संकटांनी झोडले, जुलमींनी पोळले !

29

यंदाच्या सन २०२१ या वर्षी कोरोना महामारीने माणसांच्या नाकी दम आणले आहे. त्याचा सर्वत्र प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्याच्या आदमुसून टाकणाऱ्या विळख्यासह मृत्यूनेही आकांडतांडव मांडले आहे. कोणताही आजार हा शेवटी कोरोनाशीस सलगी साधणारा सिद्ध होऊ लागला आहे. आपल्या निकोडे परिवारावर तर संकटाच्या झुंडीवर झुंडी आल्या. भल्या भल्यांच्या अंगांगावर काटेच काटे उभे केले. आपला धाकटा भाऊ गिरीधर गोविंदा निकोडे यांचे अल्पशा आजाराने दि.३ एप्रिल २०२१ रोजी निधन झाले. अगदी त्याच दिवशी पत्नी आशाताईला कोरोनाची लक्षणे दिसून आली, म्हणून रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यामुळे भावाच्या अंत्यविधीला उपस्थित होता आले नाही. त्यानंतर अवघ्या तीनच दिवसात दि.६ एप्रिल २०२१ ला आशाताईचे निधन झाले. तद्नंतर अवघ्या तीन दिवसांत दि.९ एप्रिल २०२१ रोजी चुलते खुशाल मधाजी निकोडे हे मृत्यूमुखी पडले. सर्वच नातलग या मृत्यूच्या तांडवाने भयभीत झाले आहेत. आपल्यावरील आपदा व आर्थिक कोंडी पाहून संकटांचाही थरकाप उडाला असेल, हे नक्कीच!

एवढ्या सगळ्या घडामोडींच्या पूर्वीपासूनच कुटुंबाची आर्थिकबाजूही लंगडी झालेली आहे. आपण जुलै २०२० पासून स्वेच्छानिवृत्ती घेतली. मात्र आजपावेतो एकंदर १० महिने लोटूनही निवृत्तीवेतन सुरू झाले नाही. मिळणाऱ्या कोणत्याच आर्थिक लाभांशाचा एक पैसाही प्रत्यक्षात डोळ्याने किंवा स्वप्नातही पाहिला नाही. या निवृत्तीवेतन व लाभांशसंबंधाने फेब्रुवारी २०२१ पर्यंत पंचायत समितीचे मा.सभापती, मा.संवर्गविकास अधिकारी, मा.गटशिक्षणाधिकारी तर जिल्हा परिषदेचे मा.मुख्यकार्यकारी अधिकारी, मा.उपमुख्य कार्यकारी अधिकारी, प्राथमिक शिक्षण विभागाचे मा.शिक्षणाधिकारी आदी सर्वांच्या भेटी कुटुंबासमवेत घेऊन आर्थिक अडचण मांडली. पेन्शन अदालतमध्ये कैफियती मांडल्या. आता एप्रिल २०२१ मध्ये कोणतेतरी एक देयक पास झाल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र तेवढा निधी शासनाने मंजूर केलेला नाही. म्हणून तो लाभांश आपल्या बँक खात्यात जमा होऊ शकलेला नाही, असे पंचायत समिती प्रशासन स्पष्ट करत आहे. आणखी किती दिवस ताटकळत राहावे लागेल? याचा नेम नाही. शासन कर्मचाऱ्यांच्या पगाराचा निधी मंजूर करतो कारण त्यांना जीवंत बायकापोरे आहेत. आपली बायकोपोरे मृतवत आहेत, आपल्याला पोट नावाची वस्तू नाही की काय? यावर आपण हसावे कि रडावे? असे झाले आहे.

मागील वर्षात खुप प्रयत्न केला, मात्र मुलगी प्रियंका हीचे लग्न काही केल्या जुळले नाही. यंदा स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि लगेच योग्य स्थळ चालून आले. अशाही विनावेतनाच्या तंगातंगीत शुभमुहूर्त म्हणून १६ फेब्रुवारी २०२१ ही लग्नाची तारीख निश्चित करण्यात आली होती. तोवर आपला भविष्य निर्वाह निधी वगैरे लाभांश हाती पडेल या आशेवर! तेव्हाही लग्नपत्रिका जोडून लाभांश त्वरीत मिळण्याची विनंती प्रशासनास केली होती. परंतु त्याचा परिणाम शून्यच पडला निर्दयी प्रशासनावर! परत लग्नतारीख एक महिन्याने पुढे ढकलली. कारण हातात एक कवडीही नव्हती. ती लग्नतारीख पुढे १६ मार्च २०२१ पक्की केली. तेव्हाही लग्नपत्रिका जोडून लाभांश संबंधाने प्रयत्न चालू ठेवले होते. लग्न कोणत्याही परिस्थितीत या तारखेस पार पाडलेच पाहिजे म्हणून नातलगांकडून उसणवार गोळा करून आर्थिक बाजू बळकट केली आणि मुलीचे लग्नकार्य सुखरुप पार पाडले. मात्र उसणवार परतफेड करणे व दैनंदिन गरजा भागविणे आज फार कठीण झाले अाहे.

खावे काय? नि द्यावे काय? अशा द्विधा मनस्थितीत आपले जीवन जगणे चालू आहे. आपली कीव प्रशासन जाणत नाही. आज याचेच मनाला दुःख अधिक होत आहे. पत्नी आशाताईसुद्धा याच आर्थिक विवंचनेने व चिंतेने अधिक खचली होती. आर्थिक तंगातंगीत जीवन व्यतीत करणे हे मरणापेक्षाही वाईट व क्लेषदायी असते. अशा परिस्थितीत जगतांना अनेकानेक संकटाचा निधड्या छातीने सामना करावा लागतो, हे तीने अनुभवले होते. कोरानाचे कारण घडून तीला मृत्यू आला, हे तीच्या दृष्टीने अगदी योग्य झाले असावे, असे सर्वांना वाटू लागले आहे. एका कवीवर्याने म्हटल्याप्रमाणे –

“सरणावर जाताना, नुकतेच मला कळले होते !
मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते !!”

मृत्यूमुळे तीची या जीवनसंघर्षातून सुटका ह ऊन ती आता सुखी झाली आहे. दुर्भागी आपण आज खरोखर आर्थिक अडचणींचे जुलमी प्रशासनाने दिलेले चटके सोसतच आहे. या काळात उपासमारीचा बळी न ठरता कोरोनाने मृत्यू आलेलाच बरा राहिल असे वाटू लागले आहे!..

✒️लेखक:-श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी.
मु. रामनगर वॉर्ड नं.२०, गडचिरोली.पो. ता. जि. गडचिरोली, व्हा.नं. ९४२३७१४८८३.