गौरव आदिवासी क्षेत्रातील नारी शक्तीचा!

20

या विश्वात महान अशा स्त्रीशक्ती होऊन गेल्या. आपला पराक्रम, शूरवीरता आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी खूप मोठे योगदान दिले.तसेच आजच्या घडीला समाजामध्ये आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटविणाऱ्या नवदुर्गा पाहायला मिळतात. त्यांना सावित्रीच्या लेकीही म्हटल्या जातात. अशीच एक जिने लहानपणापासूनच असंख्य संघर्ष अनेक जबाबदाऱ्या अडचणी, दुःख, कष्ट आणि दुसऱ्यांसाठी झिजून इतरांना आपल्या लेखणीतून प्रेरणा दिली. त्या नारीशक्तीच नाव आहे गृहिणी, शेतकरी ,लेखिका ,कवयित्री, समाजसेविका सौ संगीता संतोष ठलाल. अतिशय दुर्गम भाग म्हणून ओळखला जाणाऱ्या आदिवासी भागातील गडचिरोली जिल्ह्यातील झाडीपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुरखेडच्या त्या रहिवाशी. जेमतेम तीनशे लोक वस्तीचे गाव या गावात रोजंदारीवरच जास्तीत जास्त लोकांचा उदरनिर्वाह चालतो. आणि त्यांही शेतामध्ये काम करून आपल्या कुटुंबाचा सांभाळ करून लिखाण करते. जेमतेम बारावी पर्यंतचे त्यांचे शिक्षण झाले.घरची परिस्थिती अत्यंत नाजूक, सकाळच्या चहासाठी दुकानातून चहापत्ती आणि साखर बांधून आणलेल्या रद्दीच्या पेपरातून त्यांना वाचनाचा छंद जडला. तेव्हा त्या चौथ्या वर्गात शिकत होत्या. केवळ या वयात मुलींना फक्त खेळणे माहीत असते. जशा त्या मोठ्या व्हायला लागल्या तशा त्यांना समाजामध्ये असणारे दुःख समजू लागले.

मुळात हळव्या व संवेदनशील स्वभावाच्या असल्याने आजूबाजूच्या गोष्टी टिपून हातात लेखणी घेऊन समाजापर्यंत पोहोचविण्याचा विचार त्यांच्या मनात येऊ लागला.आणि या गृहिणीने हातात लेखणी धरली. आणि लिखाणाचा प्रवास सुरू झाला.आज त्यांच्या लिखाणाला 28 वर्ष पूर्ण झालेले आहे .त्यांनी अनेक सामाजिक विषयावर लेखन केले आहे. गोरगरिबाची व्यथा ऐकून त्यांना मदतीचा हात देणारी ही एक सामाजिक कार्यकर्ती. विधवा स्त्रियांना हरतालिकेच्या दिवशी स्वतःच्या घरी बोलावून त्यांचा सन्मान करणारी, या कवयित्रीचा किती मोठेपणा म्हणावा. नाहीतर आजच्या परिस्थितीत विचार केला तर या सणाला बऱ्याच भगिनी घरी विधवांना बोलवत नाही मात्र या लेखिकेने विधवा स्त्रियांचा सत्कार केला आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले .किती हा मनाचा मोठेपणा.

