स्वच्छता अभियान – काळाची गरज , समाजासाठी आणि मनासाठी

243

गेल्या काही वर्षांपासून आपल्या देशात ‘स्वच्छता अभियान’ हा उपक्रम राबविला जात आहे आणि अगदी गांवपातळीवरपण हे अभियान तेवढ्याच उत्साहाने राबविले जाते. पहायला गेले तर किती स्तुतनिय उपक्रम आहे हा.कुठंतरी आपला देश या कारणाने पाश्चात्य देशात बदनाम आहे,ती प्रतिमा उजळण्यास नक्कीच हे अभियान आपल्याला उपयोगी पडेल. संत गाडगेबाबांनी खरंतर स्वच्छतेचा धडा फार पूर्वी दिला होता,पण कालांतराने तो धडाच आपण धुळ खात पाडला,असे म्हणायला काहीच हरकत नाही. उशिरा का होईना, पुन्हा आपण प्रत्येक जण या मोहिमेत सामिल झालो आहे आणि ना थकता हा लढा आपण जोमाने लढला तर नक्कीच देशाची प्रतिमा उजळून निघेल.
जर विचार केला तर हे अभियान म्हणजे प्रत्येक व्यक्तीसाठी एक लाजिरवाणी गोष्ट आहे, असे मला वाटते. का असे अभियान राबवावे लागले? कारण आपणच याला जबाबदार आहोत.आपल्या भागात, शहरात, देशात आपणच वेगवेगळ्या प्रकारची घाण करत असतो. आपण त्याचे तोटे विचारात घेत नाही. कचरा कोठेही टाकणे,सार्वजनिक किंवा कोणत्याही ठिकाणी थुंकणे, या सर्रासपणे चालणाऱ्या गोष्टी.आज आपण एवढे शिकून जर आपल्याला या गोष्टी शिकवायला लागतात, तर आपण देशाचा कितपत विचार करतो? एकीकडे स्वातंत्र्य दिवस आणि प्रजासत्ताक दिनादिवशी ‘भारतमाता की जय’म्हणून आपल्या भारतमातेवरचं प्रेम प्रकट करतो आणि राहिलेले दिवस मात्र मातेचा विचार न करता तिच्यावर आपण कचरा फेकतो, पिचकाऱ्या मारतो,आणि बऱ्याच प्रकारे आपण घाण करत असतो.जर आपण भारतमातेचे पुत्र म्हणून स्वतःला गर्वाने मिरवतो,तर हे आपल्याला शोभते का?कोणी आपल्या घरात ,आईच्या अंगावर अशी घाण करेल का?का आपण शिकून पण इतके घाणेरडे आहोत?
तुम्हाला जर घाणेरडापणाचा कळस पाहायचा असेल तर तुम्ही काही ठिकाणी असलेल्या मोठ्या इमारतीमध्ये जावा. तुम्हाला प्रत्येक जिने आणि कोपरे थुंकून रंगवलेले दिसतील.यात अशिक्षित लोकं किंवा ग्रामीण भागच मोडतो असे नाही. मोठ्या शहरात पण सुशिक्षित आणि सुज्ञ लोकं पण रंगकाम करण्यात मागे नाहीत. या गोष्टी किळसवाण्या नाहीत का?विचार करा,जर तुमच्या घरात कोणी येऊन एका कोपऱ्यात असे रंगकाम केले तर तुमची काय प्रतिक्रिया असेल? का सार्वजनिक ठिकाणं म्हणजे बेवारस ठिकाणं, मग तिथे काहीही केलेले चालते?का लोकांना कळत नाही की ही ठिकाणं म्हणजे पण एक आपल्या भारतमातेचं अंगच आहे ते? इतकेच नाही तर तुम्ही माणसाचा जीव वाचवण्यासाठी ज्या सरकारी इस्पितळाचा आधार घेता, आज तिथली स्वच्छता तर अतिभयानक आहे.तिथेही प्रत्येक कोपरे असेच रंगवून टाकले असतात आणि तिथलीच सार्वजनिक स्वच्छता गृह ही अस्वच्छतागृह म्हणण्याच्या लायकीची असतात.अशा ठिकाणी रुग्ण बरा व्हायच्याऐवजी दगावण्याची शक्यता जास्त.का प्रत्येक जण इतका बेजबाबदारपणे अशा ठिकाणी वागत असतो?या पुढची पायरी म्हणजे अशा इमारतीमध्ये प्रत्येक कोपऱ्यात देवाचे फोटो लावले जातात आणि आपण श्रद्धेचे पुजारी चुपचाप पाहून पुढे निघून जातो.एकीकडे श्रद्धेने देवांची पुजा करायची आणि दुसरीकडे लोकं भिंती आणि कोपरे रंगवू नये म्हणून तिथे पहारेकरी म्हणून देवांचे फोटो लावायचे.