फळ पीक विम्याच्या मदतीसाठी शेतकऱ्यांच्या वरूड तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन

113

🔸शेतकऱ्यांच्या खात्यात फळपिक विम्याची मदत व्याजासह जमा करा !

🔸वरूड तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी दिला २७ ला चक्काजाम आंदोलनाचा इशरा !

✒️वरूड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

वरूड(दि.17जानेवारी):-तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना २०२२-२३ आंबिया बहार फळ पीक विम्याच्या मदतीपासून वंचित ठेवणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हे दाखल करून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्काचे फळ पीक विम्याचे पैसे व्याजासह तत्काळ वाटप करणे बाबत शेतकरी संघर्ष समिती तर्फे शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तहसीलदार यांच्यामार्फत निवेदन देऊन तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

वरुड तालुक्यातील राजुरा बाजार, पुसला, वाठोडा, वरूड महसूल मंडळ या सर्व ठिकाणी आंबिया बहार फळ पिक विमा २०२२- २०२३ चे दोन ट्रिगर लागून सुद्धा मंजूर झालेले हेक्टरी ४० हजार रुपये ५ महिन्यांचा कालावधी लोटून सुद्धा अजून पर्यंत रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 40 हजार रुपये अदा केलेले नाही. वरूड तालुक्यातील हजारो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी हेक्टरी १२ हजार रुपये भरून २०२२ – २३ मध्ये आंबिया बहार संत्रा फळ पिक विमा मोठ्या प्रमाणात काढलेला होता. हवामानातील बदलामुळे उत्पादनात घट होऊन शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन हे मिळत नाही.

फळपिक नुकसान भरपाई मिळण्यासाठी एक उपाय म्हणून पुनर्रचित हवामान आधारीत फळ पीक विमा योजनेमध्ये मोठ्या अपेक्षेने विमा काढून सुद्धा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना फळ पीक विमा मदत वेळेवर दिल्या जात नाही ही बाब अतिशय गंभीर असून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करणारी आहे.

आधीच निसर्गाची अवकृपा व शासनाचे दुर्लक्ष यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी डबघाईला आला आहे. यावर काही उपाययोजना करण्या ऐवजी किंवा संत्र्याला राजाश्रय देण्या ऐवजी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना संपविण्याचा घाटच शासनाकडून व विमा कंपनीकडून होतांना दिसत असल्याचे पुन्हा एकदा पुढे आले आहे. ५ महिन्यांचा कालावधी पूर्ण होऊन सुद्धा अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्काचे फळ पीक विम्याचे कोट्यावधी रुपये शासन व रिलायन्स इन्शुरन्स कंपनी वाटप करण्यास दिरंगाई करत असल्यामुळे शासनाची फळ पीक विमा योजना ही संत्रा उत्पादक शेतकर्‍यांच्या फायद्याची नसून विमा कंपनीच्या फायद्याची असल्याचे निदर्शनास येत आहे.

वरूड तालुक्यातील राजुरा बाजार, पुसला, वाठोडा, वरूड महसूल मंडळातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मंजूर असलेल्या विम्याची मदत २६ जानेवारी पर्यंत संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात व्याजासह जमा न झाल्यास, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवणाऱ्या रिलायन्स इन्शुरन्स विमा कंपनीवर गुन्हे दाखल न केल्यास २७ जानेवारी रोजी हजारो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र स्वरूपाचे चक्काजाम आंदोलनाचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, धनंजय मुंडे कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार अनील बोंडे, राज्यसभा खासदार रामदास तडस, आमदार देवेंद्र भुयार, कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, विभागीय आयुक्त, विभागीय कृषी सहसंचालक अमरावती विभाग अमरावती. जिल्हाधिकारी अमरावती. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अमरावती, प्रमोद पाटील राज्य व्यवस्थापक, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी यांना देण्यात आला असून यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके, सौरभ मानकर, अनुप नागमोते, प्रणव कडू, देवेंद्र गोरडे, नितेश भोयर, दिनेश वानखडे, आशिष निकम, नीलेश कोहळे, अमोल बोडखे, सागर मानकर, ललित खोडे, प्रल्हाद म्हस्के, नरेंद्र नासरे, योगेंद्र भोयर, दामोदर शेंडे, दिवाकर घाटोळे, भागवत बहुरूपी, किसना म्हस्के, दीपक कडू, राजेश साबळे यांच्यासह आदी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.