आमदार उईकें यांचे कडून अपहरणाचा प्रयत्न

    45

    यवतमाळ(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    यवतमाळ(दि-30 जून)आमदार डॉ. अशोक उईके व त्यांच्या सहकाऱ्यांनी शेतातून माझ्या अपहरणाचा प्रयत्न केला, अशी तक्रार विठ्ठल कोवे या शेतकऱ्याने जिल्ह्यातील वडकी पोलिस ठाण्यात केली आहे. जमिनीची कागदपत्रे हिसकण्याचा तसेच ट्रॅक्टरने पेरणी उद्ध्वस्त करण्याचाही प्रयत्न झाल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान, हे आरोप बिनबुडाचे असल्याचे आ. उईके यांनी म्हटले आहे.

    माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राळेगाव तालुक्यातील देवधरी येथे बिरसा मुंडा आदिवासी सहकारी सूतगिरणीला मंजुरी दिली होती. तत्कालीन आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके हे या सूतगिरणीचे मुख्य प्रवर्तक आहेत. या सूतगिरणीसाठी शेताची बोगस खरेदी केल्याचे सांगत तक्रार कोवे कुटुंबीयांनी यापूर्वी माया मधुसूदन देशमुख, शंतनू मधुसूदन देशमुख व सूतगिरणीच्या विरोधात वडकी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली होती.
    ही शेतजमीन कोवे यांनी स्वमालकीची असल्याचे म्हटले होते. याच वादातून अपहरणाचा प्रयत्न झाला. कशीबशी सुटका करवून घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ‘शेतीसंदर्भात माझा व कोवे यांचा काहीही संबंध नाही. मी त्यांना ओळखत नाही. सूतगिरणीसाठी जमीन शासनाने दिलेल्या पैशातून देशमुख यांच्याकडून खरेदी केली आहे. सर्व व्यवहार कायदेशीर आहे. कोवे सांगतात त्या दिवशी मी बाभूळगाव तालुक्यात शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करण्यासाठी गेलो होतो’, असे आमदार डॉ. उईके म्हणाले.