विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या बालपण व शिक्षणातून मिळणारा संदेश

    87

     

    न्यायपंडित,सर्व शास्त्रात दिग्विजयी झालेले ,सर्व विद्या संपन्न,आकाशातील सूर्य आणि पूर्ण चंद्राप्रमाणे सुशोभित सत धम्म मार्गदर्शक, धर्मप्रवर्तक,
    समाज सुधारक,राजकारणी, अस्पृश्य लोकांविरुद्ध होणारा सामाजिक व इतर क्षेत्रातील भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारणारे ,भारताचे पहिले कायदेमंत्री,भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र वंदन ॥
    डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील सुभेदार रामजी मालोजीराव सपकाळ होते. सन 1848 च्या सुमारास जन्मलेले रामजी यांचे शिक्षण सुरू असतानाच ते सन 1866च्या सुमारास वयाच्या 18 वर्षी इंग्रजी सैन्याच्या 106 सॅपर्स अँड
    मायनर्स तुकडीत शिपाई पदावर भरती झाले .रामजींचा विवाह 19 व्या वर्षी मुरबाड येथील तेरा वर्षीय भीमाबाईंशी झाला. भीमाबाईंचे वडील इंग्रजी सैन्यात सुभेदार पदावर होते.रामजींनी संत कबीरांचे दोहे आणि संतांचे अभंग पाठ केले होते. इंग्रजी सैन्यात शिपाई असताना सैनिकी शाळेत त्यांचे इंग्रजी शिक्षण सुरू झाले.त्यांनी इंग्रजी भाषा आत्मसात करून इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळविले म्हणून त्यांनी नॉर्मल स्कूलच्या मॅट्रिकच्या परीक्षेत उत्तम यश मिळविले. त्यामुळे त्यांना सैनिकी शाळेत (नॉर्मल स्कूल )शिक्षक पदावर नोकरी मिळाली.या त्यांच्या पदोन्नतीमुळे सर्वांनाच आनंद झाला.पुढे उत्तम शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांचा पुण्याच्या सैनिकी शाळेत प्रवेश प्राप्त झाला. प्रशिक्षित शिक्षक झाल्यावर इंग्रजी राज्यसत्तेच्या सैनिकी शाळेत पदोन्नती होऊन ते मुख्याध्यापकपदी रुजू झाले व सतत 14 वर्षे मुख्याध्यापक असताना शेकडो विद्यार्थ्यांना त्यांनी घडविले मुख्याध्यापक पदानंतर सुभेदारपदी त्यांची पदोन्नती झाली,तेव्हापासून ते सुभेदार रामजी सपकाळ म्हणून ओळखले जाऊ लागले.
    सुभेदार ( मेजर ) रामजी मालोजी सपकाळ व भीमाबाई यांना सन १८९१ पर्यंत१४ अपत्ते
    झाली त्यापैकी गंगा,रमा,मंजुळा व तुळसा या मुली आणि बाळाराम,आनंदराव व भीमराव (भीवा )ही तीन मुले हयात होती.
    सुभेदार रामजी सपकाळ ज्या पलटणीत होते ती फलटण सन1888 साली मध्यप्रदेशातील
    ” महू “येथे लष्करी तळावर आली होती.महुला ” मिलिटरी
    हेडकॉर्टर्स ऑफ वॉर ” ओळखले जाई.सुभेदार रामजी महू येथील नॉर्मल स्कूलच्या मुख्याध्यापक पदी रुजू झाले.दि.14 एप्रिल 1891 ला लष्करी छावणी असलेल्या मध्यप्रदेशातील महू या गावी (आजचे डॉ.आंबेडकर नगर ) रामजी व भीमा बाईच्या पोटी एका तेजस्वी रत्नाचा जन्म झाला . त्या तेजस्वी रत्नाचे नाव ठेवण्यात आले भीमराव ( भिवा ).हा भिवा म्हणजे रामजी व भीमाबाईचे सर्वात लहान चौदावे व शेवटचे अपत्य होते.हा भिवा म्हणजे दीर्घ बौद्धिक परिश्रमाच्या बळावर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार झालेले विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर होतं.
