चंद्रपूर जिल्ह्यात भाजीपाला, फळ, फूल पिकांचे क्षेत्र वाढवा-ना.भुसे

30

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

🔹कृषी व कृषी संलग्न विभागाचा घेतला आढावा

🔸उमेदच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांचा विकास महत्वपुर्ण

🔹 शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ द्यावा

चंद्रपूर(दि.5जुलै): जिल्ह्यामध्ये भात, कापूस या पिकाव्यतिरिक्त भाजीपाला पिके, फळपिके आणि फूल पिकांच्या क्षेत्रांमध्ये वाढ करावी यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचना संबंधित अधिकारी यांना राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी दिल्यात. कृषी संजीवनी सप्ताह निमित्त शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी ते चंद्रपूर दौऱ्यावर आले असता जिल्हा कृषी विभाग व कृषी संलग्नित विभागांचा दिनांक 5 जुलै रोजी ऊर्जा विभागाचे विश्रामगृह येथे त्यांनी आढावा घेतला.

खरीप हंगामात उपलब्ध होणारे पीक कर्ज, बियाणे- खते, विविध सिंचन प्रकल्पातील पाणी उपलब्धता, प्रधानमंत्री पिक विमा योजना इत्यादींबाबत त्यांनी सविस्तर आढावा घेतला. जिल्ह्यातील विविध सिंचन प्रकल्पातील पाणी साठा अतिशय काटेकोरपणे वापरावा. खरीप आणि रबी हंगामातील पिकास सिंचन प्रकल्पातील पाण्याचा वापर करावा ,अशा सूचना ना. दादाजी भुसे यांनी दिल्यात.

जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी जिल्हा कृषी विभागाच्या नियोजन विषयीचे सादरीकरण केले. मनरेगा फळबाग योजनेतून फळबाग लागवडीचा कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा कृषी विभागाचे नियोजन आहे. या वर्षी एप्रिल, मे महिन्यापासून खते -बियाणे शेताच्या बांधावर राबविण्याचे अभियान चांगले परिणामकारक असल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले. पीएम किसान योजनेतंर्गत सध्या समाविष्ट शेतकरी तसेच आणखी उर्वरित समाविष्ट करायचे शेतकरी बाबतची माहिती जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिली.

दरम्यान,उमेदच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांचा विकास कसा होईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.असे मत या वेळी ना.दादाजी भुसे यांनी व्यक्त केले.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी उमेद विषयी सविस्तर माहिती सादर केली.

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, किसान सन्मान योजनेचा सुद्धा आढावा यावेळी कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी घेतला. लाभार्थ्यांना चालू खरीप हंगामात पीक कर्ज उपलब्धते विषयीची माहिती त्यांनी घेतली. तसेच कर्जमुक्ती योजनेचा लाभ पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळावा यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना यावेळी त्यांनी संबंधितांना दिल्यात. जिल्ह्यात पिक कर्ज विषयीच्या वाटपाबाबतची माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे समन्वयक एस.एन.झा यांनी सादर केली.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी राहुल कर्डिले, विभागीय कृषी सह संचालक,नागपूर रविंद्रजी भोसले, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ.उदय पाटील, जिल्हा परीषदेचे कृषी विकास अधिकारी शंकर किरवे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.सोमनाथे, जिल्हा अग्रणी बँकेचे समन्वयक एस.एन.झा उपस्थित होते.