✒️नागपुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नागपूर(दि.26जुलै):-चोरी करण्यासाठी मित्राने बळजबरी केल्याने बेरोजगार युवकाने गांधीसागरमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.

रोहित आसोले (वय २५, रा. गोपालनगर) असे मृतकाचे नाव आहे. लॉकडाउनमुळे रोहित बेरोजगार झाला. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले. त्यामुळे तीन दिवसांपूर्वी तो घरून बेपत्ता झाला. तो श्रद्धानंदपेठ भागात राहणाऱ्या डकाह नावाच्या मित्राला भेटला. ‘मी बेरोजगार आहे, जेवणसुद्धा केलेले नाही’, असे रोहितने डकाहला सांगितले. तीन दिवस डकाहने रोहितला घरी ठेवले, त्याचा सांभाळ केला. शुक्रवारी सायंकाळी डकाहने त्याला माटे चौकातील लोखंड चोरी करून आणण्यास सांगितले. लोखंड चोरीस रोहितने नकार दिला. त्यामुळे डकाह संतापला. ‘तीन दिवस मी तुला जेवण दिले, तुझ्या सर्व गरजा पूर्ण केल्या. आता तुला माझ्यासाठी चोरी करावीच लागेल. ते करायचे नसेल तर तुझ्या जेवणाचे दोन हजार रुपये परत कर, पैसे न दिल्यास तुला ठार मारेल’, अशी धमकी दिली. त्यामुळे रोहित तणावात आला. रात्री ८ वाजताच्या सुमारास तो गांधीसागर येथे आला. आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली व तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. शनिवारी सकाळी त्याचा मृतदेह तरंगताना आढळला. गणेशपेठ पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

क्राईम खबर , नागपूर, रोजगार, विदर्भ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED