गळाला लागला मासा, मिडीयावर वार कसा?

30

भारतातील बहुसंख्य लोक कोणताही सारासार विचार न करता, फक्त जाती धर्माच्या नावाखाली भावनिक होऊन आणि गलिच्छ राजकारणासाठी आपल्या बुद्धीचा वापरच करत नाही असे अनेक उदाहरणावरून दिसते. समता, सत्य या गोष्टी जणु त्यांना मान्यच नसुन फक्त राजकीय वा भावनिक शक्तिच्या जोरावर अरेरावी करण्याचा प्रयत्न करत असताना दिसत आहेत. स्वतः ला शिक्षीत व समजदार समजणारे लोक आपल्या बुद्धीचा वापर करून सत्याचा स्विकार करत नाहीत आणि माणसाला माणसाची किंमत देत नाही तेव्हा मात्र त्यांच्या बुद्धीची किव कराविशी वाटते.

कोणताही विचार न करता, सत्यता पडताळून न पाहता फक्त डोळेलाऊन कोणाचेही ऐकणे आणि त्याविषयी आपले मत बनवणे हे मानसिक स्वातंत्र्याचे मुळीच लक्षण नाही. अर्णव गोस्वामीला पोलिसांनी अटक केली आणि एकाच गटातील लोकांनी ओरड निर्माण केली लोकशाहीचा चौथा स्तंभ धोक्यात आहे. ज्यांना लोकशाही मान्यच नाही असे लोक सुद्धां लोकशाही चा स्तंभ धोक्यात आहे बोलत आहेत. चौथा स्तंभ धोक्यात आहे असे म्हणणाऱ्या लोकांनी कधीच खोलवर जाऊन विचार केला नाही. अर्णव गोस्वामीला अटक केली ती पत्रकार म्हणून नाही तर आरोपी म्हणून. आरोपीची पाठराखण करणे हे कोणाचे संस्कार आहेत? अर्णव गोस्वामीला अटक केली ती इंजिनिअर नाईक यांच्या आत्महत्ये विषयी.

गोस्वामी पत्रकार आहे म्हणून नाही ही गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे. सुशांतसिंग राजपूत ची आत्महत्या होती, कोणतीही चिठ्ठी नव्हती, तरीही त्याची सीबीआय चौकशी आणि याच मिडीयाने सुशांतसिंग राजपूत यांची आत्महत्या याविषयी दिवसभर पोटतिडकिने आपल्या चँनलवर दाखवले, जर सुशांतसिंग राजपूत याची आत्महत्या कोणताही पुरावा नसताना एवढी चौकशी केली जाते, आणि मिडीया एवढे उचलून धरले जाते, मग इंजिनिअर नाईक यांनी आत्महत्या केली, तोही एक माणुसच होता, आत्महत्या केलेल्या ठिकाणी आत्महत्येचे कारण नमूद आहे.

चिठ्ठी नुसार आत्महत्येस कारणीभुत अर्णव गोस्वामी आहे. आणि म्हणून त्याला पोलिसांनी अटक केली. अर्णव गोस्वामीला वैयक्तिक आरोपाखाली अटक केली आहे. पत्रकार म्हणून किंवा पत्रकारिता करताना अर्णव गोस्वामीला अटक केली गेली नाही मग अर्णव गोस्वामी ची अटक ही पत्रकारितेशी जोडणे म्हणजे केवळ आपल्या बुद्धीचे प्रदर्शन करणे होय. संपूर्ण भारत अर्णव गोस्वामी सोबत आहे कसे मिडीया दाखवण्याणा प्रयत्न करत आहे. संपूर्ण भारत म्हणजे विशिष्ट लोक का? मी पण भारतीय आहे मी अर्णव गोस्वामी यांच्या गुन्ह्याचे समर्थन बिलकुल करत नाही.

अर्णव गोस्वामीच्या सोबत संपूर्ण भारत उभा आहे या मधळ्याखाली एक दोन लोकांच्या बाईट दिवसभर चालवणे म्हणजे भारतीय जनतेचे मत नाही. काही काही बाईट बघितल्या तर हसु सुद्धा येते. एका तरुणीने आपल्या बाईट मध्ये सांगितले होते अर्णव गोस्वामी यांनी हाथरस ची बाजु उचलून धरली म्हणून त्यांना अटक झाली आणि ही बाईट रिपब्लिकन टिव्हिनेच दाखवली आता आपण बघितले तर हाथरस च्या प्रकरणात रिपब्लिकन टिव्हीने पिडीतेची नव्हे तर आरोपीची बाजु घेऊन आरोपींना एक प्रकारे संरक्षित करण्याचा प्रयत्न केला होता.

दुसरी बाब म्हणजे हाथरस प्रकरण दाबण्याचा प्रयत्न कोणी केला हे सर्वांना माहिती आहे मग त्यात महाराष्ट्र सरकारचा काय संबंध? यावरून हा निष्कर्ष निघतो की बाईट सुद्धा ओढून ताढून घेऊन दाखवण्याचा निरागस प्रयत्न केला जात आहे. म्हणजे अर्णव गोसावी चे वैयक्तिक आरोप झाकण्यासाठी त्याचा वापर सार्वजनिक करणे सुरु आहे. अर्णव गोस्वामी यांची अटक ही मिडीमावर हल्ला आहे हे म्हणणे साफ चुकीचे असुन हा मिडीया ला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. कोणताही मिडीया हा आरोपीची पाठराखण करत नाही.

