गडचिरोली शहर – हायस्कूल नसलेलं खेडं ते विद्यापीठ असलेले बनले जिल्हास्थान,

40

गडचिरोली’ हे नाव ऐकले की उर्वरित देश व महाराष्ट्रातील लोकांच्या डोळ्यासमोर फक्त ‘नक्षलवादाने ग्रासलेला एक आदिवासी अविकसित जिल्हा’ असेच चित्र डोळ्यासमोर येते आणि ते काहीसे खरेही आहे. पण खेडेवजा गाव ते वेगाने वाढलेले जिल्हा मुख्यालय असा प्रवास फक्त एकाच पिढीच्या डोळ्यांसमोर केलेले गडचिरोली नावाचे शहर मात्र यांत कुठेतरी दुर्लक्षिले जाते.

नागपूरपासून १७१ किमी अंतरावर आणि महाराष्ट्रात असूनही राजधानी मुंबई व तिथल्या मंत्रालयापासून जवळपास १००० किमी दूर असलेल्या पूर्व विदर्भाची जीवनदायिनी वैनगंगा नदीच्या पूर्व किनाऱ्यावरच्या कठाणी नदीच्या संगमापासून मैलभर अंतरावर ‘गडचिरोली’ वसले आहे. या गावाची स्थापना कशी व कधी झाली याचा निश्चित पुरावा उपलब्ध नाही. २३०० वर्षांपूर्वीच्या चाणक्याच्या ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथातसुद्धा उल्लेख असलेल्या हि-याच्या खाणी आणि हत्तीसाठी प्रसिद्ध असलेला वैरागड प्रांताचा ‘गडचिरोली’ हा एक भाग होता.

वैनगंगा नदीच्या पलीकडे असल्याने हा भाग पूर्वी दक्षिण कोसल म्हणजे छत्तीसगड च्या मौर्य, सातवाहन, वाकाटक, शरभपुरीय, सोमवंशी, कलचुरी, राष्ट्रकुट व नंतर काकतीय अश्या सत्तांच्या अधिपत्याखाली होता. या भागाच्या संपन्नतेचा व समृद्धतेचा सर्वात ठळक पुरावा म्हणजे वैनगंगा नदीकिनारी कलचुरी शासकांनी बांधलेला ‘मार्कंडा’ येथील ‘विदर्भाचा खजुराहो’ म्हणून ओळखला जाणारा वैभवशाली मंदिरसमूह होय.

अकबर बादशहाच्या ऐन-ए-अकबरी या ग्रंथात या भागात हत्ती असल्याची नोंद आहे. तमिळनाडूचे चोल, विजापूरचे आदिलशहा, देवगिरीचे यादव यांनीसुद्धा या भागावर त्यासाठीच आक्रमणे केली होती. अर्थातच हा सर्व भाग पुढे नागवंशीय माना व नंतर चांद्याच्या गोंड राज्याच्या वैरागड प्रांतामध्ये होता. डाॕ. सुरेश मिश्र आणि डाॕ. प्रभाकर गद्रे यांच्या पुस्तकातील यादीनुसार १४४७ ते १४७२ या काळात राज्य करणाऱ्या गोंड राजा सुरजा बल्लाळ शाह याच्या प्रसिद्ध अश्या ‘५२ परगण्यांच्या’ यादीत गडचिरोलीचे नाव आहे.

तेव्हा कधीतरी ‘चिरोलशहा’ नावाचा स्थानिक कारभारी याने किंवा भोसले यांनी गढी बांधली म्हणून गडचिरोली असे नाव रूढ झाले अशी दंतकथा पण ऐकायला मिळते, पण त्यास ठोस असा लिखित पुरावा नाही. महाराष्ट्राच्या ह्या अतिपूर्व भागात असलेल्या चिरोली टेकड्यांवरून गडचिरोलीला त्याचे नाव प्राप्त झाले असावे असा कयास मांडता येतो. गडचिरोली जवळच ‘रणभूमी’ नावाचे एक खेडे आहे, परंतु त्याचा संबंध कोणत्या युद्धाशी होता का हेही निश्चितपणे सांगता येत नाही.

