शिक्षणविभागाचे वेळकाढु धोरण मनस्ताप देणारे : शिक्षणाधिकाऱ्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

43

🔹आदेश काढून कोंडी करायची तर दुसरीकडे संभ्रम निर्माण करणारे अजब धोरण

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.1ऑक्टोबर):- जिल्हा परिषदेत शिक्षकांबद्दल पूर्वग्रह ठेवून जाणूनबुजून कोंडी करण्याचा शिक्षणाधिकारी यांचेकडून प्रयत्न केल्या जात असून दुसरीकडे विपरीत आदेश काढून संभ्रमाची परिस्थिती निर्माण करून मनस्ताप देण्याचा अजब कारभार सुरू आहे .
– *विजय भोगेकर, राज्यनेते पुरोगामी संघटना*
—————————————-
शिक्षकांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी संघटनेकडून अनेकदा चर्चा व निवेदनाच्या माध्यमातून सहकार्याची अपेक्षा केली . पण निगरगट्ट प्रशासन आपले वेळकाढू धोरण सोडत नसल्याने शिक्षकदिनी धरणे आंदोलन करण्यात आले . तरीही तीच परिस्थिती कायम असल्याने ११ ऑक्टोबर पासून साखळी उपोषणाचे आयोजन केले आहे .
– *संजय चिडे , सरचिटणीस, पुरोगामी संघटना*
—————————————-
चंद्रपूर- मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद चंद्रपूरच्या प्राथमिक शिक्षण विभागातील भोंगळ कारभाराने शिक्षक त्रस्त असून न्याय मागण्यासाठी ११ ऑक्टोबर पासून जिल्हा परिषदेसमोर महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना साखळी उपोषण करणार आहे .
पारदर्शकतेच्या दृष्टीने सुरू केलेल्या टोकन पद्धतीला बगल देत शिक्षणाधिकारी मनमानी वित्तप्रेषण करून ज्येष्ठताक्रमाची पायमल्ली करीत आहेत . पदोन्नतीअभावी अनेक शाळांना मुख्याध्यापक नसल्याने तसेच केंद्रप्रमुखाचा प्रभार शिक्षकांकडे असल्याने शालेय प्रशासनाचा बोजवारा उडाला असताना शिक्षणाधिकारी वेळकाढू धोरण अवलंबत आहेत . उच्च न्यायालयाचा निर्णय असताना त्याला फाटा फोडून शिक्षणाधिकारी अन्यायकारक आदेश काढतात , त्याउपर दुसरीकडे आपल्याच आदेशाच्या विपरीत वित्तप्रेषण करून शिक्षकांत संभ्रमाची परिस्थिती निर्माण केल्या जात आहे . त्यामुळे शिक्षणाधिकारी प्राथमिक याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे .

अशा एक नव्हे तर तब्बल २० समस्या घेऊन महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेने शिक्षकदिनी धरणे आंदोलन केले . तेव्हा प्रशासनाने समस्या सोडविण्यासाठी एक महिन्याचा कालावधी मागितला . एक महिन्याचा कालावधी लोटून मधल्या काळात संघटनेकडून अनेक भेटी , पत्रव्यवहार व चर्चा करण्यात आल्या . परंतु त्यापैकी एकही समस्या निकाली न निघता वारंवार प्राथमिक शिक्षण विभागाच्या वेळकाढू धोरणाने शिक्षकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे . नुकत्याच जिल्हा बदली करून आलेल्या शिक्षकांना दुर्गम , नक्षलक्षेत्रात पदस्थापना न करता मर्जीच्या गावात नियुक्त करण्यात आले . शाळा व्यवस्थापन समितीच्या अधिकारात येणाऱ्या दोन सुट्ट्यांना आकसापोटी कात्रण लावण्यात आले . गेल्या तीन वर्षांपासून रिक्त पदावर पदोन्नती न दिल्याने कित्येक सेवाज्येष्ठ निवृत्त होऊन लाभापासून वंचित राहिले .यासारख्या अन्यायाला वाचा फोडून न्याय्य मागण्याकरिता येत्या ११ ऑक्टोबर पासून महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना साखळी उपोषण करीत असल्याची माहिती अध्यक्ष किशोर आनंदवार व कार्याध्यक्ष गंगाधर बोढे यांनी दिली आहे .