बुद्ध आणि त्यांचा धम्म” ग्रंथकार! (डाॅ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन सप्ताह विशेष.)

51

 

_डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली २ मे १९५० रोजी भारतात पहिली सार्वजनिक बुद्ध जयंती दिल्ली येथे साजरी झाली होती. याप्रसंगी आंबेडकरांनी बुद्धांच्या जीवन कार्यावर विचार मांडले. या जयंती समारंभास अनेक देशांचे प्रतिनिधी, भिक्खू संघ व सुमारे वीस हजार लोकांचा समुदायही उपस्थित होता. विश्ववंद्य बाबासाहेबांनी ५ डिसेंबरच्या सायंकाळी ‘‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’‘ या ग्रंथाच्या प्रास्ताविक आणि परिचय या दोन प्रकरणांच्या प्रती आणून त्यांनी रात्री त्यांची तपासणी केली. दुसऱ्या दिवशी पहाटे १२.१५ वाजता ६ डिसेंबर इ.स. १९५६ रोजी दिल्लीला निवासस्थानी त्यांचे महापरिनिर्वाण- निधन झाले. ज्ञानवर्धक माहिती वाचा शेतकरीपुत्र- श्रीकृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजींच्या या लेखात… संपादक._

भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म दि.१४ एप्रिल १८९१ रोजी झाला. हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य-दलित लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार किंवा आधुनिक भारताचे निर्माते असेही म्हणतात.
इ.स.१९५१मध्ये आंबेडकरांच्याच अध्यक्षतेखाली तीन दिवसीय बुद्ध जयंती महोत्सव साजरा झाला. इ.स. १९५६ला आंबेडकरांनी आपल्या आयुष्यातील शेवटची बुद्ध जयंती दिल्लीतच साजरी केली. आंबेडकरांनी दिल्लीशिवाय महाराष्ट्रातही बुद्ध जयंतीस इ.स. १९५३ पासून सुरुवात केली. इ.स. १९५६ पर्यंत त्यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख उपस्थितीत बुद्ध जयंतीचे महाराष्ट्रात भव्य कार्यक्रम झाले. महाराष्ट्रातले बुद्ध जयंतीचे कार्यक्रम प्रामुख्याने मुंबईत झाले. भारतात व महाराष्ट्रात बुद्ध जयंती महोत्सवाच्या परंपरेची सुरुवात आंबेडकरांनी केली, म्हणून त्यांना भारतातील सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सवाचे प्रणेते समजले जाते. इतर सर्व धर्मसंस्थापकांच्या जन्मदिनी देशात सुट्टी मिळते. मग मानवतेचा महान संदेश देण्याऱ्या तथागत बुद्धांच्या जयंतीस सुट्टी का नाही? एक तर नियोजित सुट्ट्यातील एक सुट्टी कमी करा अथवा एक सुट्टी वाढवून आम्हाला द्या. अशी आग्रही मागणी डॉ.आंबेडकरांनी तत्कालीन केंद्र सरकारकडे केली होती. बुद्ध जयंती दिनी सार्वजनिक सुट्टी असावी, ही सन १९४२पासूनच मागणी होती. त्यांच्या प्रयत्नांमुळे व दबावामुळे दि.२७ मे १९५३ रोजी केंद्र सरकारने बुद्ध जयंती निमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. महाराष्ट्र सरकारने मात्र त्या वर्षी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली नाही. या सर्व बाबींचा उल्लेख आंबेडकरांनी सन १९५३च्या आपल्या मुंबईतील बुद्ध जयंती कार्यक्रमाच्या भाषणात स्वतः केला आहे.
