करोनाच्या दहशतीने लांबतोय पाळणा

38

✒️नागपुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नागपूर(दि.24ऑगस्ट):-मुलाचे, मुलीचे लग्न झाले. की घरात कधी एकदा नवीन पाहुणा येतो याची वडीलधाऱ्यांना प्रतीक्षा असते. आई होणे हे जगाच्या पाठीवरील कुठल्याही स्त्री साठी सर्वांत आनंददायी बाब असते. मात्र काही जण करिअरच्या, स्थिरस्थावर होण्याच्या ओढीने नियोजित बाळंतपणे पुढे ढकलतात. स्थीर स्थावर झाल्यानंतर ही जबाबदारी उचलू असेही काही जणांना वाटते. मात्र सध्याच्या करोनाच्या काळात पाळणा हलण्याचा कालावधीदेखील आता आणखी लांबत असल्याचे जाणवत आहे. वंध्यत्वामुळे उपचार घेत असलेली जोडपीदेखील आता नियोजित बाळंतपण वर्षभरापर्यंत लांबवित आहेत.

शहरातील काही स्त्रीरोग प्रसुती तज्ज्ञ आणि कृत्रिम गर्भधारणा तज्ज्ञांशी साधलेल्या संवादातूनही ही बाब प्रकर्षाने जाणवत आहे. आश्चर्यात टाकणारी बाब म्हणजे हा सगळा घटनाक्रम एकीकडे सुरू असताना लॉकडाउनच्या काळात घरून सुरू असलेल्या ऑफिसमुळे विवाहीत जोडप्यांना परस्परांसोबत वेळ घालविण्यास बराच कालावधी मिळाल्याने अनपेक्षित बाळंतपणाची संख्याही तितक्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे येत्या नोव्हेंबर डिसेंबरच्या कालावधीत शहरात बाळंतपणाची संख्याही वाढेल, अशी शक्यताही तज्ज्ञांनी व्यक्त केली.

यासंदर्भात स्त्रीरोग प्रसुतीशास्त्र संघटनेच्या अध्यक्षा डॉ. वैदेही मराठे म्हणाल्या, सध्या सर्वत्र कोव्हिडची दहशत आहे. त्यामुळे जोडप्यांमध्येही या विषाणू प्रादुर्भावाच्या साखळीने गोंधळ वाढला आहे. ठरल्याप्रमाणे नियोजित बाळंतपण केले तर या काळात विषाणू प्रादुर्भाव होईल, उपचार मिळतील का, बाळ सुरक्षित राहिल का याचाही धास्ती जोडप्यांमध्ये आहे. त्यामुळे आम्हीदेखील नियोजित बाळंतपणाची जोखीम शक्य असेल तर पुढे ढकला असा सल्ला देत आहोत. याशिवाय करोनाच्या काळात बाळंतपणादरम्यान जोखीम टाळण्यासाठी कोव्हिड चाचणीपासून ते बाळंतपण करताना आणि दवाखान्यातील मुक्काम काळात पीपीई किटचा खर्चही वाढणार आहे. त्यामुळे या काळात बाळंतपणावरचा खर्चही किंचित वाढेल, असेही त्यांनी नमूद केले.

वंध्यत्वाशी झुंजणाऱ्या जोडप्यांच्या बाजूने प्रकाश टाकताना कृत्रिम गर्भधारणा तज्ज्ञ डॉ. नटचंद्र चिमोटे म्हणाले, मधल्या काळात लॉकडाउनमुळे वंध्यत्त्वाचे उपचार करणारे केंद्र बंद होते. ते आता टप्प्याटप्याने सुरू होत आहेत. त्यामुळे आम्हीदेखील मोजक्याच जोडप्यांवर उपचार करीत आहोत. पहिल्यासारखी परिस्थिती निश्चितच राहिलेली नाही. कृत्रिम गर्भधारणेतून पाळणा हलवू इच्छिणारे १० टक्के जोडपी आम्ही सहा महिन्यानंतर वर्षभरानंतर उपचार घेऊन बाळंतपणाचा विचार करू, असे स्पष्ट सांगत आहेत, असेही त्यांनी नमूद केले.