कॅप्टन जे टी ब्लंट या इंग्रज अधिका-याकडे ओरिसा-छत्तीसगड-गोंडवाना ते दक्षिण भारत असा मार्ग रेखांकित करण्याचे काम होते. तेव्हा तो कांकेर (छत्तीसगड) येथून मुख्य नगर व बाजारपेठ असलेल्या वैरागडला येऊन, काही दिवस तेथे राहून पुढे गडचिरोली येथे २० एप्रिल १७९५ या दिवशी आला होता. तेव्हा त्यास ‘मोठ्या खेड्याचे चिरोलीगड’ असे नाव होते आणि तेथे थोडाफार व्यापार होता असा उल्लेख त्याने केला आहे.

या चिरोलीगडच्या डावीकडे बस्तरपर्यंतचा भाग खूप धोकादायक असून तिथे मनुष्यबळी देणारे अतिमागास आदिवासी राहत आहेत असेही तो म्हणतो. मीठ आणि धान्य पुरवणारे वंजारी सोडून इतर कोणीही जीवाच्या भीतीने या भागात प्रवास करत नाही असे त्याने नमूद केले आहे. पुढे १८१८ ला चंद्रपूरचा पाडाव होताना काही इंग्रजी पत्रांमध्ये मात्र ‘गडचिरोली’ असेच नाव आले आहे.

भोसले आणि ब्रिटीशकाळात चांदा जिल्ह्यातील गडचिरोली हे सध्या चामोर्शी तालुक्यात लहानसे खेडे म्हणून उरलेल्या, ऐतिहासिक ‘आमगाव महाल’ या परगण्याअंतर्गत बाजारपेठ असलेले एक गाव होते. नंतर वैरागडचे वैभव लयाला गेल्यानंतर तेथील सर्व रयत आरमोरी आणि गडचिरोली येथे स्थलांतरित झाली. १८५० नंतर इथे कापड आणि रेशीम व्यापार वाढू लागला. सभोवती जंगल असल्याने इथे सागवान, रेशीम कोश आणि लाख निर्मिती होत असे. तोपर्यंत गडचिरोली खूप दुर्गम होते आणि रस्ते जवळपास नव्हतेच.

चारही बाजूने नदी आणि नाले असल्याने पावसाळ्याचे ४ महिने गडचिरोलीचा बाह्यजगाशी संपर्क नसायचा. १८९६ आणि १८९९ च्या भीषण दुष्काळात रस्ते नसल्याने वैनगंगा नदीतून नावेने धान्य आणावे लागले होते, आणि म्हणूनच १९०० साली गडचिरोली-मुल आणि १९१३ ला वडसा रेल्वे स्थानकाला जोडण्यासाठी वडसा-आरमोरी-गडचिरोली हा मार्ग बांधण्यात आला.

तत्कालीन ब्रम्हपुरी आणि चांदा तहसिलमधून काही जमीनदारी भाग खालसा करून १९०५ साली आरमोरी (४८०२) व चामोर्शी (२४४९) यांच्यापेक्षा कमी लोकसंख्या असूनही गडचिरोली (२०७७) तहसील घोषित झाला. तेव्हा या तालुक्यात वस्तीची ९३४ आणि वस्ती उठलेली ८२ रिठ अशी तब्बल १०१६ खेडी होती! अहेरी गाव जमीनदारी असल्याने तालुक्यासाठी त्याचा विचार झाला नसावा. रुखमाजी गणेश हे रघुजी भोसले यांचे ख

ाजगी चिटणीस होते ते रघुजी यांच्या सोबतच नागपूरला आले होते. रुखमाजींना पुष्कळ गावांची मालगुजारी मिळाली होती, त्यात गडचिरोलीचासुद्धा समावेश होता. पुढे त्यांच्याच वंशातील गंगाधरराव गडचिरोलीचे मालगुजर झाले. गंगाधरराव माधवराव चिटणवीस हे त्याकाळात नागपूरचे महापौर सुद्धा होते. ब्रिटिशदरबारी त्यांचे मोठे मानाचे स्थान होते. १९०२ ला त्यांना लंडनला तत्कालीन बादशहाच्या राज्यरोहनासाठी निमंत्रित करण्यात आले होते. त्यांची तहसीलनिर्मितीमध्ये नक्की कशी व किती महत्वाची भूमिका होती त्याचा लेखाजोखा मात्र आज उपलब्ध नाही.

