वायूचे गत्यात्मक सिद्घांत आणि ऊष्मागतिकी नियम!

60

(भौतिकशास्त्रज्ञ मेघनाद साहा पुण्यस्मरण विशेष)

मेघनाद साहा हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांनी ऊष्मीय आयनीकरणाचे समीकरण मांडून त्यांचा उपयोग तारकेय वर्णपटांच्या स्पष्टीकरणासाठी केला. खगोल भौतिकीतील या महत्त्वाच्या कार्याकरिता ते प्रसिद्घ आहेत. साहा यांचा जन्म डाक्का जिल्ह्यातील सिओरात्तली आता बांगला देश येथे दि.६ ऑक्टोबर १८९३ रोजी झाला. त्यांनी कोलकाता येथील प्रेसिडेन्सी कॉलेजात प्रफुलचंद्र रॉय व सर जगदीशचंद्र बोस यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेऊन सन १९१५मध्ये एमएस्सी आणि नंतर सापेक्षता सिद्घांत व प्रारण दाबाचे मापन या विषयांवर संशोधन करून पीएचडी संपादन केली. त्यानंतर त्यांनी लंडनच्या इंपिरियल कॉलेजमध्ये संशोधन करून डीएस्सी. पदवी मिळविली. ते कोलकाता विद्यापीठात भौतिकी विषयाचे खैरा प्राध्यापक- १९२१-२३, अलाहाबाद विद्यापीठात भौतिकीचे प्राध्यापक- १९२३-३८, पलित प्राध्यापक- १९३८-५२ आणि गुणश्री प्राध्यापक- १९५२-५६ होते. साहा यांनी आणवीय सिद्घांत आणि पुंजयामिकी यांमधील तत्त्वांचा वापर करून तारकेय वर्णपटांच्या चित्रलिपीचा सांकेतिक अर्थ शोधून काढण्याकरिता सर्वप्रथम प्रयत्न केला.

तारकेय वातावरणातील तापमानाला- ६,०००ओसे. किंवा अधिक तार्‍याचे घटक असलेल्या पुष्कळशा अणूंच्या बाह्य कवचातील इलेक्ट्रॉन छेदले जातात. या आणवीय छेदन प्रक्रियेला इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे आयनीकरण म्हणतात आणि छेदित अणूला आयन- विद्युत्भारित अणू म्हणतात. अशा प्रकारे तारकेय वातावरणात मुक्त इलेक्ट्रॉन आणि छेदित अणू यांचे वायुमय मिश्रण असते. साहा यांनी या मिश्रणास वायूचा गत्यात्मक सिद्घांत आणि ऊष्मागतिकी यांचे नियम लावले.

मेघनाद साहा यांचा जन्म दि.६ ऑक्टोबर १८९३ रोजी बांगलादेशची राजधानी ढाकाजवळील शाओराटोली गावात झाला. मेघनाद साहाच्या वडिलांचे नाव जगन्नाथ साहा होते. आईचे नाव भुवनेश्वरी देवी होते. त्यांचे वडील जगन्नाथ साहा हे एक छोटे दुकानदार होते. हालाकीची परिस्थिती असल्याने जगन्नाथ यांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा खर्च उचलणे कठीण जात होते. यासाठीच प्राथमिक शिक्षणानंतर मेघनाद यांनी दुकानाच्या कामात मदत करावी अशी त्यांची इच्छा होती. मात्र मेघनाद याची इच्छा पुढे शिक्षण घेण्याची होती.

त्यांच्या प्रश्नांनी शिक्षकही थक्क होत होते. मेघनाद साहा हे लहानपणापासूनच अतिशय हुशार होते. विज्ञान विषयाची त्यांना अधिक आवड होती. वर्गात त्यांनी विचारलेल्या प्रश्नांनी शिक्षकही थक्क होत होते. एकदा त्यांनी सूर्याभोवती वर्तुळ आकारात फिरणाऱ्या आवरणाबद्दल विचारले. ज्याचे उत्तर त्यांचे शिक्षक देऊ शकले नाही. त्यावेळी मेघनाद यांनी आपण याचा शोध लावून याची माहिती काढणार असल्याचे शिक्षकांना सांगितले होते. यावरून मेघनाद खूप हुशार असल्याचे शिक्षकांना जाणवले. मात्र त्याचे कुटुंबीय मेघनाद यांना पुढे शिकू देणार की नाही, असा प्रश्न शिक्षकांना पडला. मेघनाद यांचं शिक्षण थांबू नये, असे त्यांना वाटत होते. यानंतर त्यांनी स्वतः मेघनाद यांच्या पालकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्याचे ठरवले. याबाबत शिक्षकाने मेघनाद याच्या भावाशी चर्चा केली. मेघनाद यांचा भाऊ त्यांच्या वडिलांकडे गेला आणि म्हणाला, मेघनाद अभ्यासात खूप हुशार आहे. त्याचे शिक्षकही तसे सांगत आहेत. त्याने पुढे शिक्षण घ्यावे, अशी शिक्षकांची इच्छा आहे. यावर वडिलांनी सांगितले की, मेघनाद खूप हुशार आहे. पण त्याला दुसऱ्या गावात शिक्षणासाठी जावे लागेल.

ज्यासाठी त्याच्याकडे पैसे नाहीत. याबाबत मदत करण्यासाठी डॉ.अनंत यांच्याशी बोलू, असे मेघनाद यांच्या भावाने वडिलांना सांगितले. त्यांच्या वडिलांनी यावर आपली संमती दर्शवली. डॉ. अनंत कुमार हे एक कुशल आणि प्रभावी डॉक्टर होते. तसेच ते एक चांगले व्यक्ती देखील होते. डॉ.अनंत दास यांनी मेघनाद साहा यांना पुढील शिक्षणासाठी मदत केली. मेघनाद यांनी दुसऱ्या गावातल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतला. पुढे ते डॉ.अनंत कुमार यांच्या घरी राहत होते. आपल्या मेहनतीच्या जोरावर मेघनाद साहा यांनी केवळ आपल्या शाळेतच नाही तर संपूर्ण ढाका जिल्ह्यात आठवीत सर्वाधिक मार्क मिळवले. त्यानंतर मेघनाद साहा यांना शिष्यवृत्ती मिळू लागली. सोबतच त्यांना ढाका येथील सरकारी हायस्कूलमध्ये प्रवेश मिळाला.
याच काळात देशभर स्वातंत्र्यलढ्याची आग धगधगत होती. मेघनाद याशी प्रभावित झाले होते. बंगालचे राज्यपाल त्यांच्या शाळेला भेट देणार होते.

राज्यपालांच्या आगमनानिमित्त मेघनाद साहा यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह आंदोलनात भाग घेतला. याच्या परिणामी, मेघनाद यांची शिष्यवृत्ती बंद करण्यात आली. मेघनाद यांना त्यांच्या साथीदारांसह शाळेतून काढून टाकण्यात आले. मात्र त्यांना किशोरीलाल ज्युबिली स्कूल या खाजगी शाळेत प्रवेश मिळाला. पुढे साहा हे इंटरमिजिएट परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. नंतर कलकत्ता विद्यापीठात साहा यांनी संपूर्ण विद्यापीठात दुसरा क्रमांक पटकावला. हलाखीच्या परिस्थितीवर मात करत साहा यांची वाटचाल प्रगती आणि विकासाच्या दिशेने सुरू झाली.

कोणत्याही मूलद्रव्याच्या अणुंकरिता छेदन किंवा आयनीभवन केवळ उच्च तापमानामुळे घडून येत नसून ते नीच दाबामुळेसुद्घा घडते, हे साहा यांनी सप्रमाण सिद्घ केले. दाबातील न्यूनीकरणामुळे छेदन झाल्यानंतर उरलेला अणू आणि मुक्त इलेक्ट्रॉन यांची गाठ पडण्याची संधी अधिक कमी होते आणि पुनःसंयोग होण्याचा वेग कमी होऊन आयनीकरण वेग बदलत नाही. साहा यांनी सन १९२०मध्ये “सूर्याच्या वर्णमय आवरणातील आयनीभवन” या विषयावरील एक निबंध फिलॉसॉफिकल मॅगझीनमध्ये प्रसिद्घ केला. रेडिओ तरंगांचे प्रेषण, ज्योतींचे संवहन, प्रज्योत आणि स्फोटक विक्रियांची रचना यांमधील समस्या सोडविण्याकरिता साहा यांचा आयनीभवन सिद्घांत उपयुक्त ठरला आहे. साहा यांनी कोलकाता येथील इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर फिजिक्स ही संस्था स्थापन करण्यात पुढाकार घेतला.

ते या संस्थेचे सन्माननीय संचालक होते. त्यांच्या मृत्यूनंतर या संस्थेला त्यांचे नाव देण्यात आले. ते लंडनच्या रॉयल सोसायटीचे सन १९२७ साली फेलो होते. सन १९३४मध्ये भारतीय विज्ञान परिषद संस्थेच्या एकविसाव्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. सन १९५२च्या सार्वत्रिक निवडणुकीत स्वतंत्र उमेदवार म्हणून ते लोकसभेवर निवडून आले होते. आयुष्याच्या अखेरच्या काळात त्यांनी आपले लक्ष विज्ञानाच्या सामाजिक कार्याकडे वळविले. सन १९३५मध्ये त्यांनी इतिहास, संस्कृती व विज्ञान यांना वाहिलेले सायन्स अँड कल्चर हे नियतकालिक सुरू केले. अशा या महान वैज्ञानिकाचे दि.१६ फेब्रुवारी १९५६ रोजी दिल्ली येथे निधन झाले.

!! महान शास्त्रज्ञ मेघनादजी साहा यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन !!

✒️संकलन व सुलेखन:-श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी.पोटेगावरोड, गडचिरोली.फक्त मधुभाष- ७१३२७९६६८३