काळी जादू प्रकरण, आता उच्च न्यायालयात, पोलिसांनीच केले कागदपत्रे गहाळ, मुंबई क्राईम ब्रँचकडे तपास देण्याची मागणी

106

✒️नवी मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

नवी मुंबई(दि.9फेब्रुवारी):-तब्बल दोन महिन्याच्या प्रयत्नानंतर वाशी पोलिसांनी काळी जादू व फसवणुकीचा गुन्हा दाखल करून घेतला. मात्र पुरावा, साक्षीदार नसल्याचे कारण सांगत वाशी पोलिसांनी काळी जादू प्रकरणाचा तपास आता बंद केला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात लाखो रुपयांचे दागिने चोरीला गेलेले असतानाही पोलिसांनी अद्याप पर्यंत गुन्हा दाखल करून घेतला नाही. मात्र इतर प्रकरणात पोलिसांनीच महत्त्वाची कागदपत्रे गहाळ केली.

वाशी येथे राहणारे संजय पवार यांनी फसवणूक व काळी जादू प्रकरणात वाशी पोलीस ठाण्यात तब्बल दोन महिन्याच्या प्रयत्नानंतर गुन्हा दाखल करून घेतला. हा गुन्हा दाखल करण्यासाठी पवार यांना सहाय्यक पोलीस आयुक्तांपासून ते आयुक्तालयाचे उंबरठे झिजवावे लागले. त्यातही वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चांदेकर यांनी गुन्हा दाखल होऊ नये म्हणून वारंवार तपास अधिकारी बदली करून वेळ काढून पणा केला. काळी जादू प्रकरणात सबळ पुरावे असून आरोपीला कठोर शिक्षा होईल असे सांगणारे पोलीस उपनिरीक्षक कृष्णा कुटे यांनी निलंबन काळातही आरोपींना मदत केल्याचा आरोप तक्रारदार यांनी केला आहे. आरोपी सांगतील त्याप्रमाणे कुटे यांनी तपास केला.

चोरीला गेलेले सर्व दागिने काढून देतो असे वारंवार तक्रारदाराला सांगत राहिले. मात्र तपासाला गती दिली नाही. पैसे घेतल्याच्या आरोपाखाली कुटे यांना निलंबित केल्यानंतर हे प्रकरण उपनिरीक्षक शेडगे यांना देण्यात आले. त्यांनी वेगाने तपास सुरू केल्यानंतर केवळ एका आठवड्यातच हा तपास सहाय्यक निरीक्षक जोगळेकर यांच्याकडे काहीही कारण नसताना देण्यात आला. यावर तक्रारदार पवार यांनी नाराजी व्यक्त करीत उपायुक्त पानसरे यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर माहिती दिली. त्यांच्या आदेशाने गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस निरीक्षक नाळे यांच्याकडे हा तपास देण्यात आला. हे सर्व करण्यामागे केवळ वेळ काढू पणा होता. वाशी पोलिसांनी दोन महिने गुन्हा दाखल करून घेतला नाही. गणपती जाऊ द्या, नवरात्र उत्सव जाऊ द्या, दिवाळी जाऊ द्या असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सांगत राहिले.

मात्र त्या दरम्यान आरोपींनी त्याचा फायदा घेऊन सर्व पुरावे नष्ट करून टाकले. जाणीवपूर्वक आरोपींना ही वेळ देण्यात आल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. कारण पोलीस उपनिरीक्षक कुटे हे त्यांच्या संपर्कात होते. या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असूनही त्यांची साक्ष घेण्यात आली नाही. चोरी झालेली असतानाही साधा पंचनामाही करण्यात आला नाही. आता मात्र चार महिन्यानंतर पुरावे नाहीत असे कारण सांगून पोलीस तपास बंद करीत आहेत. मुळात आरोपीच्या घरातच तक्रारदाराचे सर्व कागदपत्रे सापडले. तरीही एकाही आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नाही.

तक्रारदार यांच्या पत्नीने घडलेला सर्व घटनाक्रम एका डायरीत नोंद करून ठेवला आहे. वाशी व रत्नागिरी येथील घरात काळी जादू केल्याचे ऑडिओ,व्हिडिओ, फोटोग्राफ तसेच लेखी पुरावे पोलिसांना दिलेले असतानाही पोलीस ते पुरावे म्हणून ग्राह्य मानत नाहीत . घरात कपाट तोडून लाखो रुपयांचे दागिने व कागदपत्रे चोरीस गेलेले आहेत. सर्व कागदपत्रे आरोपीच्या घरात सापडतात. मात्र दागिने लंपास करण्यात आले आहेत. याबाबत पोलिसांनी आरोपीला साधा जाबही विचारला नाही. न्यायालयाच्या आधीच पोलिसांना हे प्रकरण बंद करण्यामध्ये स्वारस्य दिसत असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे.

पोलिसांनी पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने तक्रारदार यांचा जबाब, लेखी तक्रार तसेच आरोपीचा जबाब पोलीस ठाण्यातून गायब केला . पोलिसांचा हा सर्व तपास संशयास्पद असून या प्रकरणात वरिष्ठ पोलीस निरीक्षक चांदेकर व उपनिरीक्षक कृष्णा कुटे यांची चौकशी करण्यात यावी, अशी तक्रार पोलीस उपायुक्तांकडे दिलेली असतानाही त्यावर काहीच कारवाई झाली नाही. या उलट निलंबित असलेले कृष्णा कुटे यांना वाशी पोलीस ठाण्यातच सेवेत घेण्यात आले. सध्या सर्व आरोपी मोकाट फिरत असून त्यांना आता कायद्याची भीती राहिलेली नाही. त्यामुळे वाशी पोलिसांवर आता विश्वास राहिला नसून हे प्रकरण मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्यात यावे त्यासाठी तक्रारदार मुंबई उच्च न्यायालयात गेले असल्याचे तक्रारदार यांनी सांगितले.