राहुल गांधींच्या वक्तव्यात दम वाटतो

55

            🔸राजकीय विश्लेषण लेख🔸

✒️शब्दांकन- सुरेश शिरसाट
राजकीय विश्लेषक, विचारवंत (अकोला जिल्हा)
मो-8999558949

▪️ संकलन- नवनाथ पौळ
मो:-8080942185
केज तालुका, जिल्हा बीड
विशेष प्रतिनिधी

दिल्लीत कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कालच्या (सीडब्ल्यूसी) कॉंग्रेस वर्किंग कमेटीच्या बैठकीत कॉंग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्याच पक्षातील 23 बड्या जेष्ठ नेत्यांवर कडाडून हल्ला केला.”या बड्या 23 नेत्यांनी भाजपशी हातमिळवणी केली आहे.” असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला.

सध्याच्या पक्ष नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करून नेतृत्व बदलासाठी “ज्या तेवीस नेत्यांच्या स्वाक्षरीने सोनिया गांधी यांना पत्र देण्यात आले आहे त्यामध्ये पाच माजी मुख्यमंत्री, अनेक कॉंग्रेस कार्यकारिणीचे सदस्य, अनेक माजी केंद्रीय मंत्री यांच्या सह्या आहेत. महाराष्ट्रातील पृथ्वीराज चव्हाण, मुकूल वासनिक यांच्याही सह्या असल्याचे सांगण्यात येत आहे.

रागारागाने, त्वेषाने राहुल गांधी यांनी बैठकीतच जेष्ठ नेत्यांवर तोफ डागने,गंभीर आरोप करणे आणि लगेच सेकंदात राहुल गांधींचे वक्तव्य जसेच्या तसे बाहेर मिडीयात प्रसारित होणे याचा अर्थ “शेतच कुंपण खात आहे” याची खात्री पटते.कॉंग्रेस पक्षात काही आलबेल चालले नसून पक्ष अधिकच खिळखिळा झाल्याचे दिसून येते.

राहुल गांधी यांनी काही पहिल्यांदाच आपल्या जेष्ठ नेत्यांवर नाराजी व्यक्त केली नाही तर 2019 च्या लोकसभा निवडणुकी नंतर झालेल्या दारूण पराभवानंतर सुध्दा पक्षाच्या बैठकीत जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. पक्षाला लोकसभेत जे अपयश आले आहे ते केवळ पक्षातील नेत्यांमुळेच आले आहे. पक्षातील काही नेत्यांनी भाजपाशी हातमिळवणी करून कॉंग्रेस पक्षाला पराभवाच्या खाईत लोटले” असे अतिशय उद्विग्नपणे सांगून हताशपणे त्यांनी पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता.

स्वातंत्र्यानंतर देशात सर्वाधिक काळ कॉंग्रेस पक्षाची सत्ता होती. सातत्याने कॉंग्रेस पक्ष सत्तेवर राहिल्यामुळे सत्तेची नशा काय असते ? हे कॉंग्रेसच्या नेत्यांना चांगलेच माहित आहे.एक जातीय घरणेशाहीला कॉंग्रेस पक्षाने सातत्याने संधी दिल्यामुळे नवी सरंजामशाही कॉंग्रेसने निर्माण केली.या सरंजामदारांनी साठसत्तर वर्षात आपले मोठे प्रस्थ निर्माण केले. प्रस्थापितांनी देशाच्या तिजोरीची अक्षरशः लूट केली.सत्तेचा दुरूपयोग करून साखर कारखाने, बँका,बाजार समित्या, सूतगिरण्या, वायनेऱ्या,मोठमोठ्या खाजगी शिक्षण संस्था, अभिमत विद्यापीठं उभारून यांनी आपले अतिशय विशाल असे साम्राज्य उभे केले.लोकशाहीला तिलांजली देऊन पणजोबा, आजोबा,मुलगा,नातू,पणतू अशा श्रृंखलेत घराणेशाहीच्या तटबंदीत एक जातीय प्रस्थापितांनी सत्ता आपल्या कुटुंबात कैद करून ठेवली.

सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाच्या भ्रष्टाचाराला हवा देऊन आणि धार्मिक भावना भडकवून आरेसेस प्रणीत भाजपचे सरकार सत्तेवर आले.खरंतर कॉंग्रेसची नव्हे तर कॉंग्रेसी सरंजामदारांची सत्ता गेली असेच म्हणावे लागेल.सत्तेवीना प्रस्थापित कॉंग्रेसी नेत्यांची तगमग सुरू झाली.पाण्यातून काढल्यानंतर जशी माशाची अवस्था होते तशी प्रस्थापित कॉंग्रेस नेत्यांची झाली आहे.भाजप सरकारने यांची नाळ ओळखली. त्यातच सहकाराच्या नावाखाली सुरू असलेल्या साखर कारखाने, बँका,बाजार समित्या, सूतगिरण्या, वायनेऱ्या, मोठमोठ्या खाजगी शिक्षण संस्था, अभिमत विद्यापीठं यांच्या स्वायत्ततेवर प्रश्न चिन्ह निर्माण करून कॉंग्रेसी सरंजामदारांच्या नाळ्या आवळायला सुरुवात केली. तसे प्रस्थापित कॉंग्रेसी उंदीराप्रमाणे उड्या घेऊन एकतर सरळसरळ भाजपात गेले किंवा कॉंग्रेसमध्येच राहून काही “बिभीषणाच्या भूमिकेत ” आरेसेस भाजपाशी “संधी” केली.

भाजपाशी “संधी ” केलेल्या प्रस्थापित सरंजामदार कॉंग्रेसी नेत्यांनी गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत फार मोठी पक्ष विरोधी कामगिरी केली आहे.मोदी सरकारच्या विरोधात जनभावना असतांना देखील भाजपाशी हातमिळवणी करून आपल्याच पक्षनेत्यांच्या पाठीत खंजीर खूपसला आणि “परत दुसऱ्यांदा” भाजपाची सत्ता आणायला हातभार लावला.

निवडणुकीत प्रादेशिक पक्षांसोबत कॉंग्रेसची युती होऊ द्यायची नाही,ताकद असलेल्या प्रादेशिक पक्षांना भाजपाची “बी टिम ” ठरवून बदनाम करणे आणि स्वतःच अंडरग्राऊंड भाजप पूरक भूमिका घेणे,प्रादेशिक पक्षाचे बहुजन ओबीसी, मागासवर्गीय उमेदवार प्रबळ आणि इलेक्टीव्ह मेरीटवर असताना तो निवडून येऊ नये म्हणून आपल्या पक्षाचा उमेदवार कमजोर करून प्रसंगी भाजपाचा “स्वजातीय सवर्ण ” घराणेशाही समर्थक उमेदवार निवडून आणण्याचे काम राहुल गांधींनी ठपका ठेवलेल्या प्रस्थापित कॉंग्रेसी नेत्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी केले.

कॉंग्रेसी सरंजामदारांना ना गांधीवादाशी,तत्त्वज्ञानाशी घेणंदेणं,ना पक्षाची निष्ठा ना, ना लोकशाहीवर वा संविधानावर विश्वास.फक्त पुरोगामीत्वाचा ढोंगीपणा. इथल्या ओबीसी, आदिवासी, मुस्लिम, मागासवर्गीय जाती -जमातींचे हक्क हिरावून घेऊन आपली एक जातीय घराणेशाही आणि त्यातून आपले आर्थिक साम्राज्य अधिक मजबूत कसे राहील याचीच चिंता आहे.

युद्ध जिंकायला विश्वासू सैनिकांची गरज असते. राजकीय युद्ध सुध्दा त्याच पद्धतीने विश्वासू सहकाऱ्यांच्या भरवशावर जिंकता येते.फितूर झालेल्या सैनिकांच्या भरवशावर विजय कसा संपादन करता येईल ?महाराष्ट्रातील तर अनेक प्रस्थापित बडे बडे नेते आजच्या घडीला कॉंग्रेसला फितूर झालेले दिसत आहेत. त्यामुळे मोदींना भाजपला आरेसेसला हरवायचे असेल तर केवळ प्रादेशिक पक्षांवरच त्याची मदार अवलंबून आहे असे दिसते.