ब्रम्हपुरी तालुक्यातील मांगली या गावात कोरोना विषाणूची झपाट्याने वाढ

18

🔺अन्य ४० जणांवर गुन्हा दाखल

✒️रोशन मदनकर(ब्रह्मपुरी, तालुका प्रतिनिधी)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.१६ ऑगस्ट) :- तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला असून, आतापर्यंत तालुक्यात शहरी व ग्रामीण भागात 108 बाधित रूग्ण आढळले आले. मांगली या गावात सर्वाधिक रूग्ण असून, हे गाव प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले. पण, येथील माजी पोलिस पाटीलसह अन्य ग्रामस्थांनी नियमांचे उल्लंघन करून शासकीय कामात अडथळा आणला. शिवाय वैद्यकीय चमुला घेराव घातला. स्वतःच्या व इतरांच्या आरोग्यास बाधा पोहचेल, असे कृत्य केल्याप्रकरणी माजी पोलिस पाटीलसह अन्य 40 जणांवर ब्रम्हपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रम्हपुरी तालुक्यात बाधितांची संख्या वाढली असून, एकट्या मांगली गावात 20 बाधितांचा समावेश आहे. त्यामुळे प्रशासनाने हे गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले. परस्पर संपर्कामुळे बाधित रूग्णांच्या संपर्कात आलेल्या ग्रामस्थांचे स्वॅब घेण्याचे काम आरोग्य विभागाची चमू करीत आहे.

या गावातील आशा वर्कर शामलता कार यांनी, गावातील बाधित ग्रामस्थांच्या घरातील तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती आरोग्य विभागाला दिली. या कारणावरून गावातील काही महिलांनी शामलता कार यांना शिविगाळही केली. आरोग्य विभागाच्या चमुला नावे न सांगण्याची ताकीद देत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, माजी पोलिस पाटील यांनी काही महिलांना हाताशी धरून हनुमान मंदिर परिसरात गोळा केले. तोंडाला मास्क न लावता, सामाजिक अंतर न पाळता गावातील काही ग्रामस्थांनी आरोग्य विभागाच्या चमुला घेराव घातला. कर्तव्यावरील पोलिसांनी ग्रामस्थांना समजविण्याचा प्रयत्न केला.

पण, ते ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. दरम्यान, ब्रम्हपुरी पोलिसांची चमू घठनास्थळी पोहचली. पोलिस दिसताच ग्रामस्थांनी पळ काढला. मांगली गाव प्रतिबंधित क्षेत्र असतानाही नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय दंड संहिता 1860 अंतर्गत कलम 186, 188, 269, 270, 271 व सहकलम 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.