कल्लाेळाच्या हातभर पसार्यापुढे माझं काही चालत नाही.त्यामुळे शब्दांना आेळीत बसविण्याशिवाय दुसरा उपाय नाही,म्हणूनच हा पत्राचार…तुला आठवतं,आपल्या शब्दांची भेट हाेण्यापुर्वी आपली नजरभेट झाली हाेती.आता वाटतं नजरभेटच बरी हाेती.ती लाजाळू हाेती.प्रामाणिक हाेती.आपले शब्द निर्लज्ज आणि बेईमान झालेत.शब्द तुझे की माझे या वादात आपण पडण्यात अर्थ नाही. एक दिवस सायंकाळचा ऊदास संधीप्रकाश ढगांतुन झीरपत झीरपत जातांना, ‘ मँडम,माझं तुमच्यावर प्रेम आहे.

‘ असं मी बाेलुन गेलाे.पण तुझे शब्द जणू संपावर गेले हाेते.दाेन दिवसांनी शब्दांचा संप मिटला तेव्हा तुझा हाेकार आेठांचा उंबरठा आेलांडुन आला.मी आनंदुन गेलाे.पण अल्पावधीत त्या आनंदाला ग्रहण लागलं.अल्पावधीत आपल्या मनाचं मिलन झालं आल्पावधीतच घटस्फाेटही झाला.तू वचन दीलंस, ‘ तुमच्याशिवाय दुसर्या कुणाची हाेणार नाही.मी तुमच्याशीच लग्न करेन.’ पण आणाशपथांवर ऊभारलेल्या आपल्या प्रेमाचा पाया एका शंकेच्या झुळकीनं ढासळला.तुझ्या घरच्या नकाराने ढासळला.प्रेम ईतकं ठीसुळ असतं का? साँक्रेटीस क्रायटाेला नेहमी सांगायचा,’ शब्द हे शस्त्र आहे.जपून वापर.’ तुला शब्द बराेबर वापरता आले नाही,की मला त्या शब्दांचा गर्भित आशय कळला नाही? मी गरिब आहे हे काय तुला माहीत नव्हतं? एकावरएक असे अनेक फाेड हातावर येईपर्यंत काम करायचाे हे तुला सांगितलं तेव्हा तुला अश्रू आवरता आले नाही. माझं दुःख कुणीतरी समजुन घेणारी मिळाली म्हणुन आनंद झाला. त्या भरात मी म्हटलं हाेतं, ‘ तुझ्या कुशीत मान घालुन मला फक्त एकदाच मनसाेक्त रडायचं आहे.दुःख हलकं करुन घ्यायचं आहे.मग तुझ्याच पदराने अश्रू पुसुन कधिही न रडण्याची शपथ घ्यायची आहे.’ हे बाेलतांना माझ्या डाेळ्यांतुन अनवरत पाऊसधारा काेसळू लागल्या.तुझेही डाेळे अश्रुंनी भरलेले हाेते.न थांबणार्या अश्रुंनी.त्यात मला अतुट प्रेमाचा विश्वास दीसला.तुझ्या बहीणीनेही मैत्रिणीला जीजाजी असा परिचय करून दीला तेव्हा शंकेला जागाच ऊरली नाही.

