घरकुल लाभार्थ्यांकडून घेतलेले संस्था शुल्क रक्कम परत मिळणार -नगराध्यक्षा सुरेखा जिठ्ठावार यांची माहिती

33

🔹याबाबतचा ठराव २६ आँक्टोबर रोजीच्या विशेष सभेत मंजूर

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

बिलोली(दि.30ऑक्टोबर):-तालुक्यातील कुंडलवाडी नगरपरिषदेतील यापूर्वीच्या भाजप सत्ताधाऱ्यांच्या काळात घरकुल लाभार्थ्यांना द्यावयाच्या प्रत्येक टप्यातील २५०० रक्कम नगरपरिषदेने पंतप्रधान घरकुल आवास योजनेतील सल्लागार संस्था शुल्क म्हणून घेतलेले आहेत. लाभार्थ्यांकडून हे घेतलेली रक्कम टप्याटप्याने परत करण्यात येणार असुन नगरपरिषदेत महाविकास आघाडी सत्तेत आल्याबरोबर २६ आँक्टोबर रोजी झालेल्या विशेष सभेत हा ठराव बहुमताने मंजूर झाला आहे.

अशी माहिती नगराध्यक्षा सौ.सुरेखा नरेंद्र जिठ्ठावार यांनी दिली.
यापूर्वी च्या भाजपच्या नगराध्यक्षांना अपात्र करण्यासाठी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार अर्चना भीम पोतनकर यांनी उच्च न्यायालयात व मंत्रालयात शेवटपर्यंत लढाई लढली.पोतनकर यांनी लढाई लढली व जिंकली.त्यामुळे न.प.त सत्तापरिवर्तन झाले.त्यामुळे यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या शिवसेनेच्या उमेदवार सौ.सुरेखा जिठ्ठावार या विजयी झाल्या.

त्यानंतर २३ आँक्टोबर रोजी झालेल्या पहिल्याच सभेत १८ विषय मंजूर करून झाले. यानंतर २६ आँक्टोबर रोजी झालेल्या विशेष सभेत ही ३ ठराव मंजूर झाले. यात प्रामुख्याने पंतप्रधान घरकुल आवास योजनेत यापूर्वी च्या भाजप सत्ताधाऱ्यांच्या काळात आजपर्यंत घरकुल बांधकाम पुर्ण झालेल्या १४० घरकुल लाभार्थ्यांच्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या टप्यातील प्रत्येकी २५०० रूपये असे एका लाभार्थ्यांकडून ७५०० रूपयांची रक्कम सल्लागार संस्था शुल्क च्या नावाखाली लाभार्थ्यांना पावती देत नगरपरिषदेने घेतले.

गत महिनाभरापुर्वी सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीच्या सत्ताधाऱ्यांनी घरकुल लाभार्थ्यांकडून घेतलेले हे प्रत्येक टप्प्यातील रक्कम परत करण्यासाठी २१ आँक्टोबर रोजी सत्ताधाऱ्यांत बैठक झाली. यानंतर विषयपत्रिका तयार करून २६ आँक्टोबर रोजी झालेल्या विशेष सभेत घरकुल लाभार्थ्यांकडून घेतलेली ही रक्कम टप्याटप्याने परत करण्यासंबधी ठराव मंजूर करण्यात आला आहे. लवकरच ही रक्कम घरकुल लाभार्थ्यांना परत करण्यात येणार आहे.

तसेच या योजनेतील चौथा हफ्ता लवकरात लवकर मिळावा यासाठी केंद्र शासनाकडे पण पाठपुरावा सुरू असल्याची माहिती नगराध्यक्षा सौ.सुरेखा जिठ्ठावार यांनी दिली असुन यापुर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी घेतलेले पैसे कशासाठी व कुठे वापरले याबाबत चौकशी सुरू आहे. अशीही माहिती नगराध्यक्षा सौ.सुरेखा जिठ्ठावार यांनी दिली.

एकदंरीतच भाजप सत्ताधाऱ्यांच्या काळात सल्लागार संस्था शुल्क चे पैसे महाविकास आघाडीतील सत्ताधाऱ्यांनी लाभार्थ्यांना परत देण्याचा निर्णय घेतल्याने सत्ताधाऱ्यांचे शहरात अभिनंदन व कौतुक होत आहे. मात्र हा प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही काहीतरी प्रयत्न केले व महाविकास आघाडीच्या सत्ताधाऱ्यांनी हा प्रश्न मार्गी लावल्यानंतर भाजप सत्ताधा-यांच्या काळात चुडीचुप असलेले मात्र श्रेय घेण्यासाठी सरसावले असल्याचे चित्र दिसून येत आहे.