आकाशवाणीवरील प्रमुख नाट्यनिर्माते!

75

(पु.ल.देशपांडे जयंती विशेष)

गुळाचा गणपती आणि सबकुछ पु.ल. म्हणून गाजलेल्या चित्रपटात पु.ल.देशपांडे यांच्या प्रतिभेच्या विविध पैलूंचे दर्शन घडते. ते शिक्षक, लेखक, नट, नकलाकार, गायक, नाटककार, विनोदकार, कवी, पेटीवादक, संगीत दिग्दर्शक, वक्ते आदी होते. त्यांनी एकपात्री-बहुपात्री नाटक, चित्रपट, नभोवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व क्षेत्रांत काम केले. अशा हरहुन्नरी व्यक्तिमत्वाची ओळख त्यांच्या जयंती निमित्त श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजीं करून देत आहेत… 

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच पु.ल.देशपांडे ऊर्फ भाई ऊर्फ पुल हे लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, नट, कथाकार व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक होते. त्यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असे म्हटले जाते. त्यांच्या आद्याक्षरांवरून महाराष्ट्रात ते पु.ल.म्हणून ओळखले जातात. त्यांचे मराठी भाषेवर विलक्षण प्रभुत्व होते. त्यांच्या भाषाप्रभुत्वाचे अनेक किस्से आहेत. त्यांच्यावर मराठीत भाई हा चित्रपट बनला आहे. या चित्रपटाचे दोन भाग आहेत. ते हजरजबाबीही होते, त्यामुळे त्यांची शेकडो वाक्सुमने आणि विनोदी किस्से आहेत. मराठी साहित्य व संगीतातील योगदानाव्यतिरिक्त पुलंचे आकाशवाणी, दूरदर्शन, नाट्य व चित्रपट क्षेत्रातील कार्य लक्षणीय आहे. ते उत्तम संवादिनी वादक होते, तसेच त्यांनी काही चित्रपटांचे संगीत दिग्दर्शनही केले. पु.ल.देशपांडे यांचा जन्म दि.८ नोव्हेंबर १९१९ रोजी मुंबईतील गावदेवी या भागात चांद्रसेनीय कायस्थ प्रभू- सीकेपी कुटुंबामध्ये झाला. त्यांचे बालपण जोगेश्वरी येथील सारस्वत कॉलनीत गेले. त्यांनी पार्ले टिळक विद्यालयात शालेय शिक्षण घेतले आणि नंतर पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात आणि सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात ते शिकले.

सन १९४०च्या दशकात साहित्यक्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी ते काही काळ शाळेमध्ये शिक्षक होते. सन १९४६ साली ते सुनीताबाईंशी विवाहबद्ध झाले. लेखक आणि कविवर्य वामन मंगेश दुभाषी ऊर्फ ऋग्वेदी हे त्यांचे आजोबा होते. ते साहित्याचे जाणकार होते. रवीन्द्रनाथ टागोर लिखित गीतांजली हा काव्यसंग्रह त्यांनी अभंग गीतांजली या नावाने मराठीत भाषांतरित केला होता.

देशपांडे यांचे वडील हे अडवाणी कागद कंपनीत दीडशे रुपये पगारावर फिरते विक्रेते होते. फिरतीवर असताना जेवणाखाण्याचा भत्ता मिळे. एकदा कोल्हापूरला असताना ते बहिणीकडे जेवले. त्यादिवशी त्यांनी भत्ता घेतला नाही, अशी आठवण पु.ल.देशपांडे यांनी सांगितली. ते लहानपणापासूनच धष्टपुष्ट होते. वयाच्या दुसऱ्या वर्षी ते पाच वर्षांच्या मुलाएवढे दिसत होते. ते हुशार होते आणि सतत काही ना काही करत असत. त्यांना स्वस्थ बसण्यासाठी घरचे लोक पैसा देऊ करायचे, पण हे त्यांना जमले नाही. आजोबांनी लिहून दिलेले आणि त्यांनी पाठ केलेले दहा-पंधरा ओळींचे पहिले भाषण वयाच्या पाचव्या वर्षी त्यांच्या शाळेत हावभावासहित खणखणीत आवाजात म्हणून दाखवले. सात वर्षे अशी भाषणे केल्यानंतर वयाच्या बाराव्या वर्षापासून ते स्वतःची भाषणे स्वतःच लिहू लागले. ते इतरांनाही भाषणे आणि संवाद लिहून देऊ लागले. त्यांना घरात खुप वाचन करायला व रेडिओवरील संगीत ऐकायला मिळाले.