चारचार तास आपण बसायचाे.तू मंत्रमुग्ध हाेऊन ऐकायचीस.मजेनं मी म्हणायचाे,’ पंख छाटुन तू जाणार असशील तर हा माेत्यांचा चारा भरवू नकाे.हा अंधार चिरुन उजेड देता येत नसेल तर प्रकाशाचा एक किरण दाखवू नकाेस. ‘ तू गाेड हसायचीस. असं काही घडणार नाही अशी ग्वाही मिळायची.त्यामुळे प्रेमावरचा माझा विश्वास वाढत जायचा.तुझ्या घरच्या लाेकांची आर्थिक स्थिती माफक म्हणून शक्य हाेईल तेवढी मदत करण्याचा मी प्रयत्न करेन,असं वचऩही दीलं……..
एक दिवस अचानकच तुझं पत्र नकार घेऊन थडकलं.नकाराच्या सीमारेषपलीेकडे गेलेला तुझा हाेकार आठवला तर विश्वासच बसला नाही.पण लेखी नकार माझ्याकडे डाेळे वटारुन बघत हाेता.त्यामुळे सत्य स्विकारावं लागलं.तू आणाशपथा घेतांना एखादा साक्षीदार असता तर तुझ्या नकाराशी माझी चांगलीच हातापाई झाली असती.पण काही वेळाने थंड डाेक्याने विचार केला तर वाटलं,आपण आपल्या काही दिवसांच्या भेटींना,त्यातील नाजूक क्षणांना प्रेम असं नाव दीलंय.पण माझ्यापेक्षा तुझ्या आईबाबांचाच जास्त अधिकार आहे.तू त्यांच्या मर्जीप्रमाणेच लग्न कर.नवा संसार थाट.डाेळ्यांत अश्रुंची गर्दी आणुन मी तुला शुभकामना देईन.तू माझी झाली नाहीस हे दुःख मला पहाडासारखं वाटेल.वेदना साेसण्याचं बळ आहे म्हणून काय चारही बाजूंनी वेदनांचाच मारा व्हावा?काही अंत असावा की नकाे?? एक धागा सुखाचा स्वतःभाेवती गुंफायचा म्हटलं तर ताेही मनाच्या आेढताणीत लगेच तुटुन गेला.पण सुख,दुःख,चांगले वाईट,आणि असे अनेक शब्द माणसाचे नातेवाईक असतात हे तत्वध्न्यान मला माहीत आहे.

म्हणून दुःखासाठी आकांत आक्राेश करायचं मी साेडुन दीलंय.त्यामुळेच तू दुसरीकडे संसार थाटते आहेस हा आनंदही कमी नाही.तू घेतलेल्या शपथेच्या बंधनातून तुला मुक्त करीत आहे.तू शपथ घेत राहीलीस.देत राहीलीस.पण आता तुला शपथेच्या बंधनात जखडायची पाळी माझी आहे.नवा संसार थाट!तुझ्या बदनामीला मी कारणीभूत आहे,अशी तू तक्रार करतेयस.पण तुझ्या आँफीसच्या मैत्रिणींना कुणी सांगितलं?? नाेकरी आहे म्हणुन तुलाच प्रतिष्ठा आहे का? एक लहाऩ सामाजिक कार्यकर्ता म्हणून मला प्रतिष्ठा नाही? चारित्र्य एका स्रीसाठी महत्वाचं असतं तसंच पुरूषांसाठीही असतं.आपलं वय काही अल्लड नाही तर विचार करून निर्णय घेण्याचं आहे.विचारक्षम आहे…..तर मला नाेकरी नाही.मी गरिब आहे.तुला तुझे प्राँब्लमस् आहेत…..या आणि अशा अनेक प्रश्नांविषयी तुला आणि आणि तुझ्या घरातील मंडळींना अकस्मात जाणीव कशी झाली.? तू घरी आल्याने आई मला नेहमी विचारते,’ कशी आहे तुझी मँडम? काय म्हणते तुझी मँडम? ‘ तुर्तास तिच्या प्रश्नाला माझ्याकडे ऊत्तर नाहीए.तू तुझी बदली करुन घे.क्रुपया एवढे ऊपकार माझ्यावर कर!

मी राेज तुझ्या परवलीच्या वाटेवर डाेळे लावून वाट बघताे.तुला चाेरुन बघण्याची सवय मी माेडु शकलाे नाही.अजुनही तुझ्याठी गजरे आणताे.ते तसेच काेमेजुन जातात.घराबाहेर पडणारं प्रत्येक पाऊल तुझ्याकडे येण्याचा आग्रह धरतं.गेल्या चार महिन्यांत आपल्या शब्दांची भेट झाली नाही.साधी नजरभेट करायची म्हटलं तर तुला वाईट वाटेल अशी भिती वाटते.म्हणून एकमेकांच्या पुढे येउन एकमेकांचा जीव जाळण्यात अर्थ नाही!तुझ्या साेईसाठी आपल्यात आता परकेपणाच असावा.मी गरिब माणूस स्वप्नांचा मालक आहे.पण स्वप्नही आजकाल बेईमान हाेतात.रात्रीला साेबत असतात आणि दिवस ऊजाडताच साथ साेडतात…..तुझ्या काही वस्तू मी जपुन ठेवल्यात.स्म्रुती म्हणुन! त्याकडे लक्ष गेलं की वेदना हाेतात.पण त्यात अनामिक आनंद आहे….

❣❣

✒️लेखक:-राजू बाेरकर(मो:-९४०४११७७०३,७५०७०२५४६७)