पण तरीही त्याच्या अलीकडे पलीकडे भिंती रंगलेल्याच असतात. हे सर्व आपण सुज्ञ नागरिक डोळ्यांनी पाहतो,पण आपल्या धर्माच्या भावना अशावेळी दुखावल्या जात नाहीत,इतकी तर आपल्या नसानसांत धर्म आणि देवावरील श्रद्धा ठासून भरलेली आहे.किती लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. ज्या देवांची आपण मंदिरात, देव्हाऱ्यात मनोभावे पूजा करतो,त्यांना अशा ठिकाणी लावले जाते, मग कशाला हवीत ही मंदिरं, हे देव्हारे? हा पण चुकून तेच कोणी दुसऱ्या धर्माच्या लोकांनी हे केले तर मग राजकारणासोबत प्रत्येक व्यक्ती काही काळ जागा होतो आणि मग नेहमीचेच जातीय तेढ निर्माण करणारे मेसेज लगेच कानाकोपऱ्यात पोचतात आणि पुढे काय होते हे आपण अनुभवलेले आहेच.काही काळ आपला अहंकार दुखावला जातो,आपण जागे होतो,आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या. खरंच एक माणूस किंवा देशाचा नागरिक म्हणून आपल्यासाठी किती लाजिरवाण्या गोष्टी आहेत या.खरंतर जिन्याच्या कोपऱ्यात देवाचे फोटो, ही संकल्पना आणणारे आणि खऱ्या अर्थाने वापरात आणणाऱ्यांना खरंच साष्टांग दंडवत घातले पाहिजेत.
त्यामुळे आज आपल्याला आपल्या परिसरासोबत आपली बुरसटलेली मनं पण स्वच्छ करण्याची गरज आहे. एकमेकांविरुद्ध मनं इतकी दूषित झाली आहेत आणि म्हणून माणसात दुरावे निर्माण होत आहेत. मग त्याची कित्येक कारणे आहेत, कुठे पैसा, कुठे जमीनजुमला, कुठे हेवेदावे, कुठे धर्म आणि जातपात,अशा कित्येक कारणांनी माणूस नात्यांपासून आणि माणुसकी सोडून दूर जात आहे.आज ह्या २१ व्या शतकात आपण शिकून चंद्रावर पोचलो,पण तरीही आपण राहू केतू आणि शनीच्या चक्रात आपण अडकलेलोच आहे.जिथे देवाने माणसात फरक केला नाही,तिथे मानवनिर्मित जातपात आणि धर्माने देवांना पण लाजवून सोडले आहे. आपल्या मानगुटीवर बसलेल्या या रूढी,प्रथा यांची धूळ काढून टाकून मनं स्वच्छ करण्याची गरज आहे. आज एका विषाणूने आपल्याला भंडावून सोडले आहे,मग तो येण्याआधी १३०कोटी जनतेतून एकजण ही आधी सावध करणारा का भेटला नाही? किंवा त्याला येऊ न देण्याची एखादी पुजा, शांती सांगणारा का कोणी भेटला नाही?यावरून तरी प्रत्येकाने जागे होऊन मनावरची धूळ झटकून एक माणूस म्हणून जगायला सुरुवात केली पाहिजे, तर कुठे हा स्वच्छता अभियान खऱ्या अर्थाने यशस्वी होईल. नाहीतर ह्या घाणीच्या साम्राज्यात वर्षानुवर्षे खितपत पडलोच आहे,असेच पुढे पडून रहायचे. समाजातील घाण हटवणे म्हणजे आपण मातृभूमीला स्वच्छ केल्यासारखे आहे आणि मनातील हेवेदावे,जातीपातीची घाण हटवणे म्हणजे मातृभूमीला तिच्या खऱ्या सुपुत्रांनी आदरांजली वाहिल्यासारखे आहे.
तेव्हा हे स्वच्छता अभियान फक्त समाजपुरते मर्यादित न ठेवता आपली मनं साफ करण्यासाठी पण उपयोगात आणावे. *पुढील वर्षापासून जसे अभ्यासक्रम बदलणार आहे,त्यात मुलांना स्वच्छतेचे बाळकडू लहानपणापासून देणे गरजेचे आहे. फक्त लहान मुलांनाच नाही तर शिक्षक आणि सर्व पालक यांना सुध्दा कठोर प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. तरच कुठे प्रत्येक व्यक्तीच्या अंगात स्वच्छता भिनली जाईल आणि मग खऱ्या अर्थाने आपण स्वतःला भारतमातेचे सुपुत्र आणि देवांची निर्मिती आहे असे अभिमानाने म्हणू शकतो.

✒️लेखक:-सागर संकपाळ
मो:-९६५७५६७५७५

▪️संकलन:-अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620