योग आपल्या अमुल्य संस्कृतिची देणगी

31

जागतिक योग दिन (21 जून) निमित्त विशेष लेख

‘योग हे शास्त्र आहे, शरीर, मन आणि आत्मा एकत्रित रित्या संतुलन घडवण्याचे, निरोगी आणि प्रसन्न ठेवण्याचे.

योग म्हणजे आत्म्याचे परमात्म्यात विलीन होणे. शरिराला ताणने, वाकवणे, पिळणे, अवघडश्वसनक्रियेचा अवलंब करणे म्हणजे योग नव्हे. हा भावनात्मक समतोल आणि त्या अनादी अनंत तत्त्वाला स्पर्श करत अध्यात्मिक प्रगतीतील सर्व शक्यतांची ओळख करून देणारे शास्त्र आहे. योग दहा हजार वर्षापासुन प्रचलित आहे. या परंपरेचा उल्लेख ऋग्वेदात, आयुर्वेद आणि उपनिषदात आहे.
*आरोग्य ही सर्वात मोठी भेटवस्तू आहे. संतोष ही सर्वात मोठी संपत्ती आहे. ते केवळ योगामुळेच मिळते*
संपुर्ण जगात २१ जून ला आंतरराष्ट्रीय योगादिवस २०१५ पासून आपण साजरा करत आहोत. यावर्षी कोविड19 मुळे सामुहिक रित्या आपण योगदिन साजरा करू शकतनाही. दरवर्षी शाळा, कॉलेज इत्यादी ठिकाणी आपण सामुहिक रितीने योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली योग करायचे. यावर्षी सुद्धा सर्वांना योग करायचे आहेत पण आपापल्या कुटूंबातील व्यक्ति सोबत. घराच्या अंगणात, घराच्या स्लॅब वर योग करायचे आव्हान भारताचे प्रधानमंत्री मा. नरेंद्रजी मोदी यांनी केलेलं आहे. योग फक्त एकच दिवस नाही तर दररोज नियमित योग करणे आरोग्याच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे.योग करतांना दुर दर्शन वरील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली, डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार योग करावे.

*कमजोरी मुळे आपल्या मनात भिती निर्माण होते. योग ती भिती काढुन टाकते*
योगात प्राणायामाचे फार महत्व आहे. प्राणायाम म्हणजे योगाच्या आठ अंगापैकी चौथा अंग असं देखील म्हटलं आहे. प्राणायाम हे कोणत्याही वयोगटातील, कोणत्याही लिंगातील व्यक्ति सहज करू शकतो एवढे सहज व सोपे आहे. प्राणायाम करतांना किंवा श्वास घेतांना तीन क्रिया करतात. पूरक म्हणजे श्वास घेणे, कुम्भक म्हणजे श्वास रोखणे व रेचक म्हणजे श्वास सोडणे. प्राणायामाचे अनेक प्रकार आहेत त्यापैकी मुख्य प्रकार-
नाडीशोधन प्राणायाम
उज्जयी प्राणायाम
कपालभाती प्राणायाम
भास्त्रिका प्राणायाम
भ्रामरी प्राणायाम
अनुलोम विलोम प्राणायाम
अशासारखे अनेक प्रकार आहेत.
प्राणायाम नियमित केल्यामुळे फुप्फुसाला स्वस्थ व मजबूत बनवतो ज्यामुळे त्याची क्षमता वाढते. प्राणायामामूळे ब्लडप्रेशर व हार्टसंबंधी आजार दुर करण्यासाठी मदत होते. पचन क्रिया सुधारते,तणाव कमी करण्याचे उत्तम साधन प्राणायाम आहे. सोबतच वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होते.
२१ जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस आहे आणि ‘योग’सुद्धा मनुष्याला दीर्घजीवन प्रदान करते. म्हणून कदाचित हा दिवस २१ जून “आंतरराष्ट्रीय योगदिवस” म्हणून साजरा करण्यामागचा उद्देश असेल असे मला वाटते. योगाची पाच हजार वर्षाची ही भारतीय परंपरा जागतिक पातळीपर्यंत पोहचली आहे.
*सकाळ किंवा संध्याकाळ रोज करा योग. तुमच्याजवळ कधी येणार नाही कोणताही रोग*

लोकांना आता योगाचे महत्व पटू लागले आहे. पैसा-किर्तीच्या झगमगाटापेक्षा स्वतः फिट राहणे महत्वाचे वाटू लागले आहे. हा काळ आपल्यासाठी शारीरिक व मानसिक समस्या घेवून आला आहे. माणूस मनःशांती हरवून बसला आहे. नैराश्य आल्याने जीवन संपवण्याच्या घटना रोज कानावर पडत आहेत. त्यामुळेच आरोग्यविषयक जागरूकता वाढली आहे.त्याचे महत्व वाढले आहे. त्यामुळे योग्य आहार,व्यायाम,विश्रांती,ताण तणावमुक्त जीवन जगणे गरजेचे झाले आहे. आहे त्या परिस्थितीत या गोष्टींचा समन्वय साधण्यासाठी योग्य जीवनशैली अंगीकारावी लागणार आहे. व्यायामासाठी बाहेर फिरणे,जिमला जाणे,मैदानी खेळ खेळणे,पोहणे यागोष्टी सोशल डिस्टंसिंगमुळे शक्य नाहीत. हा केवळ एक व्यायाम प्रकार नाही. तर यामुळे तुमच्या शरीराची एक योग्य कसरत होते. सध्याच्या कोविड19 च्या विचित्र अनपेक्षित निर्माण झालेल्या परिस्थितीत आरोग्याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे लागणार आहे. प्राणायामाचे सोबतच भुजंगासन,अर्ध चक्रासन,सूर्यनमस्कार,वक्रासन नौकासन,पवनमुक्तासन करावे. योगामुळे अनेक फायदे होतात. आजच्या या जागतिक संकटात स्वतःला फिट ठेवू इच्छित असाल तर योगा हा नक्की चांगला उपाय आहे.

*स्वस्थ जीवनजगणे, हे जीवनाचे भांडवल आहे.
रोज योग करणे, ही रोगमुक्त जिवनाची गुरुकिल्ली आहे*

आजच्या परिस्थितीत सर्वजण तणावात आहेत पण नियमित योगा केल्यास ताण-तणावापासून मुक्ती मिळू शकते. दररोज सकाळी उठून प्राणायाम आणि मेडिटेशन केले तर पूर्ण दिवसभर एनर्जी मिळते आणि उत्साह कायम राहतो. तरुणपणी शरीर आपल्याला योग्य साथ देत असते कारण त्यावेळी कितीही आजार आला तरीही प्रकृती साथ देते. पण जसजसं वय वाढतं,तसतशा तक्रारीही वाढतात, शरीरावरही मर्यादा येतात. त्यामुळे जर सुरुवातीपासूनच योगा केलं तर म्हातारपणात आरोग्याच्या समस्यांना कमी सामोरे जावे लागेल.
या योग दिनाच्या निमित्ताने त्याचा प्रसार व प्रचार होणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रत्येकाला एक निरामय आरोग्य लाभेल व निरोगी राष्ट्र तयार होईल.
*नियमित योग करा, नेहमी रोगापासून दूर रहा*

सौ. जयश्री निलकंठ सिरसाटे
                               गोंदिया
                         9423414686