250 बँक मित्र आणि सखीच्या माध्यमातून ग्रामीण भागात बँक आपल्या दारी- 850 गावांतील नागरिकांना मिळणार सेवा

29
✒️इकबाल पैलवान(वर्धा,जिल्हा प्रतिनिधी)

वर्धा(दि.17मे):- कडक संचार बंदीच्या काळात बँकेचे प्रशासकीय काम सुरू आहे मात्र बँका ग्राहकांसाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत. अशातच निराधार योजना आणि प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. कोरोना काळात नागरिकांना पैशाची गरज लक्षात घेता ग्रामीण भागात जिल्ह्यातील सर्व बँकांनी बँक मित्राच्या माध्यमातून ‘बँक आपल्या दारी’ सेवा सुरू करून 850 गावांमधील गावकऱ्यांना दिलासा देण्याचे काम करीत आहे.
जिल्ह्यात रुग्ण संख्या कमी करण्यासाठी 8 मे पासून कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

यामुळे बँकेतही ग्राहकसेवा बंद आहे. शहरी भागात अडचणीच्यावेळी नागरिकांना एटीएम द्वारे पैसे काढण्याची व्यवस्था आहे. मात्र ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या खात्यातील पैसे काढण्यासाठी बँकेतच जावे लागते. संचार बंदीमुळे आता बँक बंद असल्याने बँकांनी ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच बँक सेवा देण्याचा निर्णय घेऊन ग्रामीण जनतेला दिलासा दिला आहे. श्रावण बाळ, संजय , वृद्धापकाळ योजनेच्या लाभार्थ्यांना पैशाची गरज भागविण्यासाठी बँकेचे बँक मित्र ग्रामीण भागात डोअर टू डोअर सेवा देत आहेत. यामुळे वृद्ध, दिव्यांग आणि निराधार नागरिकांना यामुळे पैसे काढणे शक्य झाले आहे.
यासाठी जिल्ह्यातील सर्व बँकेचे 250 बँक मित्र व सखी यांनी गावात योग्य सामाजिक अंतर ठेऊन ग्रामपंचायतच्या सहकार्याने लोकांना घरी व ग्रामपंचायतमध्ये सुद्धा बँक सेवा देत आहेत. शेतकऱ्यांना सुद्धा प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील त्यांच्या बँक खात्यात जमा झालेले पैसे गावातच काढता येतील. चौकट या बँक मित्रांना बँक शाखा वाटून दिल्या आहेत. जिल्ह्यात ग्रामीण भागात 110 बँक शाखा आहेत. तर शहरी भागात 49. बँक मित्रांना स्वापिंग मशीन आणि लॅपटॉप दिले आहेत. आधार क्रमांक आणि अंगठ्याच्या ठशाचा वापर करून संबंधित लाभार्थ्यांचे व्यवहार करतात.
वैभव लहाने लीड बँक मॅनेजर850 गावांना मिळतोय लाभ
एका बँक मित्राकडे किमान 4 गावे दिली आहेत. तो आळीपाळीने त्याच्याकडे असलेल्या गावांमध्ये सेवा देते. या 250 बँक मित्रामुळे जिल्ह्यातील 850 गावातील नागरीकांची संबंधित बँक शाखेतील कामे गावातच होत आहे. रोजगार कोरोनामुळे अनेकांच्या रोजगारावर गदा आली असताना ग्रामीण भागातील या बँक मित्रांना मात्र यामुळे रोजगार मिळाला आहे. गावातील व्यवहारावर वेतन ठरत असले तरी या काळात बँक मित्र किमान महिन्याला 4 ते 5 हजार रुपये कमवून कुटुंबाला आधार देण्याचे कामही करत आहे.