    रामजी सपकाळ यांचे कुटुंब महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात असलेल्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे या ग्रामातील होते . सन 1894 मध्ये सुभेदार रामजी सपकाळ इंग्रजी सैन्यातील मुख्याध्यापकपदावरून सेवानिवृत्त झाले,म्हणून ते महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात असलेल्या मूळ गावाजवळच्या दापोली या ग्रामातील कॅम्प दापोली वस्तीमध्ये कुटुंबासह राहू लागले.त्यांना दापोली येथील शाळेत भीमराव वयाने लहान असल्यामुळे प्रवेश मिळाला नाही त्यामुळे भीमरावांना घरीच अक्षर ओळख करून द्यावी लागली . सन 1896 ला कबीर पंथीय रामजी सपकाळ दापोली सोडून कुटुंबासह साताऱ्याला राहू लागले तेव्हा भीमरावांचे वय पाच वर्षाचे होते .
    रामजींनी सन १८९६ च्या नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील कॅम्प स्कूल या मराठी शाळेमध्ये भीमरावांचे नाव दाखल करून शिक्षणाची सुरुवात केली.1896 मध्ये भीमरावांचे मातृछत्र हरपले मातोश्री भीमाबाई आनंतात विलीन झाल्या.पाच वर्षाचा भीम मातृप्रेमापासून दुरावला पण भीमरावांची आत्या मीराबाईने भीमासह घरातील इतर मुलांचेही
    कठीण परिस्थितीत संगोपन केले.सातारा येथे आल्यावर काही दिवसानंतर भाड्याने घेतलेल्या एका बंगल्यामध्ये रामजींचा परिवार राहू लागला.बाळ भीम हा खूप बुद्धिमान झाला पाहिजे,
    पुढे त्याने दिनदलित समाजाचा उद्धार केला पाहिजे अशी इच्छा त्यांचे वडील मेजर रामजींची होती म्हणूनच त्यांनी बाळ भीमावर शिक्षण,शिस्त,स्वावलंबन, स्वाभिमान व कठोर परिश्रम ही मूल्ये रुजवली होती.या वडिलांनी केलेल्या मूल्याची जपणूक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जीवनभर केली आणि स्वतः सोबतच भारतीय समाज बांधवांचेही जीवन घडविले.
    महाराष्ट्रातील कोकणासह बहुतेक विभागात पूर्वीचे लोक स्वतःचे आडनाव स्वतःच्या गावाच्या नावावरून ठेवून गावाच्या नावाच्या शेवटी ” कर ” हा शब्द जोडण्याची पद्धत होती म्हणूनच भीमरावांचे वडील रामजी यांनी दि. 7 नोव्हेंबर 1900 या दिवशी साताऱ्यातील गव्हर्नमेंट हायस्कूल (आजचे प्रतापसिंह हायस्कूल ) मध्ये स्वतःच्या मूळ गावाचे नाव आ आंबडवे असल्यामुळे
    ” आंबडवेकर “असे आडनाव तेथील शिक्षकांना नोंदवायला सांगितले म्हणजे “भीमराव रामजी आंबडवेकर “असे दाखल खारीज रजिस्टरवर दि. 7 नोव्हेंबर 1900 ला लिहिल्या गेले.सात नोव्हेंबर हा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा शाळेच्या प्रवेशाचा दिवस म्हणून सात नोव्हेंबर हा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा
    ” शाळा प्रवेश दिन ” म्हणून साजरा केला जातो .
