नांदेड जिल्ह्यातीलअतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना राज्य शासनाने जाहीर केलेली आर्थिक मदत आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा – आमदार राम पाटील रातोळीकर यांचे कृषिमंत्र्यांना साकडे

✒️नायगाव प्रतिनिधी(हानमंत चंदनकर)

नायगाव(दि.21ऑगस्ट):-अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना राज्य शासनाने जाहीर केलेली आर्थिक मदत नांदेड जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या खात्यावर येत्या आठ दिवसात जमा करून पीक विम्याची अग्रीम 25 टक्के रक्कम शेतकर्‍यांना देण्याबाबत विमा कंपन्यांना आदेशीत करावे, अशी मागणी आमदार राम पाटील रातोळीकर यांनी एका निवेदनाद्वारे राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे केली आहे.राज्याचे कृषिमंत्री श्री अब्दुल सत्तार हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता आमदार राम पाटील रातोळीकर यांनी रविवारी त्यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

या निवेदनात रातोळीकर यांनी नमूद केले की गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील कृषी क्षेत्र आस्मानी संकटामुळे डबघाईला आलेले आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका या क्षेत्राला पर्यायाने अन्नदाता शेतकर्‍यांना बसत आहे. कधी ओला, तर कधी कोरडा दुष्काळ अशा भोवर्‍यात शेतकरी अडकला आहे. यातून बाहेर निघण्याचा मार्ग मिळत नसल्याने नैराश्येतून आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहे. नांदेड जिल्ह्यातील परिस्थिती यापेक्षा काही वेगळी नाही असे त्यांनी म्हटले आहे.

जिल्ह्यात गेल्या अडीच महिन्यांपासून सातत्याने अतिवृष्टीने कहर माजवला आहे.पावसळ्याच्या पहिल्या दोन महिन्यातच सरासरी शंभर टक्केहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. वरचे वर पावसाच्या सरी कोसळत आहेत. शेतातील दुबार-तिबार पेरणीही वाया गेली. अतिवृष्टी आणि त्यामुळे नदी-नाल्यांना आलेल्या महापुरात हजारो हेक्टर शेती अक्षरशः खरडून गेली आहे.जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात 80 टक्केहून अधिक शेतकरी या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधीत झाले आहेत. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकर्‍याच्या मदतीसाठी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार धावून येत आहे, ही बाब स्वागतार्ह आहे. राज्यातील अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकर्‍यांना शासनाने तीन हेक्टरपर्यंतची आर्थिक मदत जाहीर केली आहे. ही मदत शेतकर्‍यांच्या खात्यावर अद्याप जमा झालेली नाही. शेतकरी पार हवालदिल झालेला आहे, त्याच्यावर उपासमारीची वेळ आली असून येत्या आठ दिवसांत ही रक्कम शेतकर्‍याच्या खात्यावर जमा करण्यासंदर्भात व्यवस्था करणे गरजेचे आहे.

ही बाब आमदार रातोळीकर यांनी यावेळी मंत्री सत्तार यांच्या निदर्शनास आणून दिली.याशिवाय दुसरी बाब या निवेदनात नमूद करण्यात आली की, शेतकर्‍यांना पीक विमा भरण्याची मुदत 31 जुलै अशी होती. बहुतांश शेतकर्‍यांनी विम्याची रक्कम जुलैच्या पहिल्याच आठवड्यात जमा असली तरी नियमानुसार विमा कंपनी एक महिन्याच्या कालावधीनंतर म्हणजेच 31 ऑगस्टनंतर पंचनामे, सर्वे यासारखी प्रक्रिया सुरु करेल. तोपर्यंत शेतकर्‍यांना विम्याच्या रक्कमेची प्रतिक्षा करण्याशिवाय पर्याय नाही. त्यांची परिस्थिती पाहता प्रतीक्षा करण्याची क्षमताही राहिलेली नाही.

त्यामुळे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पंचनामे करून दुसर्‍या आठवड्यात नियमानुसार मिळणारी पीक विम्याची प्रथमदर्शनी किमान 25 टक्के रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश विमा कंपन्यांना द्यावेत. विशेष म्हणजे 17 सप्टेबरला मराठवाडा मुुक्तीसंग्राम दिन तर आहेच, शिवाय याववर्षी मराठवाडा मुक्ती दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षात आपण पदार्पण करीत आहोत. शिवाय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचा 17 सप्टेंबर रोजीच वाढदिवस आहे. हा योगायोग लक्षात घेता मराठवाड्यातील शेतकर्‍यांना विम्याची 25 टक्के रक्कम मिळाल्यास मराठवाड्यातील पर्यायाने नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही एक अविस्मरणीय आणि अमृतमहोत्सवी भेट ठरेल, याकडे आमदार रातोळीकर यांनी मंत्री सत्तार यांचे लक्ष वेधले या सर्व बाबींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तात्काळ निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणी आमदार राम पाटील रातोळीकर यांनी या निवेदनात केली आहे.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED