नागपुरातील बंद दुकानांपुढे फूटपाथ बाजार फुललाय..!

13

नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नागपूर(दि-30जून)शहरात सम-विषम तत्त्वानुसार, एक दिवसाआड दुकाने बंद असतात. त्याचा फायदा घेत फूटपाथवरील दुकानदार बाजारपेठेतील मोठ्या शोरूमच्या शटरवरच स्वत:चे दुकान थाटत असल्याचे दिसून येत आहे. या दुकानांवर ग्राहकांची गर्दी होऊन करोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
इतवारी, महाल, सीताबर्डी, सदर आदी बाजारपेठा करोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे पूर्णत: बंद होत्या. त्यानंतर लागू करण्यात आलेल्या शिथिलतेमुळे एक दिवसाआड दुकाने सुरू होत आहेत. यामध्ये सराफा, रेडिमेड कपड्यांच्या शोरूमसह विविध प्रतिष्ठानांचा समावेश आहे. सम-विषमच्या नियमानुसार, ज्या बाजूची दुकाने बंद असतात तिथे फूटपाथ दुकानदार स्वत:चे तात्पुरते दुकान उभे करतात.
बंद असलेल्या दुकानांपुढील फूटपाथवर रेडिमेड कपडे, चादरी, होजियरी, इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची दुकाने लावली जातात. येथे स्वस्त दरात वस्तू उपलब्ध असल्याने ग्राहकांची गर्दी होत असल्याचे चित्र आहे. करोनाकाळात होणारी अशा प्रकारची गर्दी संसर्गाला आमंत्रण देणारी ठरत आहे. इतवारी आणि महाल परिसरातील बाजारापेठांमध्ये दुकानांच्या मागील बाजूने रहिवासी वस्ती आहे.
मुख्य रस्त्यावरील दुकाने वगळता गल्लीबोळांमध्ये दाटीवाटीने घरे आहेत. तिथे राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर फूटपाथ दुकानदारांना प्रशासनाने स्वतंत्र जागा उपलब्ध करून द्यावी, हॉकर्स झोनमध्ये त्यांना व्यवसाय करू द्यावा, बंद दुकानांच्या जागेपुढे स्वत:चे दुकान उभे करू देऊ नये, अशी मागणी होऊ लागली आहे.

नियमांचे उल्लंघन
फूटपाथ दुकानांमध्ये कुठल्याही प्रकारच्या सुरक्षात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी होत नाही. सॅनिटायजर वापरणे, सुरक्षित वावर जोपासणे, यांचे काटेकोर पालन होत नसल्याने करोनाचा धोका अधिक आहे. याकडे प्रशासनाने लक्ष द्यायला हवे, अशी भावना इतवारीतील सोना-चांदी ओळ कमिटीने व्यक्त केली आहे. कमिटीने त्यासंदर्भात पोलिस प्रशासनाला निवेदन दिले आहे.