वाघाच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या तीन आरोपींना वन विभागाने घेतले ताब्यात

30

⏩वनविभागाची कारवाई

चंद्रपूर (पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर,दि.20 जून: दिनांक 17 जून रोजी विभागिय वन अधिकारी, (दक्षता) मुख्य वनसंरक्षक, चंद्रपुर वनवृत्त, चंद्रपुर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सहाय्यक वनसंरक्षक (संलग्न अधिकारी), चंद्रपुर वनविभाग, चंद्रपुर व वनपरिक्षेत्र अधिकारी, चंद्रपुर परिक्षेत्र (प्रादेशिक) यांनी मौजा पडोली ता. जि. चंद्रपुर येथे पडोली- घुग्घूस रोडवर सापळा रचून वाहनाने वाघाच्या अवयवाची तस्करी करित असताना तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांचेकडून वाघाची हाडे 6 नग,वाघाच्या मिशा 6 नग, वाघाची नखे 5 नग व उपरोक्त वाहन जप्त करण्यात आले.

आरोपींची चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्यामध्ये आणखी सहा आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्यातील चार आरोपीनी 3 ते 4 वर्षापुर्वी ईश्वर दौलत मेश्राम यांचे शेत सर्वे क्र.45 मौजा पिंपळखुट मध्ये 11 केव्हि विदयुत वाहीनीव्दारे शेतशिवारात विदयुत प्रवाह सोडून वाघाची शिकार केली. तसेच वाघाची शिकार केल्यानंतर त्यास लगतचे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकलाच्या बफर झोन मधील चंद्रपुर परिक्षेत्र, उपक्षेत्र पेठ, नियतक्षेत्र हळदी मधील कक्ष क्र.367 मध्ये खड्डा करुन पुरण्यात आले. त्याअनुषंगाने घटनास्थळी पाहणी करुन वाघास पुरलेल्या ठिकाणी खोदून वाघाची हाडे जप्त करण्यात आली.

सदर प्रकरणातील आरोपी विजेद्र मनोहर सिडाम रा.महादवाडी, अविनाश जगन्नाथ रायपुरे रा.अजयपुर, शरद मनोहर सिडाम रा.महादवाडी, ईश्वर दौलत मेश्राम रा.पिंपळखुट, सखाराम कोंडुजी मडावी रा.नंदगुर, बंडु आत्माराम बावणे रा. महादवाडी, गुलाब काशिनाथ कुसराम रा.पिंपळखुटा, सुरेश सिताराम कन्नाके रा.पिंपळखुट व नितेश उमाकार जुमनाके रा.पिंपळखुट या सर्व आरोपींना दिनांक 19 जूनला मुख्य न्यायदंडाधिकारी, प्रथम श्रेणी न्यायालय, चंद्रपुर यांचे समक्ष हजर करण्यात आले. प्रकरणामध्ये पुढील चौकशी करीता न्यायालयाने आरोपींना दिनांक 19 जून ते 22 जून 2020 पर्यंत फॉरेस्ट कस्टडी रिमांड मंजुर केलेला आहे.

सदर प्रकरणी विभागीय वनअधिकारी, चंद्रपुर वनविभाग, चंद्रपुर ए.एल.सोनकुसरे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक संलग्न अधिकारी, चंद्रपुर वनविभाग, चंद्रपुर एस.एल.लखमावाड तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी, चिचपल्ली वनपरिक्षेत्र व्ही.ए.राजुरकर हे पुढील तपास करीत आहेत.