    साताऱ्याच्या याच हायस्कूलमध्ये भीमराव रामजी आंबडवेकर यांना शिकविण्या करिता ” कृष्णा केशव आंबेडकर ” नावाचे शिक्षक होते.शाळेच्या दाखल खालील रजिस्टर मध्ये नोंदविलेले आंबडवेकर आडनाव त्यांना अवघड वाटायचे म्हणून त्यांनी माझे आंबेडकर आडनाव तू आंबडवेकर ऐवजी धारण केले तर चालेल का ? असे सुचविले असता भीमरावने होकार दिल्यामुळे आंबेडकर हे आडनाव नोंदविल्या गेले तेव्हापासूनच भीमरावांचे आडनाव आंबडवेकर ऐवजी आंबेडकर झाले.
    सन 1904 च्या नोव्हेंबर महिन्यात भीमरावांनी इंग्रजी चौथ्या वर्गाची परीक्षा उत्तीर्ण केली व त्याच वेळी वडील रामजी कुटुंबासह मुंबईला गेले आणि तेथे लोअर परळ भागामध्ये डबक चाळ (बदक चाळ )येथे घराच्या एका खोलीत राहायला सुरुवात केली व तेथील एल्फिन्स्टन शासकीय हायस्कूलमध्ये
    भीमरावचे नाव दाखल केले.
    या हायस्कूलमध्ये प्रवेश घेणारे ते पहिले अस्पृश्य विद्यार्थी होते. इतर जातीतील लोकांचा भीमरावांच्या शिक्षणामध्ये अडसर येत असल्यामुळे ,विरोध होत असल्यामुळे रामजींनी आपल्या लष्करातील पदाचा उपयोग केला तरी शाळेत भीमरावांना इतर विद्यार्थ्यांपासून वेगळे बसून शिक्षण घ्यावे लागत असे,तेथील शिक्षकही या गोष्टीकडे लक्ष देत नसत अर्थात याबाबत शिक्षकांचेही सहाय्य भीमरावांना मिळत नसे.भीमरावांना शाळेत तहान लागली तर शाळेत असलेल्या पाणी पिण्याच्या भांड्याला अथवा ग्लासला स्पर्ष करण्याची परवानगी त्यांना नव्हती अशावेळी उच्च जातीतील व्यक्ती उंचीवरून त्यांच्या ओंदळीवर पाणी ओतत असे भीमराव आंबेडकरांसाठी हे ओंजळीवर पाणी ओतण्याचे काम शाळेतील शिपाई करीत असे.शिपाई नसल्यास दिवसभर त्यांना पाण्याविनात राहावे लागे. पुढे त्यांनी आपल्या लेखनात “शिपाई नाही तर पाणी नाही” असे या प्रसंगाचे वर्णन केलेले आहे.असे असतानाही भीमराव प्रत्येक विषयाचा अभ्यास दररोज नियमित मनापासून करीत असे.याचाच अर्थ असा की त्यांनी हायस्कूलमध्ये आलेल्या या सर्व संकटांना मात करून सतत अभ्यास केला मनावर त्याचा कोणताही परिणाम होऊ दिला नाही म्हणूनच ते विद्यार्थी असताना 18 -18 तास अभ्यास करीत असत आणि पुढे या विद्यार्थी जीवनातील अभ्यास करण्याच्या आदर्श सवयीचा परिणाम पुढील उच्च शिक्षण घेताना व विविध प्रकारचे कार्य करण्यासाठी विविध ग्रंथांचे वाचन करताना त्यांना झाला कारण वयाच्या 40 वर्षीही ते 18 – 18 तास सतत वाचन करीत असत . आदर्श विद्यार्थी जीवन असले तर त्याचा परिणाम भविष्यात किती चांगला होऊ शकतो हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे उदाहरण प्रत्येक विद्याथ्यनि थ लक्षात ठेवले पाहिजे.
    सन 1906 मध्ये 14 -15 वर्षाचे असताना भीमरायांचा विवाह दापोली येथील भिकू वलंगकर यांची नऊ दहा वर्षीय कन्या रामीबाई उर्फ रमाबाईशी झाला.विवाहानंतरही त्यांचे शिक्षण निरंतर सुरूच होते. एल्फिन्स्टन हायस्कूल मधील अनेक शिक्षक भीमरावांकडे लक्ष देत नसत.तिरस्कार करीत असत या अशा गोष्टींचा भीमराव आपल्या मनावर वाईट परिणाम होऊ न देता अठरा अठरा तास अभ्यास करीत असत.हा अभ्यास विषयक त्यांचा गुण आजच्या विद्यार्थ्यांनी आचरणात आणण्याची खूप गरज आहे कारण आजच्या टीव्ही,मोबाईल लॅपटॉपच्या युगात विद्यार्थी अभ्यासापासून कसा दूर पळत आहे हे त्यांच्या पालकांनाही कळत नाही म्हणून हा अभ्यास विषयक दीर्घोद्योगाचा विद्यार्थी जीवनातील डॉ.आंबेडकरांचा अतिशय अनमोल असा गुण आजच्या विद्यार्थ्यांनी आचरणात आणलाच पाहिजे. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणतात की,
    “आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही.आम्ही आमच्यातील आत्मविश्वास गमावता कामा नये.कोणताही मनुष्य सतत दीर्घोद्योगानेच पराक्रमी व बुद्धिमान होऊ शकतो.कोणीही मनुष्य उपदत बुद्धिमान अगर पराक्रमी निपजू शकत नाही.दीर्गोद्योग व कष्ट करण्यानेच यश प्राप्ती होते.मी विद्यार्थी दशेत इंग्लंडमध्ये असताना ज्या अभ्यासक्रमासाठी आठ वर्षे लागतात तो अभ्यासक्रम मी दोन वर्षा तीन महिन्यात यशस्वी तऱ्हेने पूर्ण केला.हे करण्यासाठी मला 24 तासांपैकी सारखा 18 तास अभ्यास करावा लागत असे,जरी माझी चाळीशी उलटून गेली तरी मी 24 तासांपैकी सारखा १८ तास अजूनही खुर्चीवर बसून अभ्यास करीत असतो. अलीकडच्या तरुणाला तर अर्धातास सारखा बसला की
    चिंमट्याच्या चिंमट्या नाकात तपकीर कोंबावी लागते.नाहीतर सिगारेट आढीत हातपाय ताणून काही काळ पडल्याशिवाय उत्साह येत नाही. मला या वयात सुद्धा यापैकी कशाचीही गरज भासत नाही .”आजच्या प्रलोभनाच्या युगातील विद्यार्थ्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे हे विचार आचरणात आणण्याची आवश्यकता आहे .
    सन 1907 मध्ये भीमराव एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये मॅट्रिकच्या परीक्षेत अतिशय चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाले.मॅट्रिकची परीक्षा उत्तम गुणांनी पास झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबाला व समाज बांधवांना खूप आनंद झाला.समाज बांधवांनी कृष्णाजी अर्जुन केळुस्कर गुरुजींच्या अध्यक्षतेत भीमरावांचे अभिनंदन करण्यासाठी एका सभेचे (कार्यक्रमाचे )आयोजन केले.याप्रसंगी केळुस्कर गुरुजींनी भीमरावांचे आपल्या भाषणातून कौतुक करून अभिनंदन केले व स्वतः लिहिलेले मराठी भाषेतील बुद्धचरित्राच्या पुस्तकाची प्रत भीमराव यांना भेट म्हणून दिली.
    आदरणीय केळुस्कर गुरुजींनी दिलेले बुद्धचरित्र वाचल्यावर भीमरावांना पहिल्यांदाच बुद्धाच्या मानवतावादी व शांततावादी शिकवणुकीची माहिती प्राप्त झाल्यामुळे भीमराव तेव्हापासूनच गौतम बुद्धाकडे आकर्षित झाले होते.
