🔹कोरोना प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे : जिल्हाधिकारी कुणाल खेमणार

🔸फक्त हॉस्पिटल, मेडिकल व सरकारी कार्यालय सुरू राहतील

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर (दि.30जून) : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शहर व तालुक्यात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात पुढे येत असल्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून पुढील तीन दिवस 1 जुलै ते 3 जुलै ब्रह्मपुरी शहर कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी त्यांच्याच आरोग्यासाठी करण्यात आलेली ही उपाययोजना असून कोरोना कडी तोडणाऱ्या या उपाय योजनेला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे. तर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी प्रशासनाला जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

ब्रम्हपुरी उपविभागीय दंडाधिकारी क्रांती डोंबे यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे याबाबत परवानगी मागीतली होती. ब्रह्मपुरीच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तसेच ब्रह्मपुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी व उपविभागीय अधिकारी यांनी कोरोना उद्रेकाला चालना मिळू नये ,यासाठी किमान तीन दिवस शहर बंद ठेवण्याचा प्रस्ताव दिला होता. जिल्हा प्रशासनाने पुढील तीन दिवसांसाठी याला परवानगी दिली आहे.

या काळामध्ये शहरातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहे. उपरोक्त कालावधीत फक्त सरकारी कार्यालय, सर्व प्रकारची रुग्णालय, औषधालय, औषधांची दुकाने सुरू राहतील. वैद्यकीय सेवेकरिता आवश्यक वाहतूक सेवे व्यतिरिक्त इतर सर्व वाहतूक सेवा बंद राहील. त्याचप्रमाणे इतर सर्व प्रकारची दुकाने, आस्थापना, पूर्णता बंद राहील. या कालावधीत शासकीय कर्मचारी वैद्यकीय सेवेतील कर्मचारी आणि स्वच्छता विषयक काम करणारे कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर सामान्य जनतेला कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर पडण्यास मनाई असेल. त्यामुळे शहरातील नागरिकांनी घराबाहेर पडूच नये,असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहे. केवळ रुग्णालय,शासकीय कार्यालय व औषधी दुकाने या काळात सुरू राहतील. अन्य कोणतेही व्यवहार सुरू राहणार नाही, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहे.

एकट्या ब्रह्मपुरी शहरामध्ये 11 कोरोना पॉझिटिव्ह आत्तापर्यंत आढळले आहे. तर ग्रामीण भागामध्ये 16 कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. त्यातच शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण यांच्या घरी काही दिवसापूर्वी वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला होता. यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले होते. त्यामुळे शहराच्या अन्य भागातही संसर्ग झाला अथवा नाही हे तपासण्यासाठी शहर बंद ठेवणे आवश्यक असल्याचे पुढे आले आहे. त्यातूनच ब्रह्मपुरी शहर पुढील तीन दिवसांकरिता बंद ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

ग्रामीण भागातून नागरिकांनी येऊ नये : उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे

आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या कलम 34 ( क ) व 34 ( म) आणि फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 ( 1 ) व 144 ( 3 ) अंतर्गत ब्रह्मपुरी शहर येथील व इतर भागात कोरोना विषाणूचा संसर्ग इतर नागरिकांना होऊ नये या दृष्टीने सदर भागाच्या संपूर्ण ब्रह्मपुरी शहर सीमा बंद करणे आवश्यक आहे. त्यामुळे उदया ब्रह्मपुरी शहरात येणाऱ्या सर्व सीमा बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातील अन्य गावातील नागरिकांनी देखील या काळामध्ये शहरात येऊ नये, शहरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने, दुकाने व वाहतुकीची सर्व साधने या काळात बंद असतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. या काळामध्ये शहरातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये, ग्रामीण भागातून ब्रम्हपुरी शहरात कोणी येऊ नये, असे आवाहन उपविभागीय दंडाधिकारी क्रांती डोंबे यांनी केले आहे.

प्रशासनाला सहकार्य करा :पालकमंत्री

दरम्यान, राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी 1 ते 3 जुलै या काळात ब्रह्मपुरी शहरातील संचार बंदीला नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. शहरांमध्ये कोरोना आजाराची लागन कुठपर्यंत झाली आहे. हे या काळामध्ये कळणार आहे. त्यामुळे स्वतःच्या, कुटुंबाच्या व समाजाच्या भल्यासाठी पुढील तीन दिवस कडकडीत बंद पाळावा, असे आवाहनही ना.वडेट्टीवार यांनी केले आहे.

कोरोना ब्रेकिंग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED