नेत्यांनो तुम्ही मरणार आहात याचे भान ठेवा !

28

✒️दत्तकुमार खंडागळे(संपादक वज्रधारी)मो:-9561551006

आज भारताचा स्वातंत्र्य दिन. या दिवशी या देशातली इंग्रजांची सत्ता संपुष्टात आली. युनियन जँक ऐवजी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज असणारा तिरंगा फडकू लागला. या गोष्टीला आज ७३ वर्षे पुर्ण झाली. पण मागे फिरून पाहिले असता, सिंहावलोकन केले असता खरंच या देशात स्वातंत्र्य रूजले का ? हा प्रश्न पडतो. लोकशाही नावाच्या बेगडीखाली पोसलेल्या सरंजामांना आणि जागोजाग नव्याने निर्माण झालेल्या संस्थानिकांना सामान्य माणसाचे स्वातंत्र्य व हक्क मान्य आहेत का ? हा प्रश्न रोज पडतो. हे स्वातंत्र्य नक्की कुणासाठी आहे ? मुठभर राजकारण्यासाठी, मुठभर भांडवलदारांसाठी आणि त्यांच्याच वळचणीला मुजरे झोडणा-या मुठभर नोकरशाहीसाठी आहे की सामान्य जनतेसाठी आहे ? ज्यांच्या खांद्यावर या लोकशाहीचे भवितव्य पेलले गेले आहे ते सर्व स्तंभ आज लाचार झालेत, विकले गेलेत. धनदांडग्यांची व सत्ताधीशांची बटीक झालेत. गावोगाव हेच चित्र आहे. काही मोजके अपवाद सोडले तर अख्खी व्यवस्था या सत्ताधिशांसमोर व धनदांड्यासमोर मुजरे झोडताना दिसते आहे. या लोकांची साम्राज्ये अबाधीत रहावीत, त्यांना या देशाचा, इथल्या सार्वजिनक संपत्तीचा कसाही भोग घेता यावा, हा देश कसाही लुटता यावा यासाठी ही व्यवस्था काम करते आहे, त्यांची गुलाम झाली आहे. दिल्लीतही हेच चित्र आहे आणि गल्लीतही हेच चित्र आहे. असं वाटतं की भारताच्या विजय स्तंभावरील चार सिंह खाली उतरून या देशातल्या सामान्य जनतेलाच फाडू लागलेत, त्यांचेच लचके तोडू लागलेत.

आपली सत्ता आणि बुडाखालची खुर्ची अबाधीत ठेवण्यासाठी सर्वत्र जे राजकारण सुरू आहे ते अतिशय किळसवाणे आहे. वाट्टेल ते झाले तरी चालेल पण आपली सत्ता आणि सत्तेतून मिळणा-या संपत्तीचा ओघ कायम राहिला पाहिजे. त्यासाठी काहीही करू, कुठल्याही थराला जावू अशीच मानसिकता सध्या नेत्यांची दिसून येते आहे. हा खेळ खेऴण्यासाठी गावा-गावात, घरा-घरात भांडणे लावा, वैर पेरा आणि खुषाल राजकारण करा असेच चित्र दिसते आहे. लोकांचे प्रश्न सोडवायचे नाहीत तर ते भिजत पाडायचे. प्रश्न सोडवण्यापेक्षा लोकांना पोलिस स्टेशनला पाठवायचे. तिथे एकमेकांवर तक्रारी करायला लावायचे. लोकांच्याकरवी लोकांचीच जिरवायची. त्यांना गटा-तटाची, जाती-धर्माची भांग पाजायची आणि जेरीस आणून सोडायचे. लोक सजग नसतात. या लोकांच्या काव्यात फसतात आणि आपल्याच विनाशाचे मार्ग चोखाळतात. हे चित्र पत्रकारिता करताना रोज अनुभवतो आहे. लोकांची पिळवणूक पाहून हैराण होवून जाते. नेते मंडळी लोकांचे प्रश्न सोडवत नाहीत तर अधिक जटील करताना दिसत आहेत. त्यासाठी अधिकारी हाताशी धरायचे, कायदा हवा तसा वाकवायचा. कायद्याचे नियम फाट्यावर मारायचे. सत्तेच्या धाकाने व लाच नावाच्या विष्ठेला सोकावत नेत्यांची रखेल झालेल्या अधिकार्यांना हाताशी धरून कायदा कसाही वाकवला जातो आहे. नेत्यांना कुणी जाब विचारलेले चालत नाही. जाब विचारणारा समोरचा माणूस हतबल झाला पाहिजे, तो गुडघ्यावर आला पाहिजे. त्याचे इतके हाल करायचे की पुन्हा कुणी डोके वर काढू नये, पुन्हा कुणी प्रश्न विचारू नये. भ्रष्ट नेत्यांची आणि अधिका-यांची छुपी युती लोकशाहीला मारक आहे. भारतीय सार्वभौम स्वांतत्र्याचीच त्यांनी ऐशीतैशी केली आहे.

एखाद्या आमदाराकडे त्याच्या मतदारसंघाच्या पुढच्या पन्नास-शंभर वर्षाच्या विकासाचे व्हीजन नसते. तो आपल्या मतदारसंघाला प्रगत कसे करायचे ? लोकांचे जीवनमान कसे उंचवायचे यावर विचार करत नाही. त्यासाठी बुध्दी आणि ताकद पणाला लावत नाही. त्या ऐवजी भावनिक प्रश्न निर्माण करायचे, लोकांना भडकवत ठेवायचे. लोकांच्यात गटा-तटाचे वैर पेरायचे, परस्परांवरती पोलिस स्टेशनला खटले दाखल करायला सांगायचे, खटले दाखल करून आपल्याच तालावर नाचवायचे. असा प्रकार सुरू आहे. लोकांच्या घराला आगी लावून स्वत:चे राजकारण पोसले जात आहे. सत्तेतून पैसा व पैशातून सत्ता हेच सुत्र आहे. प्रत्येक स्कीममध्ये पैसे काढायचे. टक्केवारीवर पोसलेली पिलावळ राजकारणात माजली आहे. राजकारणात येण्यापुर्वी भणंग असणा-या या नेत्यांचे दोन दोन, चार चार बंगले आहेत, महागड्या गाड्या आहेत, डोळे दिपवून टाकणारी अफाट संपत्ती बहूतेकांच्या बुडाखाली साचलेली दिसते आहे. यांनी पैसे खायचे एकही क्षेत्र सोडलेले नाही. साखर कारखाना, सुतगिरण्या, सोसायट्या, गावातली गटारं, गावातली शौचालयं सगळं सगळं फस्त करतात. सगळी अक्कल, सगळी ताकद असली हरामखोरी करण्यासाठी, देशाला कुरतडण्यासाठी खर्च करताना दिसतात. जसे नोकरशाहीतले काही अपवाद तसेच राजकारणातले काही अपवाद सोडले तर सर्वत्र हिच गटारघाण आहे. ही घाण स्वच्छ करायला एखादा उतरला तर त्याच्यावर हे सर्व लांडगे तुटून पडताना दिसतात. त्याला पुरता उध्वस्त करताना दिसतात. त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करायचे, खोटे आरोप करायचे. जेणेकरून तो पुरता बरबाद झाला पाहिजे ही मानसिकता आहे.

सत्तेतून पैसा व पैशातून सत्ता गाजवत राहणा-या या देशद्रोह्यांना आपण मरणार आहोत. लबाडी करून, हरामखोरी करून कमावलेली संपत्ती, सत्तेची पदंं यातलं काही काही बरोबर नेता येणार नाही, आपले नावही चिरंतन राहणार नाही याचे भान नाही. संपत्तीच्या व सत्तेच्या लालसेने अंध झालेली ही हिंस्त्र जनावरं आपल्याच देशावर, आपल्याच आईवर, आपल्याच माणसांवर तुटून पडली आहेत. त्यांचेच रोज लचके तोडतायत. या देशात अनेक राजे होवून गेले, चक्रवर्ती सम्राट होवून गेले. स्वातंत्र्यानंतर कित्येक मुख्यमंत्री, आमदार, खासदार होवून गेले. अनेकजण प्रधानमंत्री, राष्ट्रपती होवून गेले. पण यातले किती लोक आज लोकांच्या स्मरणात आहेत ? यातल्या किती लोकांची नावे आठवतात ? लोक-कल्याणकारी काम करणारे काही लोकच लोकांच्या स्मरणात आहेत. सम्राट अशोक, महाराणा प्रताप, शिवाजी महाराज, महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉ बाबासाहेब आंबेडकर, नेताजी, भगतसिंग, अहिल्याई होळकर अशी काही मोजकी नावं आणि समाजकारणातील काही नावं लोकांना आठवतात. बाकी शेकडो काळाच्या पडद्याआड गेले. त्यांचा मागमुसही राहिला नाही. ते आज लोकांच्या स्मरणातही नाहीत. अनेक आमदार-खासदारांची स्मारकं बांधली आहेत. त्यांच्या स्मारकावर, पुतळ्यावर चिमण्या-कावळे हागतात आणि कुत्री लघवी करतात हेच वास्तव आहे. मग तरीही सत्तेसाठी आणि संपत्तीसाठी इतका माज का व कशासाठी केला जातो ? बेट्यांनो, तुम्ही चिरंजीव नाही आहात. तुम्ही एक ना एक दिवस मरणार आहात. तुम्ही पाप, करून, हरामखोरी करून, लबाडी करून कमावलेली संपत्तीही संपणार आहे. लोकांचे तळतळाट घेवून उभारलेली तुमची साम्राज्ये भुईसपाट होणार आहेत याचे भान ठेवा. त्या हिशोबानेच माजा कारण प्रत्येक गोष्टीला अंत हा असतोच.

(दि.15-8-2020)