    सेवानिवृत्त झालेल्या रामजींना आर्थिक अडचणींना पुढे सामना करावा लागला.ते भीमरावांना महाविद्यालयीन शिक्षण देऊ शकणार की नाही अशी अवस्था त्यांच्या जीवनात निर्माण झाली होती.हे कृष्णाजी अर्जुन केळुस्कर गुरुजींना माहिती झाल्यावर त्यांनी महाराज सयाजीराव गायकवाड यांच्यासोबत मुंबईमध्ये भेट घडवून आणली.भीमरावांची चणाक्ष बुद्धी व दीर्घ बौद्धिक परिश्रम करण्याची जिद्द बघून महाराज सयाजीराव गायकवाड यांनी महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी भीमरावांना दरमहा 25 रुपये शिष्यवृत्ती देण्याचे मंजूर केल्यामुळे भीमरावांचा महाविद्यालयात शिक्षण घेण्याचा मार्ग मोकळा झाला .पुढे 1908 सालातील जानेवारी महिन्याच्या तीन तारखेला भीमराव आंबेडकरांनी महाविद्यालयात प्रवेश घेतला .सन 1912 मध्ये भीमराव यांनी मुंबई विद्यापीठाची राज्यशास्त्र व अर्थशास्त्र विषय घेऊन बी.ए. पदवी यशस्वीपणे प्राप्त केली.ही पदवी प्राप्त करणारे भीमराव हे अस्पृश्य वर्गातील पहिले विद्यार्थी होते.
    बी.ए.ची पदवी प्राप्त केल्यानंतर भीमरावांसमोर नोकरी करणे व घरची आर्थिक परिस्थिती चांगली करणे अथवा उच्च शिक्षण घेऊन स्वतःची शैक्षणिक पात्रता वाढविणे हे पर्याय जीवनात असताना महाराज सयाजीराव गायकवाड बडोदा संस्थांच्या वतीने काही विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला पाठविण्याच्या विचारात असताना भीमराव महाराजांना भेटले तेव्हा आंबेडकरांना उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देऊन अमेरिकेत पाठविण्याचा विचार केल्यानंतर दि.4 एप्रिल 1913 रोजी बडोदा संस्थांच्या विद्याधिकार्‍यांनी परदेशात अभ्यास करण्यासाठी जे चार विद्यार्थी निवडले त्यात भीमराव आंबेडकर होते.त्यांना दरमहा साडेअकरा पाऊंड शिष्यवृत्ती मंजूर झाल्यामुळे भीमरावांचा उच्च शिक्षण घेण्याचा मार्ग मोकळा झाला.या शिष्यवृत्तीची मुदत दि.15 जून 1913 ते
    दि.14 जून 1916 पर्यंत तीन वर्षाची होती.दि. 21 जुलै
    1913 रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील कोलंबिया विद्यापीठांमध्ये राज्यशास्त्र शाखेत त्यांनी जुलै – 1913 ते जून -1916 या तीन वर्षासाठी प्रवेश घेतला .अर्थशास्त्र हा प्रमुख विषय आणि त्यासोबत समाजशास्त्र,इतिहास राज्यशास्त्र,मानववंशशास्त्र व तत्वज्ञान हे विषय निवडले.
