युवक-कालचा आजचा-उद्याचा

65

तरुण कोणाला म्हणावे ,त्यासाठी निकष कोणते लावता येतील , तारुण्य आणि तरुण यात फरक काय?याचा जर विचार केला तर असे लक्षात येते की ,बऱ्याच वेळा तरुण म्हणजे शुन्य ते तिशीच्या आतील व्यक्तीस तरुण म्हणून गणले जाते. म्हणजे वयाचा निकष हा तरुणासाठी गृहीत धरला जातो.मग असे असेल तर वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहून समाधी घेणारे ज्ञानेश्वर, जगाला भक्तीचा मार्ग दाखवणारी संत मंडळी,त्यानंतर *मर्त्य माणसापासून कर्तत्वाच्या जोरावर देवत्वापर्यंत पोहचणारे छत्रपती शिवाजी महाराज*, वयाच्या बत्तीसाव्या वर्षापर्यंत एकही लढाई न हरणारे छत्रपती संभाजी महाराज,  औरंगजेबास नको नको करणारी ताराराणी, राज्याचा कारभार समर्थपणे पाहणारी पेलणारी अहिल्याबाई होळकर,स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे ठणकावून सांगणारे ऐंशीच्या घरातील लोकमान्य टिळक,सत्तरी पार केलेले बापू जेंव्हा ब्रिटीश सत्तेला चले जाव सांगतात ,किंवा बाबू गेणू सारखा मुलगा क्रांतीची मशाल घेऊन पेटून उठतो किंवा पिंगळे,राजगुरू  सारखे क्रांतिकारक हसतमुखाने क्रा़ंतीची मशाल घेऊन फासावर चढतात तेंव्हा त्यांचे कर्म आणि कर्तृत्व तरुण झाले होते.मग वयाचा निकष तरुण पणासाठी कसे ग्राह्य धरता येतील.एवढेच नव्हे तर स्वातंत्र्यानंतर अनेक नेते आपल्या कर्तबगारीने तरुण ठरले आहेत.

2014 नंतर आपल्या झंझावाताने भारतीय समाजमनावर गारुड निर्माण करणारे आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी , ऐंशी पार केलेले शरद पवार सत्ता पालटण्याचे जेंव्हा काम करतात तेंव्हा ते तरुण होऊनच तरुणाईच्या मनावर विराजमान होतात. म्हणून वय हा फक्त आकडा आहे.तारुण्याचा निकष मात्र तो ठरु शकत नाही.मग मन हा तारुण्याचा निकष ठरु शकेल का?मन हे चिरतरुण असतं.खाटेवर खितपत पडलेल्या वृद्धाचं मन सुद्धा क्षणात तरुण होऊन तारुण्याच्या गिरक्या घ्यायला झेप घेतं.म्हणून फक्त माणसाचं कर्तृत्व हेच त्याला तरुण ठरवतं.भलेही तो रोज त्याचे पिकलेले केस रंगवून काळे करोत.चिरतरुण दिसण्यासाठी तो कितीही खटाटोप करो जर त्याचं मन आणि कर्तृत्व जर ओशाळत असेल तर त्यास तरुण तरी कसे म्हणायचे?

*कालचा तरुण..*

आपल्या देशाला खुप मोठा इतिहास आहे. आज आणि उद्या जर आपणास पाहायचे असेल ,जगायचे असेल तर इतिहासात नक्कीच डोकावून पहावे.जो समाज ,जे राष्ट्र आपला इतिहास जाणतो ,समजतो तोच समाज ,तेच राष्ट्र भविष्य घडवत असते.आपल्या महाराष्ट्राला तर ज्वाजल्य असा इतिहास लाभला आहे. संत परंपरेपासून त्याची सुरुवात झाली. त्यांनंतर मधला काळ गुलामिची गेली. कर्तृत्व असून मुघलांची चाकरी केली. तो त्या काळच्या तरुणाईचा तो दोष होता.त्याकडे पाहून आपणास हे शिकता येईल की आपलं सामर्थ्य काय आहे आणि या सामर्थ्याचा उपयोग आपण कशासाठी आणि कोणासाठी करायचा?हेच तर इतिहासाचं महात्म्य असतं .चांगल्या वाईट गोष्टीतून चांगलं वेचायचं.वाईटाची कारणमीमांसा करायचे.पुन्हा तसे घडू नये म्हणून प्रयत्न करायचा.त्यानंतरच्या काळात मग या मुर्दाड झालेल्या मराठी मनाचं आत्मभान जागं करण्याचे काम सह्याद्रीच्या वाघाने ,छत्रपती शिवरायाने रायगडावरुन केले.