नागपूर व चंद्रपूर येथील धर्मांतराचे झाल्यावर डाॅ.आंबेडकर दिल्लीला परतले. त्यानंतर काही आठवड्यात दि.२० नोव्हेंबर १९५६मध्ये ते नेपाळमधील काठमांडूला वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टच्या चौथ्या परिषदेस हजर राहिले. तेथे त्यांनी बुद्ध की कार्ल मार्क्स या विषयावर भाषण केले. त्यात त्यांनी भगवान बुद्धाचा मार्ग मार्क्सपेक्षा श्रेष्ठ आहे, ज्यात प्रेम, न्याय, बंधुत्व, विज्ञानवाद असून तो शोषण समाप्त करू शकतो असे सांगितले. आपल्या परतीच्या प्रवासात त्यांनी बनारसमध्ये दोन भाषणे दिली. दिल्लीमध्येही त्यांनी विविध बौद्ध समारंभांत भाग घेतला. त्यानंतर त्यानी राज्यसभेच्या अधिवेशनात भाग घेतला आणि आपल्या ‘‘भगवान बुद्ध आणि कार्ल मार्क्स’‘ या पुस्तकाचे शेवटचे प्रकरण लिहून पूर्ण केले. ५ डिसेंबरच्या सायंकाळी ‘‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’‘ या ग्रंथाच्या प्रास्ताविक आणि परिचय या दोन प्रकरणांच्या प्रती आणून त्यांनी रात्री त्यांची तपासणी केली. दुसऱ्या दिवशी पहाटे १२.१५ वाजता ६ डिसेंबर इ.स. १९५६ रोजी दिल्लीला निवासस्थानी त्यांचे निधन- महापरिनिर्वाण झाले. त्यावेळी त्यांचे वय ६४ वर्ष आणि ७ महिन्याचे होते. दिल्लीहून विशेष विमानाने त्यांचे पार्थिव मुंबईला आणण्यात आले. मुंबई हे ठिकाण अत्यंविधीसीठी निश्चित झाले, त्यानंतर देशभरातील त्यांचे अनुयायी मिळेल त्या साधनाने मुंबईला येऊ लागले. डाॅ.आंबेडकर यांच्या धर्मांतरानंतरच्या सात आठवड्यांत त्यांनी बौद्ध धम्माच्या प्रचारासाठी मोठे कार्य केले. त्यांची अंत्ययात्रा राजगृह, हिंदू कॉलनी, दादर येथून दुपारी १.४० वाजता निघाली. दादर व्हिन्सेन्ट रोड (आताचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड), पोयबावडी, परळ, एलफिन्स्टन ब्रिज, सयाजी रोड, गोखले रोड,उत्तर व दक्षिण, रानडे रोडवरून दादर चौपाटीवरील हिंदू स्मशानभूमीत- आताच्या चैत्यभूमीत सायकांळी ६ वाजता पोहोचली. चार मैल लांबीच्या या त्यांच्या अंत्ययात्रेत देशभरातून १५ लाखांवर लोक सामील झाले होते. दि.७ डिसेंबर १९५६ रोजी सायंकाळी ७.५० वाजता त्यांच्यावर मुंबई मध्ये बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबई हे त्यांच्या जीवनकार्यातील अधिकांश काळ मुख्यालय होते आणि तेथेच त्यांचे अजूनही सर्वात जास्त अनुयायी होते. मुंबई शहरातील ती सर्वात मोठी अत्यंयात्रा होती. त्यानंतर दहनसंस्कारास उपस्थित राहिलेल्यापैंकी एक लाख लोक त्यांच्या अस्थींबरोबर तैनातीने राजगृहापर्यंत गेले. परंतु दहनभूमी सोडण्यापूर्वी त्यांनी आंबेडकरांच्या इच्छेची पूर्ती करण्यासाठी म्हणून बौद्ध धम्माचा स्वीकार करण्याचा आग्रह धरला. त्यानुसार दीक्षा समारंभाचा कार्यक्रम होऊन तेथे उपस्थित असलेल्या बौद्ध भिक्खूंपैकी महापंडित डॉ.आनंद कौसल्यायन यांनी त्रिशरण व पंचशील देऊन त्याच ठिकाणी १० लाख लोकांना बौद्धधम्माची दीक्षा दिली. एकाच वेळी दहा लक्षांवरील लोकांचे धर्मांतर हे जगातील सर्वात मोठे सामूहिक धर्मांतर होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे दिल्लीमध्ये आपल्या निवासस्थानी महापरिनिर्वाण झाले होते, तेथे भारत सरकारने डॉ.