पिंपोडे येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार-एकाला अटक

    40

    ✒️सातारा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    सातारा (दि.13 जुलै):-जिल्ह्यातील पिंपोडे बुद्रुक (ता. काेरेगाव) येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील सोनके गावातील एकाला वाठार पोलिसांनी अटक केली आहे. हिंदुराव मारुती धुमाळ असे आरोपीचे नाव आहे. पिडीत मुलगी तब्बल चार महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर ही माणुसकीला काळिमा फासणारी अमानुष घटना उघडकीस आली असून याबाबत सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

    याबाबत पोलिसांनी सांगितले की, गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास संबधित मुलगी आपल्या आजीकडे जात असताना आरोपीने तिच्याशी गोड बोलून तिला घरात बोलवले व तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. पाडव्याच्या दुसऱ्या दिवशीही दुपारी दोनच्या सुमारासच आरोपीने त्या मुलीवर बलात्कार केला.

    या घटनेत ही अल्पवयीन मुलगी चार महिन्यांची गरोदर राहिली असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर या घटनेला वाचा फुटली. याबाबत मुलीच्या आईने शनिवारी (ता. 11) वाठार स्टेशन पोलिस ठाण्यात तक्रार दिली. सहायक पोलिस निरीक्षक स्वप्निल घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक एम.एस.पाटील पुढील तपास करत आहेत.