रेतीची अवैध तस्करी बघून मंत्रीही झाले अवाक

  47

  ✒️नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

  नागपूर(दि.22जुलै):-रेतीची अवैध तस्करीची आतापर्यंत निव्वळ चर्चा होत होती. पण, खापा व कन्हान येथे रेतीचा प्रचंड साठा बघून मंत्री आणि वरिष्ठ अधिकारीही अवाक झालेत. अवैध उपसा होत असल्याच्या तक्रारी झालेल्या छापामार कारवाईमुळे माफियांचे धाबे दणाणले.
  मंत्री अनिल देशमुख व पालकमंत्री नितीन राऊत यांनी जिल्ह्यातील अवैध रेती घाटांवर छापे टाकले. मंगळवारी आकस्मिक संयुक्त दौरा करताना कुणाला मार्ग कळवण्यात आला नाही. एरवी मंत्र्यांचे पूर्वनियोजित दौरे असतात किंवा त्याचा प्रचार केला जातो. रेतीघाटातून होणाऱ्या तस्करीबाबत येणाऱ्या तक्रारींवरून मंत्र्यांनी ऐनवेळी दौरा निश्चित करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना सोबत घेतले. पोलिस ठाण्यांनाही भेटी दिल्या. त्यामुळे सर्व बेसावध होते. साधारणत: आयकर वा तत्सम विभागाच्या छाप्यांबाबत अशी गुप्तता पाळण्यात येते. मंत्र्यांसोबत उमरेडचे आमदार राजू पारवे व रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल, विभागीय आयुक्त संजीवकुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, पोलिस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना, पोलिस अधीक्षक राकेश ओला, खनिकर्म, परिवहनचे अधिकारी सोबत होते. पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार मुंबईत असल्याने ते सहभागी होऊ शकले नाहीत. दोन ज्येष्ठ मंत्र्यांनी रेती घाटांवर छापे टाकण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असावी. मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये भलेही सख्य नसले तरी, जिल्ह्यातील उभय पक्षांचे मंत्री एकत्र येण्यामागील ‘घाट’ काय, याची चर्चा सुरू झाली आहे.

  नागपूरहून निघालेला ताफा थेट सावनेरला पोहोचला. यानंतर खापा येथे नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणात खड्डे दिसून आले तर, बाजूला मोठ्या प्रमाणात रेती होती. कन्हान येथेही प्रचंड प्रमाणात अवैध साठा मिळाला. पावसाळ्यात मिनी वाळवंटात आलो की काय, असा भास यावेळी सर्वांना झाला. मौदा, उमरेड, आदी ठिकाणीही भेटी देण्यात आला. अवैध रेती घाटांचा गोरखधंदा बंद करून माफियांचे कंबरडे मोडण्याची सूचना मंत्र्यांनी केली.

  गय करणार नाही!:-

  रेतीचा अवैध उपसा केल्याने सरकारचे व पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. महसूल, पोलिस व पर्यावरण विभागाची संयुक्त समिती स्थापन करून कारवाई करण्यात येईल. माफियांची गय केली जाणार नाही आणि कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही चौकशीला सामोरे जावे लागेल.