मानव कल्याणासाठी :-संविधान लोकशाही आणि बहुजन जाणीव आणि जागृती

53

✒️प्रा.डॉ.नरेश शंकरराव इंगळे(मु.भांबोरा,ता.तिवसा,जिल्हा अमरावती)मो:-९९७०९९१४६४
—————————————-
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचं संपूर्ण आयुष्यच संघर्षाने ओतप्रोत भरलेलं होतं.सकल मानवजातीचे कल्याण हेच त्यांच्या संघर्षाचं अंतिम असं ध्येय होतं.त्याचं प्रतिबिंब भारतीय राज्यघटनेत उमटलेलं आहे. संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचा दस्तऐवज असलेली भारतीय राज्यघटना ही भारतीयासाठीच नव्हे तर संपूर्ण जगभरासाठी आदर्शवत आहे. परंतु सत्तर वर्षाचा कालावधी लोटूनही भारतीय संविधानाची अपेक्षित अशी अंमलबजावणी झाली असे ठामपणे कुणालाच म्हणता येणार नाही.उलट जनकल्याणाचा मूळ गाभा असलेल्या संविधानालाच तथाकथित प्रस्थापिताकडून लक्ष्य केले जात आहे.चौफेर हल्ले केले जात आहे.भारताच्या उज्वल भविष्यासाठी आणि लोकशाहीप्रधान देशासाठी ही बाब नक्कीच गंभीर आहे.म्हणून भारतीय संविधान शाबूत राखणे,अबाधित ठेवणे तसेच घटनाकारांना अपेक्षित राज्यघटनेची प्रभावी अंमलबजावणी पर्यायाने डॉ. आंबेडकराच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी सर्वांनीच जबाबदारी उचलली पाहिजे.ही बाब शिरोधार्य मानून राज्यघटनेच्या महतीसाठी/रक्षणासाठी सर्व स्तरातून जाणीव आणि जागृतीचा ध्यास उराशी बाळगून व्यासंगी,अभ्यासू व्यक्तिमत्त्व असलेल्या मनीष बलभीम सुरवसे (सोलापूर) या उमद्या लेखकांनी “संविधान लोकशाही आणि बहुजन जाणीव आणि जागृती” या लेखसंग्रहाच्या माध्यमातून घेतला आहे.अभ्यासपूर्ण,अत्यंत महत्त्वपूर्ण तसेच तितकेच प्रेरणादायी आणि प्रबोधन करणारे विचार पुस्तक रुपात प्रकट झाले.तत्पूर्वी त्यांचे प्रकाशित झालेले ‘जाणार कुठे हा जथ्था? हे पुस्तकही तितकेच महत्वपूर्ण आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अथक परिश्रमातून (२ वर्ष ११ महिने १८ दिवस) सर्वमावेशक अशा भारतीय संविधानाची निर्मिती केली.अठरापगड जाती आणि धर्मात विखुरलेल्या भारतीयाना संविधानाच्या एका धाग्यात गुंफण्याचे महत्कार्य केले. स्वातंत्र्य,समता,बंधुत्व आणि न्यायाची हमी दिली.मूलभूत अधिकार आणि हक्क बहाल केले.सोबतच कर्तव्याचीही जाणीव करून दिली.शोषित,पीडित,वंचित बहुजन समाजाला स्व-अस्तित्वाची जाणीव करून दिली.सर्वांगीण उन्नतीचा मार्ग सुकर केला.संविधानाच्या आधारावरच आज आपला भारत देश सुजलाम सुफलाम देश म्हणून मोठ्या दिमतीने उभा आहे.जागतिक पटलावरही भारताची उंचावलेली प्रतिमा हे भारतीय राज्यघटनेचेच फलित आहे.देश संविधानाच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.मात्र तथाकथित प्रस्थापितांची वक्रदृष्टी संविधानावर एकवटली आहे.इतकेच नव्हे तर संविधानाच्या उपयुक्तततेबाबतही प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे.जनतेत संभ्रम निर्माण केला जातो.संविधानाला लक्ष्य अन चौफेर असे विघातक हल्ले केले जात आहे.म्हणून प्रस्थापिताचे हे विघातक मनसुबे कसे हाणून पाडायचे याबाबत सखोल चिंतन,मननातून अभ्यासपूर्ण असे विश्लेषण आणि प्रबोधन करणारे विचार लेखकाने अतिशय समर्पकपणे मांडलेले आहे.

सविधानाला वेठीस धरल्या मुळेच (पृ.क.४९-५२) तरुणांनो,तुम्ही वाचाल तर संविधान वाचेल ! (पृ. क्र. ८६-८९),संविधानामुळेच आपण माणूस आहोत!,संविधान आमच्या बापाचे (पृ.क्र.१८६-१८९),सविधान जतन ही जबाबदारी सर्वांचीच ! (पृ.क्र. २१४-२१९) सविधान आणि त्याबाबतचे अज्ञान (पृ. क्र.२२०-२२४) इत्यादी लेख हे प्रतिनिधिक स्वरूपाचे आहे. लेखकाचे सखोल अवलोकन आणि सविधना प्रती असलेली प्रचंड निष्ठा यातून दृष्टीस पडते.प्रजेला संविधान साक्षर करणे आणि संविधानाचे जतन करणे आणि समृद्ध भारताची जडणघडण करणे अपेक्षित आहे.त्यासाठी सर्व भारतीयांना विशेषता तरुणांनी पुढाकार घेण्याचे अतिशय आत्मीयतेने लेखक आव्हान करतात.लेखकाचे लेख हे प्रासंगिक आहे.जे दृष्टीस पडले,अनुभवले तेच त्यांनी चिंतन आणि अभ्यासातून मांडले. भूतकाळातील घटनाक्रम आणि भविष्याचा वेध घेऊन त्यांचे हे विचार प्रकट झाले.

म्हणूनच त्यांची ही लेख मालिका आजच्या घडीलाही तितकीच उपयुक्त आणि प्रेरणादायी वाटते.कारण त्यात लेखकांनी सविधानाबरोबरच इतरही महत्वपूर्ण अशा विषयाला तितक्याच दमदारपणे हाताळले आहेत.म्हणूनच संबंधित लेखाचे वाचन करतांना जणूकाही लेखक आपलीच भूमिका विशद करतात असे वाटते.भारत हा तरुणांचा देश आहे असा वारंवार उल्लेख केला जातो.मात्र ज्याच्या खांद्यावर देशाची धुरा आहे तो तरुणच वैचारिक दृष्टया पंगू झाला आहे. आजच्या घडीला भरकटलेला, दिशाहीन आणि बेरोजगारीच्या सावटाखाली अडकलेल्या तरुणाची ही विदारक स्थिती पाहून लेखकांना अत्यंत वेदना होतात.आजच्या तरुणाला भविष्याचा अंदाज नाही. वाचनापासून तर तो कोसो दूर आहे.त्यांच्यात आवश्यक ते विचार करण्याची,निर्णय घेण्याची क्षमता नाही.स्वतंत्र अस्तित्व नाही.विचारधारा नाही. रोजगारासाठी धावपळ नाही. समाजातील विद्यमान प्रश्नाबाबत जाणीव नाही.स्वनिर्णयापेक्षा इतरांच्या आदेशावर तो अवलंबून आहे.रोजगार,उद्योग व्यवसायापेक्षा राजकीय धार्मिक नेतृत्वाच्या आदेशाला प्राधान्य देणारा आहे.राजकीय,धार्मिक नेत्यांच्या आदेश पूर्तीसाठी वाटेल ते करण्याची संधी दवडत नाही. अशावेळी मानसिक आणि बौद्धिक स्वातंत्र्य गमावलेल्या तरुणाची स्वतःची पर्यायाने देशाची शैक्षणिक,आर्थिक तसेच सर्वांगीण प्रगती कशी साधणार या प्रश्नाने लेखक अस्वस्थ होतात. म्हणून आजच्या तरुण पिढीला ते ‘वाचाल तर वाचाल’ असे पोटतिडकीने आव्हान करतात.

