मुंबईत नळावरचे भांडण ?

    37

    सकाळी सकाळी नळावर जोरात भांडण चालू होते.एकमेकांच्या झिंझोट्या धरून गरगरा फिरवत होते.खूप मोठी गर्दी जमली होती.भांडण इतके आव्हानात्मक, रहस्यमय, नाट्यमय , कलात्मक होते कि कधी थांबू नये,असे प्रत्येक प्रेक्षकाला वाटत होते.जोपर्यंत दोन्ही पार्टी भांडून भांडून बेहोश होत नाही, तोपर्यंत चालू ठेवण्याचे प्रेक्षकांनी ठरवले.अधूनमधून भयंकर, महाभयंकर संवाद ऐकायला मिळत.जे रामायण, महाभारत,शाकुंतल,मुद्राराक्षस,उत्सव ,एकच प्याला,भावबंधन ,शोले मधे सुद्धा वाचायला मिळाले नाहीत.कालीदास,कबीर, शेक्सपिअर ,राम गडकरी यांचे सुद्धा लक्षात आले नसतील,असे संवाद ऐकून श्रवणयंद्रिये तृप्त जाहलीत.शब्दबाण तर इतके तिक्ष्ण व टोकदार होते कि, महाभारत युद्ध,दुसरे जागतिक युद्धातील शस्रे बोथट वाटावीत.त्या दोघींचे विस्कटलेले शरीर,घामाळलेले कपडे,लालबुंद डोळे,पसरलेला कुंकू,रक्ताळलेली नखे, अस्ताव्यस्त झिपोट्या पाहून प्रेक्षकांचे डोळ्यांचे पारणे फिटले.एक महिषासुरमर्दिनी,दुसरी गर्दभासुरमर्दिनी.दो आखे बारा हात चा चर्मचक्षू नजारा.

    मी विचारले,दादा,नळाला पाणी तर जोरात चालू आहे‌.दोघांचे हंडे,गुंडे तर ओसंडून वाहात आहेत.तरीपण हे भांडण कशासाठी चालू आहे?दादा म्हणाले,वाद नळाचा किंवा नळातून येणाऱ्या पाण्यासाठी नाही.एकीचा आरोप आहे,दुसरीने माझा नवरा चोरला.त्या नळावरील भांडणाचे कारण ,एकीने दुसरीचा नवरा चोरला होता.हे कोडे आता उलगडले.जेंव्हा सुरत गुवाहाटी गोवा प्रकरण घडले .हुबेहुब तसेच उदाहरण एकनाथ शिंदेंनी घालून दिले.दसरा मेळाव्यात ठाकरे म्हणाले कि, एकनाथ शिंदेंनी माझा बाप चोरला.ही बाप चोरणारी टोळी आहे.
    दसऱ्याला पहिल्यांदाच दोन मेळावे झाले.पहिला तर आधीपासूनच होत होता.एक नेहमीप्रमाणे शिवतिर्थावर आणि आता दुसरा त्यांच्या छाताडावर. बीकेसी मैदानावर.दोघांनी विराट श्रोते जमवले. ओढून ताणून मारून मुटकून गाड्या भरून आणले. अनेकांनी समीप सभामंडपी बसून पाहिले.आम्ही दूरदर्शन वर पाहिले.रिमोट व्हिजन ने पाहिले.ते नळावरचे भांडण होते.राजकिय नव्हते.तेथेही नळावरच्या भांडणाची स्क्रिप्ट होती.लांब टिळा विरूद्ध गोल टिळा.एकाचा बाप दुसऱ्याने चोरला,अशी तक्रार होती.एकाची खुर्ची दुसऱ्याने पळवली.दोघांचे म्हणणे एकच होते, मीच बरोबर आहे.समोरचा चुकीचा आहे.सामना अनिर्णित ठरला.थर्ड हम्पायरचा कौल घेणे बाकी आहे.

    दसरा मेळाव्यात जे रणकंदन झाले ते दोन महिलांमधील नव्हते.ते पुरोगामी महाराष्ट्राच्या आजी माजी मुख्यमंत्र्यांमधील होते.मुख्यमंत्री हे राजकिय, शासकिय पद असले तरी त्यात राजकारण आणि शासन औषधालाही आढळले नाही.त्याने माझी पाटी फोडली‌.म्हणून मी त्याची फुटपट्टी मोडली.या स्तरावरचे भांडण होते.दोन्ही कैप्टननी निवडक भिडू सोबतीला घेतले होते.त्या भिडूंपैकी एका गडूने तर राणा भिमदेवी भाषण ठोकले होते.म्हणे, बाळासाहेब ठाकरे आमचे बापासारखे होते.आम्ही बाप कधीच बदलत नाही.आणि आश्चर्य! तीनच दिवसात बाप बदलून टाकला.तो गडू लांब टिळा टीम सोडून गोल टीळा टीममध्ये घाई गडबडीत गडबडत गेला . माय माऊली हयात असती तर या गडूला स्टेजवरच तिने चपलेने बदडले असते.” हरामखोरा! तू तुझ्या राजकीय मतलबासाठी बाप बदलण्याची भाषा करतोस.तू तुझ्या सोयीसाठी बाप बदलला .पण आईच्या वेदना तुला कळणार नाहीत. तू काय बदलायचे ते बदल,दलबदलू लबाडा,पण माय आणि बाप बदलवू नकोस.तितके तरी शाबूत ठेव.मला वाटले होते,माझे हे कार्ट राजकारणात गेले कि,चारचौघात जाऊन सुधारेल.

    पण हे तर जास्त बिघडले. देवा,हे पापी शब्द
    माझ्या कानी पडण्या आधीच मला उचलून ने.”
    काल शिवतिर्थ व बीकेसी वर झालेली भाषणे सुद्धा नळावरचे भांडण होते.तेथे ही आई बाप,भाऊ बहिण ,पोरगा,नातूचा उद्धार झाला.पुर्वजांचा आणि संततीचा ही विचका केला.फक्त मुंबई नव्हे आख्खा महाराष्ट्र हा तमाशा पाहात होता.काल कळले कि हे लोक राजकारण कशासाठी करतात? फक्त सत्ता आणि मत्तासाठी.

    ✒️शिवराम पाटील(९२७०९६३१२२)महाराष्ट्र जागृत जनमंच,जळगाव