नागपुरात खर्राबंदी

36

✒️नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नागपूर(दि.17ऑगस्ट):-खर्रा खाऊन रस्त्यावर थुंकल्याने करोना विषाणू प्रसाराला वेग मिळतो, या तथ्याची दखल घेत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरात स्वातंत्र्यदिन, १५ ऑगस्टपासून खर्राबंदीचा निर्णय घेतला. शहरात कुठे कुठे लपूनछपून खर्राविक्री सुरू आहे, त्यानंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

शहरात करोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. रोज मोठ्या संख्येत पॉझिटिव्ह आढळत असून, मृत्युसंख्याही वाढत आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याच्या हितास्तव आयुक्त मुंढे यांनी हा निर्णय घेतला. नागपूर शहरात सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारी, खर्रा, गुटखा, पान खाण्यास वा खाऊन थुंकण्यात प्रतिबंध घालण्यात आला आहे. ज्या व्यक्ती याचे उल्लंघन करतील, त्यांना १ हजार रुपये दंड ठोठावला जाईल. तसेच या खर्रा व तत्सम पदार्थ विकणाऱ्यावर कायदेशीर कारवाईसह ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यात गुटखाबंदी आधीपासूनच सुरू आहे. तरीही, शहरात पानठेल्यांवर विविध स्वरूपांत छुप्या पद्धतीने गुटखा मिळत असतो. शिवाय, विविध मिश्रण करूनही गुटख्याची चव येईल, असे उत्पादन विक्रीस असल्याचे लक्षात आले आहे. अशांवरही मनपाची करडी नजर राहील.

कारवाईसाठी पथक

या आदेशाची कठोर अंमलबजावणी व कारवाई करण्यासाठी मनपाने पथकही तयार केले आहे. मनपात कार्यरत उपद्रव शोध व निर्मूलन पथक, स्वच्छता निरीक्षक, मुख्य स्वच्छता अधिकारी, संबंधित झोनचे सहायक आयुक्त, पोलिस उपनिरीक्षक आदी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात येणार आहे.

स्वच्छतेला लागेल हातभार
खर्रा, पान वा गुटखा खाणाऱ्यांची संख्या कमी नाही. त्यातच नागपुरी खर्रा सबंध राज्यात प्रसिद्ध आहे. हा खर्रा कर्करोगासह इतरही आजार घेऊन येतो, याबाबत माहिती असूनही शौकिनांची संख्या वाढतच आहे. पान खाणारे अनेक हौशी आहेत. गुटखा थेट मिळत नसल्याने विविध मिश्रण करून गुटखा तयार करणारेही आहेच. त्यामुळे तो खाऊन सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांवर, कार्यालय परिसरात थुंकणाऱ्यांचीही मोठी संख्या आहे. अशा थुंकण्यातून आजाराला निमंत्रण मिळत असते. या निर्णयामुळे पिचकारी मारणाऱ्या अशांवर काही प्रमाणात जरब बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सोबतच, यानिमित्ताने स्वच्छतेलाही हातभार लागेल, असे बोलले जात आहे.