तलाठी -,कोरोना लढाईतील ग्रामस्तरावरचा ‘फ्रंटलाईन’ योध्दा

23

🔸विशेष लेख🔸

कोविड-19 हा साथीचा आजार असून कोरोना या विषाणूमुळे पसरणारा आजार आहे. कोविड-19 या आजाराने संपूर्ण विश्वामध्ये महामारी चालू आहे.तेव्हा ग्रामीण भागामध्ये महसूल विभागाचा कर्मचारी म्हणून तलाठी यांचेवर अतिशय महत्वाची जबाबदारी सोपविली आहे. तलाठीसह प्रत्येक गावाकरिता ग्रामस्तरीय कोरोना जनजागृती पथकाची स्थापना करण्यात आलेली आहे. यामध्ये सरपंच अध्यक्ष, पोलीस पाटील सदस्य, सचिव, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, कोतवाल, अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांचा सदस्य म्हणून या पथकामध्ये समावेश आहे. गावामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी हे सर्व कर्मचारी अहोरात्र काम करीत आहे. कोरोना विषाणूबाबत गावातील लोकांना कोणताही पूर्वानुभव नसल्याने अनेक शंका, संभ्रम व भीतीची भावना निर्माण झालेली होती, ग्रामस्तरीय समितीने त्यांच्या सर्व शंकांचे समाधान केले जात आहे.

ज्या ज्या वेळेस लॉकडाऊन घोषित करण्यात आले. त्या-त्या वेळेस या पथकामार्फत गावामध्ये जनजागृती करून कोविड-19 संदर्भात व कलम 144 अंतर्गत संचारबंदी बाबत दक्षता घेण्यात आली. योग्य काळजी घेतली तर कोरोना विषाणू संसर्गापासून दूर राहू शकतो याबाबत समुपदेशन करण्यात आले. गावात परवानगी घेऊन होणाऱ्या लग्न सोहळ्याला प्रत्यक्ष ग्रामस्तरीय पथक उपस्थित राहून सोशल डिस्टन्सिंग बाबत सूचना देण्यात आल्या. जमाव होणार नाही याबाबत दक्षता घेण्यात आली, यासाठी या चमूतील तलाठी हा शासकीय स्तरावरील दूत ठरतो.

सुरूवातीच्या काळात ग्रामीण भागातील बरेचसे विद्यार्थी, कामगार, मजूर, परराज्यात व परजिल्ह्यात अडकून होते. तसेच परराज्यातील व परजिल्ह्यातील बरेचसे विद्यार्थी, कामगार, मजूर, गावामध्ये अडकून होते. त्यांची माहिती शासनाला वेळोवेळी देण्याचे काम या

पथकामार्फत करण्यात आले. ज्यांचा रोजगार बुडाला व उपजीविकेचे साधन नाहीसे झालेल्यांना अन्नधान्य मिळण्याबाबत माहिती वरिष्ठांकडे देण्यात आली. लॉकडाऊन काळात गावात कोणीही उपाशी राहणार नाही, याबाबत दक्षता घेण्यात आली.

अलगीकरण करण्यासंदर्भात उपाययोजना:

परराज्यातून व परजिल्ह्यातून जे नागरिक गावामध्ये येतात त्यासंदर्भात त्यांना विलगीकरण करण्याचे शासनाचे निर्देश असल्याने परराज्यातून व परजिल्ह्यातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद ठेवण्यात आली. यामध्ये तलाठ्यांची भूमिका अग्रणी होती.

संस्थात्मक विलगीकरण करण्याकरिता जिल्हा परिषद शाळा येथे व्यवस्था करण्यात आली. वयोवृद्ध व्यक्ती, 10 वर्षाखालील मुले असणाऱ्या माता, गर्भवती स्त्रिया, दुर्धर आजाराने ग्रस्त असलेले व्यक्ती, घरात स्वतंत्र व्यवस्था असलेले यांना गृह अलगीकरण करण्यात आले. या व्यतिरिक्त बाहेरून येणाऱ्यांना संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले. अलगीकरण काळात नियमित भेटी देण्याचे काम तलाठी गावागावात करीत आहेत. सर्वांना मास्क व सॅनीटायजरचा वापर, व्यक्तीगत स्वच्छता, घरामध्ये घ्यावयाची काळजी, आयुर्वेद-युनानी-होमियोपॅथी औषधी उपचार, आयुर्वेदिक काढा बाबत आयुष मंत्रालय मार्फत सुचविलेल्याच उपचार पद्धतीचा वापर करावा याबाबत माहिती देण्यात आली.

गृह अलगीकरण असणाऱ्यांना घराबाहेर न पडण्याबत सूचना देण्यात आल्या. कोरोना विषाणूचा कशाप्रकारे प्रसार होऊ शकतो, त्याची माध्यमे काय याबाबत त्यांना जागृत करण्यात आले.

शासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करण्यात करण्याबाबत लोकांना सूचना देण्यात तलाठी सक्रीय आहेत. तसेच इतर कोणत्याही अफवांवर, सोशल मिडीयावर येणाऱ्या चुकीच्या माहितीवर विश्वास ठेऊ नये, तसेच अलगीकरण केलेल्या व्यक्तींना एकटे असल्याची भावना निर्माण होणार नाही व

त्यांना समाजातून दूर सारण्याचा प्रयत्न करू नये याची काळजी घावी. कमीतकमी 6 फुट अंतर ठेऊन सामाजिक अंतर पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या. सर्व नागरिकांना व बाहेरून येणाऱ्या लोकांना आरोग्य सेतू ॲपचा वापर करण्याबाबत माहिती देण्यात आली. कोरोना विषाणूचा वाढता प्रसारविचारात घेऊन कन्टेनमेंट प्लॅन निश्चित करण्यात आले. मॉकड्रील घेऊन गावातील सर्व कुटुंबाचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले.गावागावातील तलाठ्यांचा यापूर्वीचा संपर्क या काळात कामी आला.

गावामध्ये या सर्व उपाययोजना राबवत असताना कर्मचार्यांना सुद्धा तितकेच जागृत राहावे लागले. यामध्ये कार्यालयात प्रवेश करणाऱ्या सर्व कर्मचार्यांचे थर्मल स्क्रीनिंग करण्यात आले. हवा खेळती राहावी म्हणून सर्व खिडक्या उघड्या ठेवण्यात आल्या. कार्यालयात सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात आले. कार्यालयातील सर्व कर्मचार्यांना 3-3 ट्रिपल लेयर मास्क वाटप करण्यात आले. कार्यालयात प्रवेश करणाऱ्या सर्व अभ्यागतांना मास्क घालणे अनिवार्य केले आहे, नागरिक याला प्रतिसाद देत आहेत.

एकूणच कोरोना संक्रमण काळात प्रत्येक गावात तलाठी कार्यरत आहेत. या आजाराच्या काळात प्रत्येकजण घरीच थांबण्यासाठी तलाठ्यांची मात्र धडपड अविरत होती आणि राहणार आहे.

                                 अनुराग पुट्टावार, तलाठी

                           मानोरा ता.भद्रावती,जी.चंद्रपूर