भारतात कोणत्या विषयाचे किती खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करतील यांचा अंदाजच घेता येत नाही. अर्णव गोस्वामी स्वतः ला पत्रकार समजतो आणि स्वतःच्या चँनलवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ये उद्धव सुन ले उद्धव म्हणून एकेरी व द्वेषाची भाषा करतो तेव्हा कोणालाच असे वाटले नाही का अर्णव गोस्वामी संविधानीक व्यक्तीचा अवमान करतो. गृह मंत्र्यांना सुद्धा अर्णव गोस्वामी एकेरी भाषेत बोलुन धमकी देतो हे मुळात संस्कार कोणाचे आहेत.

कोणाच्या जोरावर तो बोलला आणि तेव्हा यांना एका पत्रकाराने राज्याच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या विषयी बोलायला नको होते हे चुकिचे आहे असे कोणत्याही भक्ताने म्हणले नाही. अर्णव गोसावी मुख्यमंत्री यांचे नाव घेऊन मिडीया हाउस मध्ये बोट दाखवून उभा राहून जोरजोरात मुख्यमंत्री यांचे नाव घेऊन ओरडतो, मुख्यमंत्र्यावर ओरडणाऱ्या व्यक्तीला कोणीच काही बोलत नाही यावरून माणसिक गुलामीची आणि लाचारीची पातळी दिसून येते. गौरी लंकेश ह्या पत्रकारच होत्या त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली..

पत्रकार महीलेने निष्पक्ष पत्रकारिता केली म्हणून गोळ्या घालण्यात आल्या तेव्ह आज अर्णव च्या सोबत आहे म्हणणारे नेमके होते तरी कोठे? गौरी लंकेश पत्रकारिता करताना जिव गमवतात आणि आज अर्णव ला अटक म्हणजे मिडीयाची मुस्कटदाबी आहे म्हणणारे लोक गप्प का बसले असतील हा विषय चिंतनाचा आहे. सुप्रिम कोर्टाचे जज न्यायासाठी रस्त्यावर येऊन प्रेस कॉन्फरन्स घेतात तेव्हा सुद्धा आज गोस्वामी सोबत असलेले लोक गप्प होते याचा अर्थ काय? एकमेकाने एकमेकाचे काम करून पोळी भाजून घेऊन आपापल्या क्षेत्राला बदनाम करण्याचे षडयंत्र तर नाही.

काही लोक राजकारणात जाऊन राजकारण मलीन करत आहेत तर काही लोक मिडिया च्या नावाखाली विशिष्ट लोकांची लाचारी करत आहेत. यामुळे क्षेत्र बदनाम होत आहे. त्यामुळे अर्णव गोस्वामी यांची अटक आणि मिडीया यांचा कोणताही संबध नाही.

एका इंजिनिअर ने आत्महत्या केली आणि त्याला जबाबदार अर्णव गोस्वामी आहे असे चिठ्ठी मध्ये लिहलेले असताना अर्णव ची बाजु घेऊन बोलणे म्हणजे गुन्हेगार लोकांना संरक्षण देऊन पिडीत लोकांना न्यायापासुन दुर ठेवणे होय. सुशांतसिंग राजपूत ची आत्महत्या झाली कोणतीही चिठ्ठी नसताना एवढी चौकशी झाली मग नाईक यांच्या आत्महत्या झाल्यावर तर चिठ्ठी मध्ये आत्महत्येचे कारण नमूद असताना आरोपीची चौकशी करण्यासाठी अटक केली असेल तर यात चुकीचे काय आहे. अर्णव गोस्वामी मुळे जर कोणाची आत्महत्या झाली असेल तर त्याला शिक्षा मिळायलाच पाहिजे.

एका आरोपीला वाचवण्यासाठी एवढा खटाटोप करून सत्ता व अधिकार यांचा दुरूपयोग होत असेल तर देशातील जनतेने न्यायाची अपेक्षा नेमकी करायची तरी कोणाकडून? आणि अर्णव गोस्वामी ची मुळात निपक्ष पत्रकारिता नसुन विशिष्ट समुहाची हुजरेगिरी होती. हाथरस मधिल पिढीतेच्या आई वडीलांना भेटण्यासाठी मिडीयाला परवानगी नव्हती खऱ्या अर्थाने हाथरस ला मिडीयाची मुस्कटदाबी करून मिडीयाला काम करू दिले नाही तेव्हा रिपब्लिकन टिव्ही ने मिडीयावर हल्ला झाला असे बोललेच नाही. म्हणजे अर्णव गोस्वामी म्हणजे मिडीया आहे का? अर्णव गोस्वामी एक आरोपी म्हणून पोलीसांच्या हाती आहे.

तो दोषी असेल तर शिक्षा होईल आणि दोषी नसेल तर सुटका होईल पण एका आरोपीचा संबध मिडीयाशी जोडणे हे वैचारिक व संस्कारीक दृष्टीने पटणारे नाही म्हणून गोस्वामीला अटक केली तर मिडीयाला दाबण्याचा प्रयत्न आहे असे बोलुन लोकांची दिशाभूल करू नये. आरोपीची पाठराखण करायची कि पिडीतेला न्याय द्यायचा हा प्रामाणिकता व आपल्यावर झालेल्या संस्कार यातून ठरत असते.

✒️लेखक:-विनोद पंजाबराव सदावर्ते
रा. आरेगांव ता. मेहकर
मोबा: ९१३०९७९३००