शिवसेनेची थेट भाजपशी युती; राष्ट्रवादीच्या नागमोडी राजकारणाला शह

32

✒️कल्याण(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कल्या(दि 5 जुलै):अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरमध्ये पाच नगरसेवक फोडून शिवसेनेला शह देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेनेनं कल्याणमध्ये मात दिली आहे. कल्याण पंचायत समितीमध्ये शिवसेनेनं थेट भाजपशी हातमिळवणी करत राष्ट्रवादीला कात्रजचा घाट दाखवला आहे.
कल्याण पंचायत समिती सभापती व उपसभापतीसाठी नुकतीच निवडणूक झाली. इथे भाजपचे पाच, शिवसेनेचे ४ तर राष्ट्रवादीचे तीन नगरसेवक आहेत. शिवसेना-राष्ट्रवादी राज्यात सत्तेत असल्याने कल्याण पंचायत समितीत या दोन्ही पक्षांचेच सभापती, उपसभापती निवडून येतील, असा अंदाज होता. सभापती व उपसभापतीपद राष्ट्रवादीला देण्याचे आधीच निश्चित झाले होते. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या दिवशी म्हणजेच रविवारी चक्रे फिरली. भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी शिवसेनेच्या नेत्यांशी संपर्क करून खलबतं केली. त्यांच्यातील चर्चेअंती भाजपनं शिवसेनेला विनाअट पाठिंबा जाहीर केला.
भाजपच्या पाच सदस्यांच्या पाठिंब्याच्या बळावर शिवसेनेच्या अनिता वाकचौरे यांनी सभापतीपदी बाजी मारली. त्यांना सात मते मिळाली. तर, त्यांच्या निकटच्या प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीच्या दर्शना जाधव यांना ५ मते मिळाली. उपसभापपती शिवसेनेचे रमेश बांगर निवडून आले. त्यांना सात तर, ऐनवेळी राष्ट्रवादीसोबत जाऊन उमेदवारी दाखल केलेले भरत भोईर यांना पाच मतांपर्यंत मजल मारता आली.
पारनेरमध्ये राष्ट्रवादीने खेळलेल्या राजकारणाला शिवसेनेनं दिलेलं हे प्रत्युत्तर मानलं जात आहे. पारनेरमध्ये राष्ट्रवादीने शिवसेनेचे पाच नगरसेवक फोडले होते आणि थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश घडवून आणला होता. त्यामुळं सत्ताधारी पक्षविस्ताराची स्पर्धा सुरू झाल्याचे बोलले जात होते. शिवसेनाही आता या स्पर्धेत उतरल्याचं स्पष्ट झालं आहे. हे मतभेद केवळ स्थानिक पातळीवरच राहतात की राज्य पातळीवर याचे पडसाद उमटतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.