पण त्य काळातील तरूणांपुढे आव्हान होते ते कसे जगायचे आणि आपले अस्तित्व कसे टिकवायचे.पण त्यातून त्यांनी मार्ग शोधला आणि स्वराज्याच्या रुपाने जगाच्या पटलावर नवीन उदय घडवून आणला.त्यानंतर पुन्हा आपला तरुण बिथरला.किंवा कर्तव्यापासून दुर गेला.आणि इंग्रजी सत्तेने आपल्या मातीत पाय रोवले.पण जेंव्हा आपणास अन्यायाची चिड येते तेंव्हा क्रांती घडते.आणि ती क्रांती इथल्या तरुणांनी घडवली.’ज्याचा सुर्य कधी बुडत नव्हता’अशा महाशक्तीशाली ब्रिटिश सत्तेला उखडून फेकण्याचे कार्य इथल्यि तरूणांनी केले.आणि पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करून स्वातंत्र्याची फळे चाखली.त्या तरूणांनी आपल्या शक्तीला विधायक मार्गाने नेले.आणि कर्तत्वाने सिद्ध केले की ते क्रांतिकारक चिरतरुण होते.

*आजचा तरुण*

*स्वातंत्र्यानंतरचा तरुण..*

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खुप सारी आव्हाने आपल्या तरूणासमोर होती.पण आपल्या कर्तृत्वाने अनेक क्षेत्र पादाक्रांत करत तरुण त्या आव्हानांना सामोरे गेला.देशात तंत्रज्ञान आलं .कुठेतरी रेडिओचा आवाज ऐकणाऱ्यांना घरोघर टिव्हीचे दर्शन होऊ लागले.1987 साली दुरदर्शन घरोघर पोहचले.आणि तेथून जो वेग घेतला आहे आजतागायत तो थांबलेला नाही. माजी पंतप्रधान यांनी जागतिक उदारीकरणाचे धोरण अवलंबून भारतीय बाजारपेठ खुली केली. आणि तेंव्हा खेड्यापाड्यात रमणारा तरुण शहराकडे वळला.शहरीकरणाच्या रोषनाईत तो रमला.खुप मोठ्या स्थित्यंतराचा तो साक्षीदार बनत होता.नव्या नव्या कंपन्या उदयास आल्या. रोजगाराच्या नव्या वाटा शोदण्याचे काम तरुण करु लागला.आणि जीवणात आणि जगण्यात स्थैर्य कसे निर्माण होईल या साठी प्रयत्न करु लागला.या तरूणांपुढे नवे आव्हाने नव्या समस्या समोर येत होत्या. सरकारी धोरणे, सामाजिक समस्या नव्यानं तोंड आ वासून समोर उभ्या रिहिल्या होत्या.

*1980 च्या नंतरचा तरुण..*

1980 च्या नंतर जन्मास आलेली पिढी म्हणाल तर तारुण्यात, तारुण्याच्या उंबरठ्यावर किंवा मग तारूण्याच्या उतारावर उभी आहे. सर्वात जास्त स्थित्यंतरे ही तरूणाई पाहत आहे. ब्लॅक अँड व्हाईटचा दुरदर्शन चा टिव्ही तो अनेक चॅनल्स असलेला टिव्ही, रंगीत एलसीडी, एलईडी,ट्रम्प कॉल,लँडलाईन फोन,ते मोबाईल कितीतरी प्रगती या तरूणाई ने पाहिले आहे. तो अनेक क्षेत्र चोखंदळत आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात आपला ठसा उमटवत आहे. हे असताना कुठेतरी अनेक नवीन समस्यांना त्याला तोंड द्यावे लागत आहे.