आंबेडकर राष्ट्रीय स्मारक निर्माण केले आहे. याला महापरिनिर्वाण स्थळ म्हणूनही ओळखले जाते. १३ एप्रिल २०१८ रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मारकाचे लोकार्पन करण्यात आले. या स्मारकाच्या इमारतीची रचना पाने उघडलेल्या भारतीय संविधानाच्या पुस्तकाप्रमाणे असून हा आकार ज्ञानाच्या शोधाचे प्रतीक आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख केवळ दलितांचे कैवारी, राज्यघटनेचे शिल्पकार म्हणूनच सांगितली जाते. परंतु डॉ.आंबेडकर यांनी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे कार्य केले. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवून उपाययोजना करण्यासाठी पाणी, वीज आणि शेतीचा सूक्ष्म विचार केला. डॉ.आंबेडकर यांना ग्रामीण समाजव्यवस्थेची जाण होती. तितकेच शेतीबद्दलही भान होते. शेतीचे चित्र बदलले पाहिजे, याबाबत ते आग्रही होते. देशात शेती, शेतकरी आणि शेतीशी संबंधित समूहाचा विचार छत्रपती शिवाजी महाराज, शिक्षणसम्राट महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ.आंबेडकर यांनीच केला. अवघे २७ वर्षे वयात डॉ.आंबेडकरांनी देशातील शेती आणि शेतकरी यांचे संशोधन करून लहान शेतकऱ्यांच्या समस्या आणि उपाय हा शोधनिबंध लिहिला. शेतीसाठी जमीन व पाणी हे मुख्य घटक आहेत. पाण्याशिवाय शेतीचा विकास अशक्य आहे. शेतकऱ्याला शाश्वत पाणी मिळणे गरजेचे आहे. पाण्याशिवाय उत्पादकता वाढणे आणि शेतकऱ्यांचा आíथक स्तर उंचावणे शक्य नाही हे त्यांनी ब्रिटिश सरकारच्या निदर्शनास आणून दिले होते. शेतीला उद्योग मानून पायाभूत सुविधा पुरवून शेतकऱ्यांचा आíथक विकास झाला पाहिजे. शेतकरी समृद्ध झाला तरच शेतीशी निगडित सर्व घटकाला या आर्थिक सक्षमतेचा फायदा होईल, असे त्यांचे मत होते.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चिंतन करून, विचार मांडून आणि त्यांच्यासाठी चळवळी उभ्या करून या देशातील शेती, शेतकऱ्यांचे प्रश्न डॉ.आंबेडकरांना संपवायचे होते. यासाठी त्यांनी २५ हजार शेतकऱ्यांचा देशातील पहिला मोर्चा काढला. एवढेच नाहीतर त्यांच्या नेतृत्वात ७ वर्षे दीर्घकाळ शेतकऱ्यांचा संप झाला. जाती विसरून सर्व जण एकत्र आल्यास देश तुमच्या हातात येईल, असे ते सांगत. खोती पद्धतीच्या विरोधात त्यांनी लढा दिला. देशाचे पहिले पाटबंधारेमंत्री झाल्यानंतर डॉ.आंबेडकरांनी शेती आणि शेतकरी यांच्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले, तसेच देशाचे पहिले ऊर्जामंत्री झाल्यानंतर त्यांनी पहिला ऊर्जा आयोग स्थापन करीत वीज आणि पाण्याचे नियोजन केले. उद्योगांना वीज देताना कृषी उद्योगांना प्राधान्य दिले. डॉ.आंबेडकरांमुळे देशातील स्त्रियांना मताचा व समतेचा अधिकार मिळाला. कामगारांना न्याय मिळवून देऊन त्यांना सशक्त बनवले. डॉ.आंबेडकर सर्व देशाचे नेते होते. आजही त्यांच्या मार्गदर्शक विचारानुसार अनुकरण करणे फार महत्त्वाचे वाटते. खरे तर त्यांच्या कार्याची यादी प्रचंड मोठी आहे; मी ते लिहू म्हटले तर माझे अख्ये आयुष्यच संपून जाईल, पण त्यांची कार्यमहती पूर्ण काही लिहू शकणार नाहीच!
!! विश्वरत्न डाॅ.बाबासाहेबांना त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन !!


– संकलन व शब्दांकन –
शेतकरीपुत्र- श्री कृष्णकुमार लक्षमी-गोविंदा निकोडे गुरूजी.
गडचिरोली, फक्त व्हॉट्सॲप- 9423714883.