दुग्धजन्य पदार्थात असलेल्या जीवाणूंचा वापर कोविड नियंत्रणासाठी शक्य

31

🔸कोरोनाच्या संभाव्य उपयासाठी आमचे संशोधन फक्त एक पाऊल मागे डॉ. प्रकाश एम. हलामी.

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.15मे ) :- भारतात कोरोना ची दुसरी लाट सुरू असून मागील काही महिन्यांपासून कोरोना ने गंभीर रूप धारण केले आहे. आतापर्यंत जवळपास अडीच लाख लोकांचा बळी गेलेला आहे. तसेच अनेकांनी तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली आहे. या गंभीर परिस्थितीचा सामना भारत मागील एक वर्षापासून करीत आहे. देशात लोकसंख्येच्या प्रमाणात सोयीसुविधा बऱ्याच अपुऱ्या आहेत तर दुसरीकडे या गंभीर परिस्थितीत आरोग्य विभागात काळाबाजार होत असताना दिसून येत आहे आणि त्यामुळे सरकारला तारेवरची कसरत करावी लागत आहे.लसीकरणाची सुध्धा देशात प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे पण परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी बराच अवधी लागू शकतो. लसीकरण मोहिमेचा वेग वाढविणे गरजेचं आहे.

सद्या कोविड उपचारासाठी बऱ्याच औषधींचा वापर होत असून, त्यांचे दुष्परिणाम पण काही प्रमाणात होत आहेत. आणि त्यांचा साठा अपुरा असल्याने ते सर्वसामान्यांना परवडणारे नाही. यालाच एक पर्याय म्हणून कोविड साठी डॉ.प्रकाश हलामी , मुख्य शास्त्रज्ञ आणि विभाग प्रमुख, सी एस आय आर-सी एफ टी आर आय म्हैसूर आणि त्यांचे सहयोगी यांचे एक संशोधन सुरू आहे. असे डॉ. हलामी यांनी मंदसौर विद्यापीठ मंदसौर येथील आनलाईन व्याख्यानात बोलताना सांगितले. ते त्यांच्या संशोधनाविषयी समोर सांगतात की, ते एका तंत्रज्ञानाचा विकास करीत असून ज्यामधे दुग्धजन्य पदार्थात असलेल्या जीवाणूंचा वापर करून कोरोना नियंत्रित करू शकतो. म्हणजेच bifidobacteria (लहानपणीच आईच्या दुधापासून मिळणारे घटक, रोगप्रतिकरकशक्ती वाढण्यास मदत करतात. )

(Lactobacillus probiotics) यांचा वापर आपण कोविड साठी पूरक उपचार म्हणून करू शकतो. तसेच या जीवाणूंचा उपयोग gut-lung axis या माध्यमातून कोविड ला प्रतिबंधित करू शकतात असे त्यांचे म्हणणे आहे.हे पदार्थ सर्वसामान्यांना सहज परवडणारे असून ते सहज उपलब्ध होऊ शकतात आणि यामुळे आपण आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवू शकतो.

या तंत्रज्ञानावर कार्य सुरू असून कोविड च्या रुग्णावर चाचणी केल्यानंतर लवकरच उपलब्ध होईल, अशी आशा डॉ. प्रकाश हलामी यांनी व्यक्त केली आहे. या व्याख्यानात वेगवेगळ्या विद्यापीठातील प्राध्यापक संशोधक , वैज्ञानिक व विद्यार्थी यांनी भाग घेतला होता. त्यांनी उपस्थित केलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे सविस्तर पणे डॉ. हलामी यांनी दिले. या आनलाईन व्याख्यानाचे संचालन मंदसौर विद्यापीठातील जीवशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. आशीष वरघने यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. शेखर जैन यांनी व्यक्त केले.