सामाजिक न्याय सचिवांचे हिंगोलीतील बौद्ध तरुणीच्या हत्ये प्रकरणी जिल्हा प्रशासनास योग्य तपास करण्याचे निर्देश

100

✒️लातूर(पुरोगामी न्युज नेटवर्क)

लातूर(दि.13ऑगस्ट):- दिनांक १२ ऑगस्ट २०२२ रोजी मंत्रालय मुंबई येथे, हिंगोली जिल्ह्यातील मौजे म्हाळशी ता. सेनगाव येथील १९ वर्षीय बौद्ध तरुणीची विष पाजून हत्या आणि ॲट्रॉसीटीच्या प्रकरणातील तपास योग्यरित्या करून भक्कम पुराव्यासह योग्य कलमाअंतर्गत दोषारोपपत्र दाखल होण्यासंदर्भात नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टिस (एन.डी.एम.जे.) संघटनेचे राज्य महासचिव ॲड.डॉ.केवल उके यांच्या समवेत पिडीत मुलीचे वडील रामदास वाठोरे, भाऊ बौद्धशिल वाठोरे, एन.डी.एम.जे. हिंगोली जिल्हा समन्वयक भास्कर वाठोरे आणि शहापूर तालुका अध्यक्ष गुरुनाथ काशिवले यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव मा.सुमंत भांगे आणि सहसचिव मा.दिनेश दिंगळे यांची भेट घेवून विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मा.सुमंत भांगे यांनी जिल्हा प्रशासनाला आणि राज्य पोलिस महासंचलकांना त्वरित उचित कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

या संदर्भात सविस्तर वृत्त असे की, दिनांक
१२ जुलै २०२२ रोजी म्हाळशी ता. सेनगाव जिल्हा हिंगोली येथे प्रेम प्रकरणातून १९ वर्षीय मयत दिक्षा नावाच्या बौद्ध मुलीची विष पाजून हत्या करण्याचा आरोप मराठा समाजाचा आरोपी सचिन रामेश्वर बरडे त्याचे आई वडील व भावजई यांच्यावर पिडीत कुटुंबाने केला आहे. यांच्या नुसार वरील चौघांनी मयत मुलीला घटनेच्या दिवशी घरी बोलावलं. मयत ही सचिन बरडे या आरोपी पासून तीन महिन्याची गर्भवती होती. त्यामुळे तिला धमकावून औषध गर्भपातचे आहे असे सांगून तिला उंदीर मारण्याचे विष पाजुण हत्या करण्यात आली होती.

सदर प्रकरणात दिनांक १६/०७/२०२२ रोजी गोरेगाव पोलिस स्टेशन येथे प्रथम खबर क्रमांक १६२/२२ नुसार भांदवी कलम ३०६, ३४१, ५०६ सह अट्रोसिटी कायदा कलम ३(२)(५अ) नुसार चार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु सदर प्रकरणात हत्या आणि लग्नाचे खोटे आमिष देवून शारिरीक संबंध ठेवण्याबाबत कलम ३०२ आणि ३७६ नुसार कारवाही करण्यात आलेली नाही असे पिडितांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. तसेच एक महिना उलटून सुद्धा अद्याप केवळ २ आरोपींना अटक केले परंतु उर्वरित सर्व आरोपींना अटक करण्यात आली नाही. आरोपींना विविधरित्या मदत करणाऱ्या काही व्यक्तींना अद्याप सहआरोपी करण्यात आले नाही.

पिडीत कुटुंबाचे कुठल्याही प्रकारे आर्थिक पुनर्वसन करण्यात आले नाही. अश्या अनेक त्रुटी असल्यामुळे पिडीत कुटुंबाला नैसर्गिक न्याय मिळण्यासाठी योग्य तपास व्हावा, सर्वच आरोपींना अटक करावी आणि तत्काळ पुनर्वसन करावे अशी मागणी ॲड केवल उके यांच्या सह उपस्थित शिष्टमंडळाने केली अन्यथा नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टिस संघटना यासंदर्भात राज्यव्यापी आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला.