अंधारलेल्या कोलामगुड्यावर तेवला आशेचा दिपक

84

🔸सामाजिक संघटनांचा एक स्तुत्य उपक्रम

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)मो:-९६२३८९६५७४

जिवती(दि.23नोव्हेंबर):-दिवाळी म्हटले की नवनविन कपडे अन् मिष्ठान्नाचे भोजन…! पण, जगणे महाग झालेल्या उपेक्षितांच्या वस्त्यांवरचा अंधार दिवाळीच्या प्रकाशातही गडप होऊ शकला नाही. अशा अंधारलेल्या खडकी कोलामगुड्यावर आशेचा एक दिपक उजाडण्याचा प्रयत्न काही सामाजिक संघटनांच्या पुढाकारातून करण्यात आला अन् उदासलेल्या कोलामांच्या चेह-यावर आनंदाची लकीर उमटून गेली.

जिवती तालुक्यातील खडकी, रायपूर या कोलामगुड्यांवर रविवार (दिनांक 22 नोव्हे.) ला कोलाम विकास फाऊंडेशन, पाथ फाऊंडेशन, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था आणि तनिष्का व्यासपिठ यांचे संयुक्त विद्यमाने ‘दिपोत्सव’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोलाम विकास फाऊंडेशनचे अध्यक्ष विकास कुंभारे हे उपस्थित होते.

या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून विस्तार अधिकारी नितीन जांभूळकर, बालविकास प्रकल्पाच्या पर्यवेक्षिका माया बारापात्रे, प्रमुख पाहूणे म्हणून पत्रकार बादल बेले, पर्यावरण संवर्धन संघटनेचे जिल्हा संघटक विजय जांभूळकर, तालुका अध्यक्ष संतोष देरकर, तालुका सचिव अँड. मेघा धोटे, रजनी शर्मा, क्रुतिका सोनटक्के, पुर्वा देशमुख, सुनैना तांबेकर, आशिष करमनकर, संदिप आदे, बिंदूसार गजभीये, सुषमा गजभीये, तनिष्का सदस्या सुनिता कुंभारे, नानाजी मडावी, पुजू कोडापे, मारोती सिडाम, जैतू कोडापे आदि मान्यवर उपस्थित होते.

कोलामांच्या विकासासाठी अजूनही ठोस पावले उचलण्यात शासन कुचराई करीत आहे. अनेक कोलामगुड्यांवर मुलभूत सोयी – सुविधांचा अभाव आहे. कोलामांचे जिवनस्तर उंचावण्यासाठी कोलामांनी एकजूटीने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत कोलाम विकास फाऊंडेशनचे अध्यक्ष विकास कुंभारे यांनी मांडले. यावेळी संस्थेतर्फे खडकी येथील आंगनवाडी केंद्रास स्टील आलमारी, पुस्तके भेट देण्यात आले. या कार्यक्रमाला महाराष्ट्र मराठी माध्यमिक अध्यापक संघ, सप्तरंग बहूउद्देशिय संस्था, प्रहार संघटना यांनीही सहकार्य केले.

लाँकडाऊनचा कहर सहन करतानाच वादळी वारा आणि अकाली पावसाने शेतातील पिकं उध्दवस्त झाली. अशा कठिण काळात दिवाळीसारखा सणही कोलामांच्या चेह-यावर आनंद फुलवू शकला नाही. दिवाळी आली अन् गेली. जगण्याची चिंता मात्र कायम राहीली. अचानक या सामाजिक संघटनांनी खडकी, रायपूर येथील कोलाम कुटूंबांना कपडे, ब्लँकेटस् चे वाटप अन् मिष्ठान्नाचे भोजन करवून कोलामगुड्यावर झाकोळलेला अंधार दूर करण्याचा आज प्रयत्न केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुर्वा देशमुख यांनी तर संचालन मनकरणा केंद्रे यांनी केले.