    डॉ.बाबासाहेब आंबेडकर विदेशातून अर्थशास्त्र या विषयात पीएच.डी. (डॉक्टरेट )ही पदवी मिळवणारे भारतातील पहिले विद्यार्थी होते.याशिवाय दक्षिण आशियामधून दोनदा डॉक्टरेट (पीएच.डी. व डी. एससी ) पदव्या प्राप्त करणारे दक्षिण आशियातील पहिले विद्यार्थी होते. भीमरावांनी 1923 पर्यंत मुंबई विद्यापीठ ,कोलंबिया विद्यापीठ , लंडन स्कूल ऑफ
    इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन या प्रतिष्ठित विद्यापीठामधून उच्च शिक्षण घेऊन भारत देशाचे नाव विश्वात पोहोचवले.कोलंबिया विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत असताना तेथील अर्थशास्त्राचे प्राध्यापक एडविन आर.के. सेलिग्मन यांचे डॉ.आंबेडकर आवडते विद्यार्थी होते.लाला लजपतराय यांनी डॉ. आंबेडकरांच्या ज्ञानाची स्तुती केली तेव्हा प्राध्यापक सेलिंग्मन म्हणाले की,भीमराव आंबेडकर हे केवळ भारतीय विद्यार्थ्यांमध्येच नव्हे तर अमेरिकन विद्यार्थ्यांमध्ये सर्वात बुद्धिमान विद्यार्थी आहेत. भीमराव आंबेडकरांनी एम.ए. च्या पदवीसाठी एन्शंट इंडियन कॉमर्स ( प्राचीन भारतीय व्यापार )या विषयावर प्रबंध लिहून तो दि. 15 मे 1915 ला कोलंबिया विद्यापीठाला सादर केला.दि.2 जून 1915 ला त्यांना कोलंबिया विद्यापीठाने एम.ए.ची पदवी प्रदान केली.हा प्रबंध पुढे
    ” ऍडमिशन अँड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी “या नावाने प्रकाशित केला.
    भीमरावांनी पीएच.डी. पदवीसाठी ” द नॅशनल डिव्हीडंट ऑफ इंडिया : अ हिस्टॉरिकल अँड अँनलाटिकल स्टडी ” ( भारताचा राष्ट्रीय लाभांश : इतिहासात्मक आणि विश्लेषणात्मक अध्ययन ) नावाचा प्रबंध लिहिला . सन 1917 मध्ये कोलंबिया विद्यापीठाने त्यांचा हा प्रबंध स्वीकारून त्यांना पीएच.डी. (डॉक्टर ऑफ फिलॉसाफी )ही पदवी देण्याचे मान्य केले.मात्र यासोबत एक अटही घातली की ज्यावेळी हा प्रबंध छापून येईल त्याच्या काही प्रती विद्यापीठात सादर केल्या जातील तेव्हाच आंबेडकरांना पीएच.डी. ही पदवी रीतसर त्यांना दिली जाईल.मात्र त्यांचा हा प्रबंध 1917 मध्ये विद्यापीठाने स्वीकारल्यामुळे आंबेडकरांना त्यांच्या नावापुढे डॉक्टर हा शब्द लावण्याची अनुमती दिली होती.
    तदनंतर डॉ.आंबेडकरांचा पीएच.डी.चा प्रबंध ” ब्रिटिश भारतातील प्रांतीय अर्थव्यवस्थेची उत्क्रांती ” या नावाने लंडन येथील पी.एस. किंग अँड कंपनी ” ने ग्रंथरूपात प्रकाशित केला. डॉ. आंबेडकरांनी या ग्रंथरूपातील प्रबंधाच्या प्रती कोलंबिया विद्यापीठात सादर केल्यानंतर त्यांना पीएच डी. ही डॉक्टरेट ची पदवी समारंभ पूर्वक प्रदान करण्यात आली.या पदवीचे मार्गदर्शक प्रा.सेलिग्मन यांनी या ग्रंथाला प्रस्तावना लिहिलेली होती. डॉ.आंबेडकरांनी हा ग्रंथ “महाराज सयाजीराव गायकवाड ” यांना कृतज्ञतापूर्वक अर्पण केलेला आहे.
    पुढील शिक्षणासाठी लंडन येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पोहोचले.तेथे ” लंडन स्कूल इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स आणि ग्रेज इन “मध्ये प्रवेश करून अभ्यासाला सुरुवात केली. ते सकाळी सहा वाजता ग्रंथालयात जात असत.दररोज ग्रंथालयात प्रथम प्रवेश करणारे ते पहिले विद्यार्थी होते.दिवसभर पुरेल इतके ग्रंथ साहित्य घेऊन एका बैठकीमध्ये अखंडपणे सतत अभ्यास करीत असत.सायंकाळी ग्रंथालय बंद होताना ग्रंथालयातून सर्वात शेवटी निघणारे ते विद्यार्थी होते.राहण्याच्या ठिकाणीही ते रात्र रात्रभर सतत आणि नियमित अभ्यास करीत.