संगीता ठलाल यांना ज्वलंत परिस्थितीवर लिखाण करणे आवडते. आतापर्यंत त्यांनी दोन हजाराच्या वर लेख लिहिले . लोकमत, दैनिक पुण्यनगरी, सकाळ, देशोन्नती ,लोकशाही वार्ता, तरुण भारत ,विश्वजगत मेहकर टाइम्स दैनिक या नावाजलेल्या पेपरमध्ये त्यांनी अनेक लेख लिहिले.बळीराजा, सर्पमित्र, गुराखी ,बस कंडक्टर अशा विषयाबरोबरच इतर अनेक विषयावर त्यांनी लिखाण केले. त्यांच्या विचारधारा वाचण्यासारख्या असतात.तसेच बऱ्याच वृत्तपत्रात कविता, समीक्षण, रसग्रहण प्रकाशित झालेले आहे व आजही होत आहे.अनेक दिवाळी अंकात सुद्धा लेख, कविता प्रकाशित झालेले आहेत,. ऑनलाइन कविता स्पर्धेत त्यांना उत्कृष्ट सर्वोत्कृष्ट प्रथम द्वितीय तृतीय उत्तेजनार्थ क्रमांक मिळाले.त्याचबरोबर बरेच स्पर्धेचे परीकक्षण करण्याचे त्यांना भाग्य लाभले.आजपर्यंत बऱ्याच सामाजिक कार्यक्रमात, शाळेत, महाविद्यालयांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले.त्यांचे अनेक नावाजलेल्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला.ऑनलाइन उपक्रमातही भाग घेऊन लिखाण करतात .आतापर्यंत तीनशे च्या वरती साहित्य प्रकाशित झाले. गोरगरीब आदिवासी विधवा बळीराजा यांच्या विषयी त्यांना कळवळा आहे.त्यांचे दुःख वेदना जाणून घेणे मदत करणे त्यांच्या अडचणी जाणून त्या समाजापर्यंत आपल्या लेखणीतून पोहोचविण्यासाठी अहोरात्र झटत आहे.

नुकताच त्यांचा क्रांति दिनानिमित्त भंडाराचे जिल्हाधिकारी माननीय संदीप कदम सर यांनी या समाजसेविकेचा सत्कार केला. भुकेलेल्यांना अन्न देणे, गरजूंना मदत करणे हे त्यांचे ब्रीद आहे.घरी येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या मोठा आदराने त्या सन्मान करतात.त्यांना आपल्याच अन्नातील जे काही आहे ते खाऊ घालतात .त्यांच्या घरी त्यांचा सत्कार करण्यासाठी त्यांचे शाळेचे शिक्षक आणि अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या. संगीता ठलाल हे त्यांचे खूप मोठे भाग्य समजतात.साहित्य हा समाजाला दिशा दाखवत असतो अन्यायाला वाचा फोडत असतो म्हणूनच म्हणतात ना कवी लेखक जगताचा धनी असतो .आणि म्हणूनच या लेखिकेने 28 वर्ष आपल्या लिखाणातून कशाचीही अपेक्षा न ठेवता निर्भीड आणि परखड लिखाण चालू ठेवले.

एका कवितेत त्यांनी लिहिले आहे
मला बीन पगाराची नोकरी मिळाली आहे
हे माझे सर्वात मोठे भाग्य आहे
माझा मालक जगाचा विधाता त्यांनीच
दिलेली ही नोकरी मी करीत आहे
ती म्हणजे सत्य बोलण्याची ,सत्य पेरण्याची
जबाबदारी मला दिली त्याने
असंख्य संकट येतात रोजच जीवनात
तरीही न डगमगता चालतो त्याचाच नियमाने.

खरंच ,त्यांच्या लिखाणाची शैली अत्यंत साधी सोपी सर्वसामान्यांना ग्रामीण जनतेलाही सहज समजणार अशी आहे.स्वतःला शून्यातून घडवून या लेखिकेने खूप संघर्ष केला आहे.गरीबी काय असते, एका शेतकऱ्यांचे दुःख काय असते, समाजाचे दुःख काय असते ,हे त्यांनी जवळून पाहिले. मनाला होणाऱ्या वेदना म्हणूनच लिखाणातून उमटविल्या . साधी राहणीमान व उच्च विचारसरणीच्या नारी शक्तीचा
म्हणूनच गौरव व्हायलाच पाहिजे असे मलाच काय तर असंख्य वाचकांना वाटते.कारण तिच्या पंखात लेखणीने आसमान गाठण्याची ताकद आहे.तिच्या पंखाला लेखणीचे बळ मिळो तिला दीर्घायुष्य लाभो.मला खात्री आहे या समाजसेविकेला सौ संगीता संतोष ठलाल या कवयित्री लेखिका समाजसेविकेच्या या नारीशक्तीला शासनाच्या वतीने एक दिवस नक्कीच गौरवण्यात येईल.नाही का?

✒️संगीता राजेश नागदिवे(यवतमाळ)