आव्हाने.. उद्याचा तरुण

फक्त पळायचं हेच धोरण जर ठेवलं तर कोणासाठी आणि कशासाठी पळायचं हे पण लक्षात आलं पाहिजे.ओंजळीत भरेल एवढेच वेचले पाहिजे किंवा धरले पाहिजे जर ओंजळ भरून खाली वाहू लागले तर ते मातीत मिळतं.मग मातीत मिळण्याऐवजी दुसऱ्या कोणाच्या ओंजळीत ओतले कितीतरी सोयिस्कर ठरतं.
*वयाच्या पस्तिशी,चाळीसी पर्यंत जर माय बापावर अवलंबून परावलंबी जीवन जगत असाल तर तो मायबापाच्या जीवनाचे पाप म्हणावे लागेल.मायबापाच्या दृष्टीकोनातून ते तरुण ठरत असतील पण मग नव्या उमेदीच्या पोरांसाठी बालपणच ठरत असतं.बालपणी जसे मायबाप सर्व गरजा पुरवायचे तसाच प्रकार. यात चुक त्या मायबापाची अन् बेफिकीर पोराचीही.जर एखाद्या क्षेत्रात अपयश येत असेल तर दुसरे पर्याय शोधावेत.पण चाळिशी उलटेपर्यंत आपला भार मायबापावर टाकू नये.नंतर तुम्ही कितीही कमावलात तरी तुमच्या त्या कमाईला शुन्य अर्थ राहतो.*
जात धर्म हे कोणी ठरवून जन्मास येत नाही. म्हणून एखाद्या जातीत वा विशिष्ट धर्मात जन्म झाला म्हणून अहंमपणा,किंवा कमीपणा बाळगण्याचा काय अधिकार आहे. सगळी माणसे सारखीच.शिवा काशिद स्वतः चा प्राण जाणार हे माहीत असतानासुद्धा राजांसाठी अभिमानाने सिद्धी जौहर पुढे राजांचा वेश घेऊन गेला होता.तेंव्हा कुठे राजे सुखरूप विशाळगडावर पोहचले.सय्यद बंडावर वार करणारा जीवा महाला असे कितीतरी उदाहरणे देता येतात की ज्यांनी जातीपेक्षा आपल्या कर्तव्याला श्रेष्ठ मानले.जातीपातीत जर आज तरुण अडकून पडू लागला तर त्याला माणूसपणाचं लेणं तरी कसं लाभेल.जात नावाचा एक दगड असेल आणि आपणासमोर दोन.पर्याय असतील त्यात एक म्हणजे भिंत बांधणे आणि दुसरा म्हणजे पूल बांधणे. यापैकी आपण माणूस म्हणून भिंत बांधून आपल्याला समोरच्या पासून तोडण्यापेक्षा पूल बांधून समोरच्याशी जोडणे कधीही चांगले.आपण ठरवलं पाहिजे त्या दगडाचा विधायक कामासाठी कसा उपयोग करता येईल.
स्त्रियांच्या बाबतीत तर येणारा काळ खुप महत्त्वाचा ठरणारा आहे. स्त्रियांनी खुप परिवर्तन पाहिले आहेत. चुलमूल सांभाळणारी स्त्री आज पुरूषाच्या खांद्याला खांदा लावून एव्हाना एक पाऊल पुढे टाकून जग पादाक्रांत करत आहे. म्हणून आज काळाची कोणती गरज असेल तर मुलाला पण मुलीसारखी जबाबदारी आणि कर्तव्य याची शिकवण द्यायला हवी.
एकत्र कुटुंब किती महत्त्वाचे आहे हे जाणले पाहिजे. त्याचे काही फायदे तसेच काही तोटे आहेत. पण छोट्या कुटुंबात जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या भावभावनांचि विकास खुंटतो.नातीगोती ,आपले म्हणणारे लोक कुटुंबात असतील तर आपणास आधार मिळतो.म्हणून मोठ्या कुटुंबाचं महत्त्व आपण जपून येणाऱ्या पिढीला ते समजावून सांगितले पाहिजे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे संस्कार. संस्कृती जतनातून संस्कार वर्धन केले जाते. म्हणून आज आपल्या तरूणाला जगाबरोबर स्पर्धा करताना संस्कार जपण्याचे ते रूजवण्याचे महाकाय कार्य करावे लागणार आहे.

✒️सतीश सोपान यानभुरे(8604552272)