    “विद्यार्थी जीवन।आदर्श आलय। अभ्यासाचे लय । विस तास”
    ” प्रचंड बुद्धीची । गरुड भरारी । विद्येची ती वारी । जीवनात ॥”
    आदर्श विद्यार्थी कसा असावा तर डॉ.आंबेडकरांसारखा 18 -18 तास अभ्यास केल्यानंतर अभ्यासाचा कंटाळा न करणारे तत्कालिन काळातील ते ऐकमेव विद्यार्थी होते .या त्यांच्या विद्यार्थी जीवनातील संदेशाचे आचरण आजच्या प्रलोभनाच्या युगातील विद्यार्थ्यांनी करणे आवश्यक आहे.तेथे एका वर्षातच डॉ. आंबेडकरांनी त्यांचा ” ब्रिटिश भारतातील साम्राज्यीय अर्थव्यवस्थेचे प्रांतीय विकेंद्रीकरण ( प्रॉव्हिन्शियल
    डीसेंट्रलायझेशन ऑफ इम्पिरियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया ) हा शोध प्रबंध तयार केला आणि जून 1921 मध्ये एम. एस्सी.पदवीसाठी लंडन विद्यापीठात सादर करून विद्यापीठाने अर्थशास्त्रातील एम. एस्सी.ही पदवी प्रदान केली.जून 1922 ग्रेज इन संस्थेने त्यांना ” बॅरिस्टर – अँट – लॉ ” ही कायद्याची उच्च पदवी प्रदान केली.तदनंतर ” द प्रॉब्लेम ऑफ रुपी ” (रुपयाचा प्रश्न ) हा अर्थशास्त्रीय प्रबंध तयार करून डॉक्टर ऑफ सायन्स (डी.एस्सी.)
    च्या पदवीसाठी ऑक्टोबर 1922 मध्ये लंडन विद्यापीठात सादर केला.विद्यापीठाने त्यांना 1923 सालातील नोव्हेंबर महिन्यात ब डी . एस्सी. (डॉक्टर ऑफ सायन्स ) ही पदवी प्रदान केली तर डिसेंबर 2023 मध्ये लंडनच्या पी.एस.किंग अँड कंपनी प्रकाशन संस्थेने ” द प्रॉब्लेम ऑफ रुपी ” हा प्रबंध ग्रंथरूपात प्रकाशित केल्यामुळे अर्थशास्त्र व राज्यशास्त्र या ज्ञानशाखेतील तज्ज्ञज्ञानी तथा निष्णात कायदे पंडित म्हणून डॉ.आंबेडकर ओळखले जाऊ लागले .
    “प्रज्ञेचा प्रकाश । समतेचे बोल । क्रांतीची मशाल ।भीमराव ॥”
    विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विविध विद्याशाखेतील पदव्या दीर्घ बौद्धिक परिश्रमातून प्राप्त केल्यानंतर त्यांचा उपयोग भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बनून संपूर्ण भारतीय लोकांसाठी, त्यांच्या प्रगतीसाठी,त्यांच्या विविध प्रकारच्या हक्कांसाठी केला.आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे खूप मोठे योगदान लाभलेले आहे.विश्वरत्न
    डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या बालपण आणि शिक्षणातून मिळणारा हा संदेश आज आचरणात आणणे ही काळाची गरज आहे.
    बाबासाहेबांचे । ज्ञान हेच धन । करांनी वंदन । कोटी कोटी ॥

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर
    राज्यस्तरीय साहित्यरत्न
    गौरव पुरस्कार
    प्राप्त
    -प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
    रुक्मिणी नगर,अमरावती.
    भ्रमणध्वनी :८०८७७४८६०९