गडचिरोली तालुकानिर्मितीलाही जिल्ह्याप्रमाणेच विरोध झाला होता आणि कारण होते ‘पिण्याचे पाणी!’ गडचिरोली मध्ये तेव्हा फक्त केवळ दोनच पिण्यायोग्य पाण्याच्या विहिरी होत्या, उर्वरित तलावाचे आणि विहिरींचे पाणी पिण्यायोग्य नव्हते. पावसाळ्यात पाण्याने वेढलेल्या गावात उन्हाळ्यात पिण्यालासुद्धा पाणी नसायचे आणि म्हणून अधिकारी तिथे रहायला तयार होईनात. मग एक तलाव आणि काही विहिरी बांधून तो विरोध नंतर शांत केला गेला. आज गडचिरोलीमध्ये सामावलेल्या लगतच्या रामपुर तुकूम या खेड्याजवळ इंग्रज सरकारने तहसील कार्यालय, अधिकारी निवासस्थाने आणि टेनिस क्लबसुद्धा बांधले.

तेव्हा गडचिरोलीत अन्य सामान्य मोठ्या खेड्यासारख्या अरुंद गल्ल्या व कोंदट वस्ती होती. एक चतुर्थांश लोकसंख्या तेलुगु भाषिक होती आणि उर्वरित जनता मराठी आणि गोंड भाषिक होती. सभोवती मात्र प्रसन्न जंगल आणि नदीमूळे सिंचित धान व उसाची शेते होती. तोपर्यंत नागपूरचे सावकार बुटी यांच्या अधिकारात असलेली गढी किंवा गड जमीनदोस्त झालेले होते आणि पुढे त्यांच्या वंशजांनी ती जागा तुकडोजी महाराजांना दान दिल्याचे पण उल्लेख मिळतात जिथे आज गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यालय आहे.

स्वातंत्र्यलढ्यातही गडचिरोलीचे सन्माननीय योगदान आहे आणि त्याची साक्ष आज तेथे सुस्थितीत असलेले स्मारक देत आहे. अन्य तालुक्यांच्या तुलनेत येथे थोड्या उशीराने माध्यमिक शाळा (१९६२) आणि महाविद्यालय (१९७२) सुरु झाले. त्यादरम्यान देशात दुसरा सर्वात मोठा आणि महाराष्ट्रात सर्वात मोठा असलेल्या अतिविशाल आणि मागास चांदा जिल्ह्याचे विभाजन करण्याची मागणी होऊ लागली पण नेहमीप्रमाणे चालढकल होत होती. कॉंग्रेसच्या अंतर्गत राजकारणातून केवळ दीड वर्षांसाठी मुख्यमंत्री झालेल्या बॅरीस्टर अंतुले यांनी धडाक्याने राज्यात ३ नव्या जिल्ह्यांची घोषणा केली आणि आयुक्त गोपालकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. पण लवकरच ते पदावरून गेले आणि दुसरे बॅरिस्टर, बाबासाहेब भोसले फक्त वर्षभरासाठीच मुख्यमंत्री पदावर आले. पण त्या अल्पकाळातही त्यांनी आधी दिलेला शब्द राखत नवीन जिल्ह्याची घोषणा पूर्णत्वास नेली.

गडचिरोली जिल्हानिर्मितीची कथाही खूप रंजक आहे. आरमोरीचे आमदार असूनही श्री बाबुराव मडावी यांनी गडचिरोली जिल्हानिर्मितीसाठी अथक प्रयत्न केल्याने त्यांनाच या जिल्ह्याचे खरेखुरे शिल्पकार म्हणायला हरकत नाही. त्यांच्या मार्गदर्शनात गडचिरोलीचे तत्कालीन आमदार मारोतराव कोवासे, सिरोंचाचे आमदार पेंटा रामा तलांडी यांनी आणि चंद्रपूरच्या आमदार-खासदारांनी खूप प्रयत्न केले. पण ब्रम्हपुरीच्या नेत्यांनीसुद्धा कच खाल्ली नाही. काही नेत्यांनी घोट-अहेरी साठीसुद्धा प्रयत्न केले. या रस्सीखेचीतून १३ एप्रिल १९८२ या दिवशी ब्रम्हपुरी जिल्हा झाल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या, पण गडचिरोली गटाने यशस्वीपणे पुन्हा जोर लावून गडचिरोली जिल्हा स्थापन झाल्याची घोषणा करवून घेतली.

डळमळीत पदावरील मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले हे १६ ऑगस्ट १९८२ या दिवशी जिल्ह्याचे उद्घाटन करणार होते पण त्याच दिवशी त्यांना अचानक दिल्लीला धाव घ्यावी लागली आणि अधिकृत उद्घाटन २६ ऑगस्ट १९८२ ला नंदुरबार जिल्ह्याच्या नवापूरचे श्री सुरूपसिंग नाईक (समाजकल्याण आणि आदिवासी विकास मंत्री) यांच्या हस्ते उरकण्यात आले. कार्यक्रमाला २० हजार उत्साही लोकांची उपस्थिती होती. श्री रत्नाकर गायकवाड, जे नुकत्याच काही वर्षांपूर्वी राज्याचे मुख्य सचिव होते, ते गडचिरोलीचे प्रथम जिल्हाधिकारी झाले. सर्व कार्यालये वर्षभर चंद्रपूरलाच होती. पण नव्या प्रशासनाने वर्षभरात ९७ हेक्टर जागेवर ‘गडचिरोली कॉम्प्लेक्स’ हा प्रशासकीय भाग कार्यान्वित केला आणि ३० एप्रिल १९८३ पासून गडचिरोली येथून प्रशासन सुरु झाले. १०० हेक्टर जागा औद्योगिक वसाहतीसाठी राखली गेली. या सर्वात चमत्कारिक बाब म्हणजे जिल्हा मुख्यालय असलेले हे गाव १९८५ पर्यंत फक्त १०,८०० लोकसंख्या असलेली चक्क एक ग्रामपंचायत होती! हळूहळू जिल्हा कार्यालये, तंत्र निकेतन आणि शिक्षण संस्था येऊन गाव वाढू लागले आणि १ मे १९८५ ला सभोवतीची काही खेडी जोडून गडचिरोली नगर परिषद अस्तित्वात आली. पण पहिली निवडणूक व्हायला १९९१ साल उजाडले आणि श्री सुरेश पोरेड्डीवार गडचिरोली जिल्ह्याचे पहिले नगराध्यक्ष झाले.

या सर्व अविश्वसनीय छान-छान सकारात्त्मक घटना होत असतानाच दुधात मीठाचा खडा पडावा तश्या काही घटना आंध्रप्रदेशच्या सीमेवर घडत होत्या. १९७० पासूनच तेलंगाणा-आंध्र मध्ये नक्षलवाद फोफावला होता. मुंबई आणि दिल्लीतील अतिदूर असणा-या प्रशासनाचे दूर्लक्ष, मागासलेपणा, जंगल, दारिद्रय, सरकारी अत्याचार आणि तेंदूपानाची अर्थव्यवस्था यामुळे नक्षलवादासाठी या जिल्ह्यात अतिशय पोषक पार्श्वभूमी तयारच होती. शेवटी १९७९ मध्ये नक्षलवादी तरुणांनी प्राणहिता नदी ओलांडून महाराष्ट्रात प्रवेश केला. त्यात आज वृद्धावस्थेत सरकारला तुरुंगातून जमीन मागत रुग्णालयात खितपत असलेल्या एका तरुण कवीचे नावही काही कागदपत्रातून डोकावते. तिथे आधीच तैनात असलेल्या राज्य राखीव दलाची २ नोव्हेंबर १९८० या दिवशी पहिली चकमक सिरोंचा तालुक्यातील मोय्बीनपेटा या खेड्यात झाली, तेलंगाणातील बेल्लम्पल्लीचा माओवादी विचार असलेला एक युवक तिथे मारला गेला आणि तेंव्हापासून आजतागायत हा नवीन निर्माण झालेला जिल्हा या जहालवादाच्या आगीत धगधगत आहे. नक्षलवादाच्या या अघोरी शापामुळे गडचिरोली शहराला आपल्या नवीन प्रगतीचा मनमुराद आनंद कधीच घेता आला नाही. काही दिवसांआधीपर्यंत चांगले अधिकारी इथे काम करायला तयार नसत. संपूर्ण देशात गडचिरोली येथे बदली होणे म्हणजे शिक्षा भोगणे अशीच भावना निर्माण झाली होती. येथून बाहेर जाणारे विद्यार्थी चूक नसतानासुद्धा कित्येकदा संशयास्पद नजरेने पाहिले जायचे.

वडसा-गडचिरोली या रखडलेल्या रेल्वेमार्गाचा जर अभ्यास केला तर मुंबई आणि दिल्ली मागासलेपणा आणि नक्षलवाद दूर करण्याकडे किती लक्ष देते हे सहज लक्षात येते. निवडणुकीसाठी गाजत उद्घाटन करूनही गेल्या २५ वर्षात या मार्गासाठी एक कुदळसुद्धा मारण्यात आलेली नाही. नागपूर-नागभीड या मार्गाचे आता उशिरा का होईना रुंदीकरण होत आहे आणि या मार्गानेच पुढे वडसा-गडचिरोलीचा नागपूर येथून संपूर्ण देशासोबत वेगवान संपर्क येईल हे स्पष्ट आहे, पण तरीही यात अक्षम्य दिरंगाई होत आहे.

अपेक्षेप्रमाणे कारखाने व औद्योगिक विकास आला नसला तरी आज हे शहर ४० वर्षात ५ पटीने वाढून (५४००० लोकसंख्या) टुमदार शहर झाले आहे. आता इथे चांगल्या शाळा, अभियांत्रिकी पासून शेतकीपर्यंत महाविद्यालये, सरकारी रुग्णालये व प्रशस्त रस्ते झाले आहेत. इथले विद्यार्थी आता डॉक्टर, इंजिनीयर, वैज्ञानिक होऊन देशभर आणि जगात सगळीकडे आत्मविश्वासाने काम करत आहेत. समाजसेवक आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधक डॉ. अभय बंग यांनी इथला भयावह बालमृत्यूदर कमी करून दाखवत WHO आणि समस्त जगापुढे उदाहरण ठेवले आहे. त्यांच्या चमूतील डॉ. काळकोंडे सुद्धा अमेरिकेतील नोकरी सोडून खेड्यात अतिशय उच्च प्रतीचे काम आणि संशोधन करत आहेत.

डॉ. प्रकाश आमटे व डाॕ. मंदाकिनी आमटे या दाम्पत्यांनी या जिल्ह्याला आपली कर्मभूमी बनवून गडचिरोली म्हणजे फक्त जाळपोळ आणि गोळीबारच नाही हे सिद्ध केले आहे. कधीकाळी हायस्कूलसुद्धा नसलेल्या या गावात आज ‘गोंडवाना विद्यापीठ’ हे स्वतंत्र विद्यापीठ दिमाखदारपणे डौलात उभे आहे. तिथे फक्त राजकारणच न होता, उच्च प्रतीचे शिक्षण आणि संशोधन होईल अशी अपेक्षा आहे. या सर्व सकारात्मक प्रवासातून जगाला ‘गडचिरोली म्हणजे मागास’ हा पूर्वग्रह दूर करून हे शहर संपूर्ण जिल्ह्याच्या भविष्यासाठी मार्गदर्शक ठरेल अशी आशा करूया.

✒️लेखक:-डाँ.संजय चिलबुले

▪️संकलन:-संतोष संगीडवार(मो:-7588944393)