लेखकांनी तरुणाच्या प्रबोधनावर आणि कर्तव्यावर अधिक भर दिला.डॉ.आंबेडकरांच्या विचाराला आणि संघर्षाला जगात तोड नाही.डॉ.आंबेडकरांचे विचार शोषित,पीडित,वंचित आणि बहुजन समाजाच्या उद्धारासाठी खऱ्या अर्थाने प्रेरणास्त्रोत आहे.डॉ.आंबेडकराच्या विचारातूनच आंबेडकरी चळवळीचा जन्म झाला.लेखकावर सुद्धा डॉ. आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा प्रचंड असा प्रभाव आहे.त्याची क्षणोक्षणी अनुभूती येते. आंबेडकरी विचाराच्या तळमळतेतुनच लेखकाने आंबेडकरी चळवळीचे अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन आणि विविध विषयावर सडेतोड असे भाष्य केले.एकेकाळी इतरांसाठी प्रेरणादायी/पथदर्शक ठरणारी आंबेडकरी चळवळ आता योग्य नेतृत्वाअभावी दिशाहीन झाली आहे.चळवळीची विदारक स्थिती पाहून लेखकांना प्रचंड अशा वेदना होतात.म्हणूनच त्यांनी अभ्यासपूर्ण अशा विविध लेखाच्या माध्यमातून आपल्या स्व-वेदनांना लेखणीच्या माध्यमातून वाट मोकळी करून दिली.लेखक केवळ चळवळी समोरील अनेकविध आव्हानाचा आढावा घेऊनच थांबले नाही तर त्यांनी सखोल अध्ययनातून आवश्यक त्या उपाययोजना सुद्धा सुचविल्या आहेत.आंबेडकरी चळवळीला पुरक अशा राजकीय, सामाजिक,धार्मिक क्षेत्रातील गटात तटावर सुद्धा जबरदस्त प्रहार केला.संबंधित स्वाभिमानशून्य नेतृत्वाचा अहंकारीपणा,नेतृत्वासाठीची ओढाताण,सत्तेची लालसा इत्यादी बाबी आंबेडकरी चळवळीसाठी नक्कीच घातक ठरली.ठरणारी आहे.नेतृत्वाबरोबरच स्वार्थी आणि अंधभक्तीचे पांघरून घेऊन बसलेल्या अनुयायांना सुद्धा त्यांनी फटकारले.चळवळीसाठी आमच्याकडे वेळ नाही असे म्हणणाऱ्याचाही लेखकांनी खरपूस समाचार घेतला.विद्यमान स्थितीत आंबेडकरी समूहाने आणि आरक्षण लाभार्थीनी शैक्षणिक व आर्थिक प्रगती मोठ्याप्रमाणात साधली.त्याचे कारणच हे डॉ.आंबेडकराचे कार्यकर्तृत्व आहे.आता हेच लाभार्थी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याऐवजी कृतघ्नतेला धन्यता मानतात.अशा लाभार्थीना त्यांचा पूर्वइतिहास आणि डॉ बाबासाहेब आंबेडकराच्या उपकाराची आठवण करून देतात.

डॉ बाबासाहेब आंबेडकर हेच आपले उद्धारकर्ते आहेत हे त्यांनी उद्धारकर्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि आपण (पृ.क्र.१०७-),भारतीय समाजाचे उद्धारक डॉ.आंबेडकर (पृ. क्र.२०९),डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि कामगार संघटना (पृ. क्र.११८) इत्यादी लेखातून स्पष्ट आणि बेधडक मांडणी केली.
सध्या आरक्षण हा कळीचा मुद्दा बनला आहे.संविधानातील आरक्षण तरतुदीमुळे गोरगरीब उपेक्षित समाजाला आवश्यक ते शिक्षण घेता आले.छोट्या-मोठ्या नोकऱ्या मिळविता आल्यात. समाजामध्ये मानसन्मान प्राप्त झाला.अशा आरक्षण लाभार्थींनी भारतीय संविधान अबाधित राखण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली पाहिजे.आरक्षण आणि संविधान वाचविणे ही सर्वच भारतीयांची जबाबदारी आहे.केवळ बौद्धसाठी आरक्षण या मानसिकतेतून बहुजनानी बाहेर पडणे अनिवार्य आहे.संविधान आणि आरक्षणाशी छेडछाड कुणाच्याही हिताचे नाही.तसेच बौद्धतेत्तरांनी पाठ फिरविणे नक्कीच योग्य नाही.बौद्ध समाजाबरोबरच इतर समाजानाही आरक्षण पर्यायाने संविधान वाचविण्याची खरी गरज आहे याची जाणीव करून देतात. सध्या शिक्षण सर्वसामान्याच्या आवाक्या पलीकडचे झालेत.नोकऱ्याची तर वाणवाच आहे.ही बाब सर्व समाजासाठी चिंतनाचा विषय आहे.शिक्षण नाही.नोकरी नाही. उद्योग-व्यवसाय उभारण्याची ऐपत नाही अशा स्थितीत आरक्षण लाभार्थी समाजाची प्रगती कशी साधणार असा प्रश्न उपस्थित करतानाच बौद्धबरोबरच अनुसूचित जातीतील बौद्धतेत्तर अनुसूचित जाती/जमाती इतर मागासवर्गीयांनी आरक्षण वाचवण्यासाठी लढा उभारण्याचे पोटतिडकीने लेखक आव्हान करतात.आरक्षण वाचविणे ही केवळ बौद्धाची जबाबदारी या मानसिकतेतून इतर समुदायांनी प्रस्थापितांच्या षडयंत्रतून बाहेर पडण्याची आवर्जून सूचना करतात.सनातनी प्रस्थापित राजकीय पक्ष हे आंबेडकरी चळवळीसाठी कधीच पुरक नव्हते आणि राहणार सुद्धा नाही.हे पक्ष केवळ वेळ मारून नेतात.संधीचे सोने करतात.भारतीय जनता पक्षासह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यप्रणालीवर लेखकांनी आसुड ओढला.

