स्वतंत्र मजदूर युनियनचे राष्ट्रीय अधिवेशन 17-18 फेब्रुवारी रोजी नागपूर येथे!

233

✒️नागपूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

नागपूर(दि.15फेब्रुवारी):-स्वतंत्र मजदूर युनियन या देशव्यापी कामगार संघटनेचे राष्ट्रीय अधिवेशन 17-18 फेब्रुवारी 2024 रोजी कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशिमबाग,नागपूर येथे राष्ट्रीय अध्यक्ष जे. एस. पाटील यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे.

या अधिवेशनाचे उद्घाटन प्रसिद्ध विचारवंत कांचा इलैय्या, हैद्राबाद यांचे हस्ते होणार असून प्रसिद्ध अधिवक्ता असिम सरोदे, पुणे,मंडल आयोगाचे अध्यक्ष बी. पी. मंडल यांचे नातू डॉ.सूरज मंडल, नवी दिल्ली,पत्रकार व सामाजिक कार्यकर्ता महेन्द्र यादव, भोपाळ, असंघटीत कामगारांचे नेते डी. सी. कपिल, नवी दिल्ली, कायदेतज्ञ डॉ. दिनेश गौतम, झांसी, संपादक व लेखक डॉ. सिद्धार्थ, गोरखपूर हे वेगवेगळ्या विषयांवर आपले विचार व्यक्त करतील. स्वतंत्र मजदूर युनियन ही फुले-शाहू-आंबेडकर व पेरियारवादी विचारांची कामगार संघटना देशातील बहुतेक राज्यात कार्यरत असून विविध उद्योगातील 46 संघटना या देशव्यापी युनियन सोबत संलग्न आहेत.

संघटीत व असंघटीत क्षेत्रातील कामगारांचे नेतृत्व करणाऱ्या या संघटनेच्या सदर अधिवेशनामध्ये देशातील कामगारांचे प्रश्न, किमान वेतन, कंत्राटी कामगारांचे प्रश्न,अंगणवाडी सेविकांचे प्रश्न,जुनी पेन्शन योजना, कामगारांचे संविधानिक हक्क व अधिकार, पदोन्नतीमधिल आरक्षण,या विषयांवर सखोल चर्चा करून ठराव मांडण्यात येतील असे राष्ट्रीय उपाध्यक्ष नरेंद्र जारोंडे यांनी कळविले आहे.

दुसऱ्या दिवशी 18 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.के.पी.स्वामिनाथन यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या प्रतिनिधी सत्रात स्वतंत्र मजदूर युनियनशी संलग्न असलेल्या देश व विविध राज्य पातळीवरील संघटनांचे पदाधिकारी कामगारांच्या समस्या मांडून देशपातळीवर आंबेडकरी कामगार विचार मजबूत करण्यासह स्वतंत्र मजदूर युनियनला केंद्र सरकारतर्फे सर्व पातळ्यांवर प्रतिनिधीत्व मिळण्यासह इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनवर प्रतिनिधीत्व मिळण्यासाठी आराखडा प्रस्तुत करतील.

याप्रसंगी मंजूर झालेले ठराव केंद्र शासनाकडे सादर केले जातील.या राष्ट्रीय अधिवेशनात केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान, दिल्ली, बिहार,पश्चिम बंगाल यासह महाराष्ट्रातील विविध संलग्न संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचीही माहिती नरेंद्र जारोंडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे.