तैलपात्रात दिसे श्रीहरी..वर पाहता सेना न्हावी

45

🔹श्री संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त विशेष लेख🔹

परमेश्वर भक्तांच्या भक्तीला व साधेपणाला वश होऊन त्यांचे संकटात रक्षण करतो, भक्तांवर प्रसन्न होऊन सगुण साकार रुपात त्यांची कामेही करतो याचा प्रत्यय काही संतांचे चरित्र जाणून घेतल्यावर येतो त्यापैकी एक म्हणजे संत शिरोमणी-भगवद भक्त श्री संत सेना महाराज.

‘सेना न्हावी भक्त भला । तेणे देव भुलविला ।।’
असे जनाबाईंनी वर्णन केलेले श्री संत सेनामहराज हल्ली मध्यप्रदेशात मोडल्या जाणाऱ्या बांधवगड येथील देविदास व प्रेमकुवर बाई यांच्या पोटी वैद्य द्वादशी रविवार विक्रम संवत १३५७ ला जन्मले.

बांधवगड राजाचे श्मश्रु कर्म करणारे, तैलमर्दन मालिश करणारे सेना महाराजांचे घराणे होते. त्यावेळी संत सेना महाराजांचे वडील देवीदास हे राजाचे अत्यंत आवडते होते, परंपरेनुसार राजाकडील नाभिकाचे काम नंतर सेना महाराजांकडे आले. सेना महाराजांचा लहानपणापासूनच भक्तीमार्गाकडे ओढा होता. सर्वभावाने हरीला शरण गेल्यास हरी आपला उद्धार करतो हे सेनाजींना उमगल्याने ते पराकोटीचे भगवंत भक्त बनले होते.

एकदा राजाची श्मश्रु करण्यासाठी निरोप घेऊन राजाचा दूत सेनाजींकडे गेला, परंतु देहभान हरपून एकनिष्ठेने भगवंताच्या नामस्मरणात तल्लीन झालेल्या सेनांना राजसेवेचे विस्मरण झाले. इकडे उशीर झाल्यावरही सेना राजाज्ञा असल्यावरही येत नाही हे बघून राजाने क्रोधीत होऊन सेनाजींची मोट बांधून त्यांना नदीत फेकून देण्यास फर्मावले.

भक्त सेनाजीवरचे संकट प्रभूंनी जाणले व क्षणार्धात सेनाजीचे रूप धारण करून स्वतः भगवंतच धोपटी घेऊन राजाची हजामत करावयास गेले. अभ्यंग मर्दनासाठी सुगंधी तेलाने सेनारूपधारी प्रभु राजाचे अंगमर्दन करू लागले तेव्हा भगवंताच्या करकमलांचा स्पर्श होताच राजाला वर्षानुवर्षांपासून त्रासदायक ठरलेला चर्मरोग नाहीसा झाला. त्याला आतापर्यंत न अनुभवलेल्या आत्मिक सुखाची अनुभूती झाली. अंगमर्दन करताना रत्नजडित तैलपात्रात मधे राजाला चतुर्भुज प्रभूंचे प्रतिबिंब दिसले वर पाहिले तर सेना न्हावी, तैलपात्रात श्रीहरी. या अद्भुत दर्शनाने राजाची दाही इंद्रिये ध्यानमग्न झालीत तो मनोमन सुखावला सेनाने सेवा संपवू नये असे त्याला वाटले, राजाने खुश होऊन ओंजळभर होन त्यांच्या धोपटित टाकले.

इतक्यात खरे सेनाजी राजसेवेस उशीर झाला म्हणून घाबरून, धोपटी बगलेत घेवून हजर झाले. तेंव्हा राजाने सेनाजींचे पाय धरले. सकाळचे चतुर्भुज प्रभु रूप दाखव म्हणून राजा विनवू लागला. सेनाजी म्हणाले, राजन मी सकाळी आलो नव्हतो, तुमची श्मश्रु मी आज केलेली नाही. मी पूजेतच इतका वेळ रमलो होतो व पूजा संपवून आताच प्रथम मी तुमचेकडे आलो आहे. राजाला आश्चर्य वाटले, ते म्हणाले “तू माझी श्मश्रु केल्यावर मी तुझ्या धोपटित ओंजळभर सुवर्णमुद्रा टाकल्या आहेत. उघड पाहु तुझी धोपटि” सेनाजीनी धोपटि उघडली तर त्यामध्ये सुवर्णमुद्रा होत्या, त्या पाहून सेनाजी विस्मित झाले आणि मग दोघांच्या डोक्यात प्रकाश पडला.

सेनाजीच्या भक्तीमुळे आपल्याला साक्षात परमेश्वराचे दर्शन झाल्याची व ते परमेश्वराचा अवतारी अंश असल्याची खात्री राजास पटली. आपली हरी भक्ती सार्थक झाली व आपले पुण्य फळा आले हे पाहून सेनाजीसही आनंद झाला. या प्रसंगानंतर राजाने सेनाजीस आपला गुरु केले.

काही दिवसांनी सर्वसंग परित्याग करून तीर्थयात्रेस जाण्याचा सेनाजींना निश्चय केला, यात्रेस निघताना देहत्याग बांधवगडच्या भूमीतच करायचे आश्वासन राजास देऊन ते मार्गस्थ झाले. प्रवासात लागणाऱ्या गावागावात मुक्काम करून हरीकथा प्रवचन करीत भविकभक्तांच्या प्रश्नांची उत्तरे देत. मध्य भारतातील अनेक धार्मिक स्थळे पाहिल्यावर ते महाराष्ट्रात आले. पंढरपूरात आल्यावर सगुण सावळ्या विठोबाचे प्रथमच दर्शन घेतांना त्यांचे अष्टसात्विक भाव जागृत झाले. ‘जाता पंढरीसी सुख वाटे जीवा। आनंदे केशवा भेटताचि ।।’ असे वर्णन त्यांनी केले.

आळंदिला जावून त्यांनी ज्ञानेश्वरा माऊलीच्या समाधीवर डोके टेकवल्यावर त्यांना ज्ञानीयाचे योगदर्शन झाले. कित्येक वर्षांच्या विरहामुळे पारखी असलेली मराठी सेनाजींच्या मुखातून रसाळ अभंगांवाटे मराठी बोल निर्माण करती झाली. नंतर त्यांनी त्र्यंबकेश्वर, सासवड अशा अनेक ठिकाणी भ्रमण केले. त्या-त्या समयी त्यांच्या मुखातून रसाळ अभंग प्रकट झाले.
पंढरपुरात त्यांनी दीर्घकाळ वास्तव्य केले तिथे नामदेव, सावतोबा, चोखोबा सारखे संत लहान धाकुटेपण विसरुन परस्परांची चरणधुळ घेऊन प्रेमआलिंगन देतांना आनंदाने बेहोष होऊन किर्तनरंगी नाचतानाचे दृश्य पाहून सेनाजींना धार्मिक व सामाजिक समतेचा हृदयंगम अविष्कार झाला व तिन्ही लोकातून सरता झाल्याची अनुभूती त्यांना मिळाली.

गौळणी, वासुदेव, सासवड माहात्म्य, आळंदी माहात्म्य, त्रिंबकमाहात्म्य आणि अनेक विविधतापूर्ण अभंगरचना केली. सेनाजींच्या रचना रसाळ, ओजस्वी असून त्यात स्वानुभाव, अंतःकरणाची उत्कंठता व ईश्वरभक्ती यांचा सुरेख संगम झाल्याचे वारंवार जाणवते.

नाभिक बांधवांना त्यांनी विशेष उपदेश केला. व्यवसायात साधनसुचिता राखून मानवनिर्मित उच्चनीचतेचे कृत्रीम भेद नष्ट करून परमेश्वराला अभिप्रेत असलेल्या धार्मिक व सामाजिक समतेच्या मार्गावर चालण्याचा संदेश दिला. संसारात राहून सुध्दा ईश्वर भक्तीने परमार्थ साधला जाऊ शकतो हे त्यांनी समजविले.

सर्वानुभूती समदृष्टियुक्त पदरचनेमुळे सेना महाराज शिखांना पूज्य झाले. त्यांचे एक पद शिखांचे पवित्र ‘गुरू ग्रंथसाहेब’ यात समाविष्ट आहे. हा मान संत नामदेवांनंतर फक्त सेनाजींनाच मिळाला. वारकरी सांप्रदायाने फक्त जातीपातींच्या नव्हे तर प्रांताप्रांताच्याही सीमा ओलांडल्या सेनाजी महाराज त्याचेच उदाहरण आहे.

सेना महाराज अंतर्बाह्य महाराष्ट्रीयन बनले होते. आपले उर्वरित आयुष्य पांडुरंग चरणी व्यतीत करावेसे वाटत असल्यावरही बांधवगड सेनाजींना विसरू शकत नव्हता. विठ्ठलाचा निरोप घेऊन ते बांधवगडकडे रवाना झाले. तेथील त्यांचे पुनरागमन महोत्सवासारखे साजरे केले गेले. काही दिवसात समाधी घेणार असल्याचे जाहीर केले. श्रावण वद्य द्वादशीला मध्यान्ह काळी शांत व तृप्त अंत:करणाने हा वारकरी संत विठ्ठलचरणी लीन झाला.

चोरी करु नका, खोटे बोलु नका, व्यभिचार करु नका, मद्यपान करु नका, प्राणीमात्राची हत्या करु नका असा लोककल्याणकारी संदेश जनमाणसाला देणाऱ्या या महान संतास कोटी कोटी नमन.

✒️पंकज वसंत पाटील
मलकापूर
मो.9850430579