वंचित बहुजन आघाडीच्या डफली बजाव आंदोलनानेच 5 महिन्यांनंतर बस धावली रस्तावर

29

✒️नवनाथ पौळ,( केज जि. बिड प्रतिनिधी) मो:-8080942185

केज(दि.21ऑगस्ट):-कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी आणि लॉकडाऊन सुरू झाल्याने २२ मार्चपासून एसटीची चाके रुतली होती. कालांतराने लॉकडाऊनमध्ये काही सूट देण्यात आली. तेव्हा जिल्हाअंतर्गत प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली. पण जिल्ह्याबाहेर बसेस ला परवानगी नव्हती त्यामुळे सामान्य जनतेला खुप त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड.प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली १२ तारखेला महाराष्ट्रातील एसटी बस सुरू करण्यात याव्या यासाठी सर्व बसस्थानकासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डफली बजाओ आंदोलन केले होते. या आंदोलनाची राज्य सरकारने दखल घेत सार्वजनिक वाहतूक सेवा व एसटी बस सेवा चालू केली.आज राज्य शासनाने एसटी महामंडळाच्या बसेस जिल्हा बाहेर चालू केल्या आहेत याची दखल घेत बीड येथील आगारामध्ये आगार प्रमुख सर्व वाहक,चालक व स्थानक प्रमुख इत्यादी कर्मचाऱ्यांचे पुष्पहार शाल,श्रीफळ,फुल,देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडी बीड विधानसभेचे उमेदवार अशोक हिंगे,ज्येष्ठ नेते बबन वडमारे,बीड जिल्हा उपाध्यक्ष संतोष जोगदंड,महिला आघाडीच्या नेत्या पुष्पाताई तुरुक माने, जिल्ह्याचे नेते अजय सरवदे, ज्ञानेश्वर कवठेकर, सदानंद वाघमारे, बालाजी जगतकर, विनोद तांगडे, शेक युनुस, आदी उपस्थित होते.
आता आंतरजिल्हा वाहतुकीची मुभा मिळाल्याने गुरुवारी जिल्ह्यातील सर्व आगारातून जिल्ह्याबाहेर बसेस सोडल्या जाणार आहे. एसटीच्या  प्रवासासाठी ई-पास लागणार नसल्याने गेली पाच महिन्यांपासून बाहेरजिल्ह्यात अडकून पडलेल्या सामान्य लोकांना आपल्या गावी येता येणार आहे.
आता जिल्ह्याबाहेर प्रवासी वाहतुकीला गुरुवार २२ ऑगस्टपासून मुभा देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बीड विभागातून गुरुवारपासून बस सोडली जाणार आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देण्यात आलेल्या सर्व नियमांचे पालन करून प्रवासी वाहतूक केली जाणार आहे. बाहेरून आलेल्या सर्व बसेस सॅनिटराईज करण्यात येणार असून, आवश्यक ती खबरदारी घेतली जाणार आहे. प्रवासी संख्या वाढल्यानंतर टप्प्याटप्प्याने बसफेऱ्यां वाढविण्यात येणार आहे.