त्यांच्या घरी संगीताच्या बैठकाही होत असत. ते घरीच बाजाची पेटी शिकले. टिळक मंदिरात एकदा बालगंधर्व आले असता त्यांनी पेटी वाजवून दाखवली. बालगंधर्वांनी शाबासकी दिली व भावी कलाजीवनासाठी शुभेच्छा दिल्या. लोकांच्या वागण्यातील विसंगती व हास्यास्पद गोष्टी हेरून ते त्या लोकांच्या नकला करायचे. म्हणून घरी कुणी आले असता पुरुषोत्तम जवळ नसलेलाच बरा, असे आईला वाटत असे. त्यांची आई कारवारी, वडील कोल्हापूरचे आणि बहीण कोकणात दिलेली, त्यामुळे घरात भोजनात विविधता असे. यातूनच ते खाण्याचे शौकीन झाले. वडिलांच्या मृत्यूनंतर ते गाण्याच्या, पेटीच्या व अन्य शिकवण्या घेऊ लागले. ते शाळेत असल्यापासूनच भावगीते गायचे आणि गीतांना चाली लावायचे. कॉलेजात असताना त्यांनी राजा बढे यांच्या माझिया माहेरा जा या कवितेला चाल लावली. आज ते गाणे मराठी भावसंगीतातील अनमोल ठेवा समजला जातो. ग.दि. माडगूळकरांनी लिहिलेल्या व भीमसेन जोशींनी गायलेल्या इंद्रायणी काठी या गीताला त्यांनी चाल लावली होती. तेही गाणे अजरामर झाले.

कॉलेजमध्ये असताना पु.ल. गायकांना साथ करीत. ते पेटी वाजवत, त्यांचा भाऊ रमाकांत तबला आणि मधुकर गोळवलकर सारंगी वाजवीत. मिळालेले १५ रुपये तिघेही वाटून घेत. पार्ले टिळक विद्यालयातून माध्यमिक शिक्षण पूर्ण करून ते मुंबईतील इस्माईल युसुफ कॉलेजातून इंटर व सरकारी लॉ कॉलेजमधून एलएलबी झाले. कलेक्टर कचेरी व प्राप्तीकर विभागात ते काही काळ नोकरी करून पुण्याला आले. त्यापूर्वी ते पेट्रोल रेशनिंग ऑफिसमध्ये कारकून आणि ओरिएंटल हायस्कूलमध्ये शिक्षक होते. पुण्याला आल्यावर त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमधून बीए आणि एमए केले. याच महाविद्यालयात असताना त्यांनी चिंतामण कोल्हटकरांच्या ललित कलाकुंज व नाट्यनिकेतन या नाट्यसंस्थांच्या नाटकांतून भूमिका करायला सुरुवात केली. सन १९३७पासून नभोवाणीवर पु.ल.देशपांडे छोट्या मोठ्या नाटिकांत भाग घेऊ लागले. त्या वर्षी त्यांनी अनंत काणेकरांच्या पैजार या श्रुतिकेत काम केले. सन १९४४ साली त्यांनी लिहिलेले पहिले व्यक्तिचित्र भट्या नागपूरकर हे अभिरुची या नियतकालिकातून प्रसिद्ध झाले. याच दरम्यान त्यांनी सत्यकथामध्ये जिन आणि गंगाकुमारी ही लघुकथा लिहिली. सन २०१४मध्ये प्रकाशित झालेले बटाट्याची चाळ हे त्यांचे विनोदी पुस्तक प्रसिद्ध आहे. सन १९४८ साली त्यांनी तुका म्हणे आता हे नाटक आणि बिचारे सौभद्र हे प्रहसन लिहिले.

दूरदर्शनच्या पहिल्यावाहिल्या प्रसारणासाठी पंडित नेहरूंची दूरदर्शनसाठी मुलाखत घेणारे पुलं हे भारतीय दूरदर्शनचे पहिले मुलाखतकार होते. साहित्य अकादमी, संगीत नाटक अकादमी या दोहोंचे पुरस्कार मिळवणाऱ्या मोजक्या प्रतिभावंतात त्यांचा समावेश होतो. मुंबईच्या नॅशनल सेंटर फॉर परर्फॉर्मिंग आर्ट्‌स- एनसीपीए या संस्थेत पुलंनी अनेक प्रयोग केले. संशोधकांना आधारभूत होतील असे असंख्य संदर्भ, कलांचा इतिहास, ध्वनिफिती, मुलाखती, लेख आदी बरेच साहित्य त्यांनी जमा करून ठेवले आहे. मराठी नाटकाचा आरंभापासूनचा इतिहास त्यांनी अशा जबरदस्त प्रयत्‍नान्ती जमा केला की त्यांच्यावरून स्फूर्ती घेऊन भारतातील अनेक जणांनी त्यांच्या त्यांच्या प्रांतांतील कलांचा इतिहास जमा करून नोंदवायची सुरुवात केली. एनसीपीएच्या रंगमंचावर त्यांनी देवगाणी, बैठकीची लावणी, दोन पिढ्यांची गायकी असे काही अनोखे कार्यक्रम सादर केले. ते भाषाप्रेमी होते. त्यांना बंगाली, कानडी येत असल्याने ते त्या त्या समाजातील लोकांत सहज मिसळत. दि.१२ जून २००० रोजी वयाच्या ८१व्या वर्षी पुण्यातील प्रयाग रुग्णालयात पुलंचे निधन झाले.

!! जयंती दिनी त्या हरहुन्नरी व्यक्तिमत्वाला साष्टांग दंडवत प्रणाम !!

✒️श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी.(देशविदेशी प्रभावशाली व्यक्तिमत्वांचे गाढे अभ्यासक व विश्लेषक)मु. रामनगर वॉर्ड क्र.२०, गडचिरोली.पो. ता. जि. गडचिरोली.
भ्रमणध्वनी – ९४२३७१४८८३