सत्तेसाठी संख्याबळ महत्त्वाचे आहे.(पृष्ठ क्रमांक १६५- १७०)लेखकांचा हा प्रश्न आंबेडकरी चळवळीच्या दृष्टीने अनाकलनीय वाटतो.विचार तत्त्वांना मुरड घालून राजकीय सत्तेसाठी कोणासोबतही हात मिळवणी करायची का असा प्रश्न उपस्थित होतो.वंचित बहुजन आघाडी बद्दल लेखकानी मांडलेली भूमिका हि सुद्धा न समजणारी आहे.एवढे मात्र नक्की की,जात्यंध राजकीय पक्षाचा बुरखा फाडण्याची स्वीकारलेली भूमिका नक्कीच समर्थनिय आहे.लोकशाहीप्रधान देशात लेखकाची लोकशाहीवर अगाध अशी श्रद्धा आहे.लोकशाहीला ते आपला प्राण मानतात.लोकशाहीची जपणूक आणि टिकविण्याची जबाबदारी समस्त भारतीयांची आहे.ही तळमळ लेखकाच्या नखशिखांत भरलेली आहे.सलग चिंतन आणि सामाजिक हितापोटी लेखकांनी प्रामाणिकपणे आणि सडेतोड मांडणी करून विद्यमान स्थितीत लोकशाहीचे महत्त्व,संवर्धन तिचे बळकटीकरण तसेच लोकशाही टिकविण्याची जबाबदारी ही कुणाची याची जाणीव आणि जागृती प्रगल्भपणे करून दिली.तसेच बुरसटलेल्या जुन्या रूढी,प्रथा,परंपरेवर जबरदस्त प्रहार केला.स्त्रियांना त्यांच्या उद्धारकर्त्या अन प्रेरणास्त्रोताची जाणीव करून दिली.पुस्तकातील सर्वच लेख हे उत्कृष्ट आणि वास्तव स्थिती रेखाटणारे आहेत.प्रातिनिधिक आणि भविष्याचा वेध घेणारे आहे. त्यातील काही विशेष लेख प्रामुख्याने भीमा कोरेगावच्या भ्याड हल्ल्यामागील विचारधारा (पृ.क्र. ३५-३७) लोकप्रतिनिधी आणि संघटनाचे उत्तरदायित्व( पृ.क्र.४३-४८),डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराशिवाय पर्याय नाही ( पृ. क्र.६७-७१), लाचारीने तुमचे कायमचे कल्याण होणार का? (पृ.क्र.७७-८१)रोजगार आणि लोककल्याणकारी संकल्पना(पृ.क्र.८२-८५) बहुजनांनो,आपण कोण आहोत?,ओबीसींनो जागे व्हा ! (पृ क्र १४४-१४७),लोकशाही आणि तिचे संवर्धन (पृ.क्र. १७१-१७६),संवैधानिक संस्था आणि लोकशाहीवरील संकट (पृ.क्र.१७७-१८०),रूढी परंपरेची परिवर्तन न स्वीकारणारी समाजाची मानसिकता (पृ.क्र.१९३-१९७),लोकशाही टिकवण्याची जबाबदारी कोणाची (पृ क्र.२२९-२३३) इत्यादीचा आवर्जून उल्लेख करावे लागेल.

नोकरी आणि घर प्रपंच सांभाळून लेखक मनीष सुरवसे यांनी अत्यंत आत्मीयतेने आणि सामाजिक हितापोटी या ग्रंथाची निर्मिती केली.संविधानातील मानवी मूल्यांची जाण असलेल्या आणि लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या समस्त बहुजनांना हे पुस्तक अर्पण केले.यावरून लेखकाच्या अभ्यासाची आणि चळवळी प्रति असलेल्या आस्थेची उंची अधोरेखित करते. प्रा.एम.आर.कांबळे यांची सविस्तर अशी प्रस्तावना सकल आंबेडकरी चळवळीची आणि डॉ.आंबेडकराच्या कार्य कर्तृत्वाचा आढावा घेणारी आहे. अमोल सुरवसे यांनी समर्पक असे मुखपृष्ठ रेखाटले.एकंदरीत सदर पुस्तकातील लेखमालिका हि मानवी कल्याणासाठी संविधान लोकशाही आणि बहुजन जाणीव आणि जागृतीसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणारी आहे यात शंका नाही.म्हणून संविधान आणि आंबेडकरी प्रेमींना हे पुस्तक नक्कीच पसंतीस उतरेल असा मला ठाम विश्वास आहे.लेखकांना उज्ज्वल भविष्यासाठी आणि सकस साहित्य निर्मितीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा……….
पुस्तकाचे नाव:- संविधान लोकशाही आणि बहुजन जाणीव आणि जागृती.
लेखक:- मनीष बलभीम सुरवसे प्रकाशन:-गिरीजा प्रकाशन सोलापूर.
मुखपृष्ठ:- अमोल सुरवसे.
पृष्टे:- २३८.
लेखसंख्या:-४६
स्वागतमूल्य:-२५० रुपये