वृक्षो रक्षति रक्षित

19

मित्रहो, आज वरील सुभाषितावर सखोल मंथन करून आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी आपल्याला कृतिशील बनावे लागणार आहे. पर्यावरणातील सर्वात प्रमुख घटक म्हणजे झाडे. झाडांच्या विपुलतेवर पर्यावरणाचा समतोल राखला जातो. पर्यावरणाच्या संतुलनासाठी निसर्गातील सर्व सजीव आपापल्यापरीने सृष्टीला अन्नाच्या बदल्यात काही ना काही परत करत असतात. ज्यामुळे निसर्गचक्र सुरळीत चालण्यासाठी मदत होते. केवळ माणूस हा एकमेव असा प्राणी आहे जो निसर्गाकडून सतत खूप काही ओरबाडून घेण्यातच दंग आहे. आणि निसर्गाला परत देण्यासाठी मात्र तो कृतघ्न असतो. माणसाने सतत निसर्गाची हानी करण्याचा चंग बांधला आहे. सुरुवातीच्या काळात माणूस इतर पशु पक्षांप्रमाणे निसर्गाशी नाळ जुळवून होता. पण हळूहळू त्याच्या बुद्धी चातुर्याच्या जोरावर त्याने इतरांपेक्षा आपले वेगळे स्थान निर्माण केले. आधुनिक जगात तर माणसाने निसर्गाला अनेक आव्हाने दिली.

विघातक कृत्यांच्या माध्यमातून निसर्गाला हानी पोचवण्यात आपला मोठेपणा मानला. विकासाच्या नावावर मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल केली गेली. कारखान्यांसाठी, शेतीसाठी, रस्त्यांसाठी अक्षरश: जंगले साफ केली गेली. याचा परिणाम आपल्या वातावरणातील बदलांमधून आपणांस दिसतच आहे. माणसाने या ना त्या कारणाने मोठ्या प्रमाणात जंगलतोड केली आणि त्याचे दुष्परिणाम आता आपण भोगायला सुरुवात झालेली आहे. जंगले नष्ट झाल्यामुळे वन्यजीव धोक्यात आले. याचा विपरीत परिणाम असा झाला की, मानवी वस्तीकडे वन्यजीवांनी आपला मोर्चा वळवला व एकंदरीत मानवी जीवनच धोक्यात आले. वन्य प्राण्यांमध्ये माकडांसारखे प्राणी शेतकऱ्यांच्या शेतात येऊन पिकांचे नुकसान करताना दिसत आहेत. शेतकरी या प्राण्यांचा बंदोबस्त करण्यात असफल झाले. व त्या चिंतेतून शेतकऱ्यांनी त्यांच्या वाडवडिलांनी शेताच्या बांधावर लावलेली विविध फळांची व उपयोगी झाडे तोडायला सुरुवात केली.

यामुळे मोठ्या प्रमाणात जंगलाचा ऱ्हास होताना दिसून येत आहे. लाकूड तोडणाऱ्या मजुरांकडे अत्याधुनिक यांत्रिक कटर आल्याने या कामात मोठ्या प्रमाणात वने नष्ट होताना आढळून येतात. शासनाने कुऱ्हाडबंदी केली पण कटर बंदी कधी होणार ?
मोठमोठे महामार्ग बनवण्याच्या नादात शेकडो वर्षापासून सर्वांना मोफत प्राणवायू देणारी वटवृक्षे उखडून फेकण्यात आली. विविध सोयी-सुविधा च्या नावावर पर्यावरणाचे संतुलन बिघडवण्यास मानवी कृती कारणीभूत आहेत. याचा परिणाम निसर्ग चक्रावर होऊन पावसाचे प्रमाण अनिश्चित झाले आहे, नद्या आटत आहेत, पाण्याची भूगर्भातील पातळी पाचशे ते हजार फुटापर्यंत खालावलेली आहे, ऋतुमानानुसार हवेतील बदल प्रकर्षाने जाणवत आहेत. मागील काही वर्षापासून हवेतील कार्बन डाय ऑक्साईड चे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दिल्लीसारख्या शहरात हवेच्या प्रदूषणाने अनेक लोक श्वसनाच्या आजारांना बळी पडलेले आहेत. विविध भौतिक सोयी-सुविधांच्या वाढत्या वापरामुळे, वाहनांच्या गर्दीमुळे, रासायनिक कारखान्यामुळे हवेत मोठ्या प्रमाणात विषारी वायू वाढत आहे. आणि त्याला नियंत्रणात ठेवणारा निसर्गातील एकमेव घटक झाडे मात्र मोठ्या प्रमाणात नष्ट होत आहेत. याचे परिणाम खूपच भयंकर होणार हे निश्चित.

कोरोनासारखे श्वसनाशी संबंधित आजार आपले डोके वर काढत आहेत. नुकत्याच आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागले.प्राणवायु विना अनेक जीव गेले. अनेक ठिकाणी ऑक्सीजन निर्मितीचे प्रकल्प उभारावे लागले. याचे स्पष्ट कारण हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण खालावलेले आहे. अशी स्थिती जर पुढेही राहिली तर प्रत्येकाला ऑक्सीजन सिलेंडर पाठीवर घेऊन फिरावे लागेल. त्यामुळे सर्वांनी वेळीच सावध होण्याची नितांत गरज आहे. आज आपण जो प्राणवायू घेत आहोत तो आपल्या पूर्वजांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे म्हणजे त्यांनी निसर्गाशी जुळवून घेऊन मोठ्या प्रमाणात फळा-फुलांची झाडे मोठमोठी झाडे घर, अंगण, शेत, परस बाग, पडीत जमिनीवर, रस्त्यांच्या दुतर्फा,मंदिरांसभोवती मोठ्या प्रमाणात प्राणवायू देणारी झाडे लावली यामध्ये वड, पिंपळ, आंबा,कडूनिंब या झाडांची लागवड केली आणि आपण त्यांच्या माघारी त्यांनी लावलेली झाडे तोडण्यावर भर देत आहोत. हे कुठेतरी थांबले पाहिजे!

सर्व संत महात्म्यांनी झाडांचे आपल्या जीवनातील महत्त्व वेगवेगळ्या अभंगातून स्पष्ट केले आहे. तसेच छत्रपती शिवरायांनी सुद्धा वृक्षांचे महत्त्व जाणून अनेक अध्यादेश काढले होते .पृथ्वीवर माणसांप्रमाणे सर्व सजीवांना राहण्याचा, वाढण्याचा, नवनिर्माणाचा अधिकार सृष्टीने दिलेला आहे. त्यावर माणूस कुरघोडी करू पाहत आहे आणि त्याचे विपरीत परिणाम दिसत आहेत.आपण वृक्ष लागवडीची व संवर्धनाची जबाबदारी सरकारवर सोडून चालणार नाही. आपल्याला आपल्या परीने वृक्ष लागवड व संवर्धन यासाठी काही करता येईल का ? याचा विचार केला पाहिजे. आपण आपल्या घरासमोर, शेताच्या बांधावर नव्याने झाडे लावून त्यांचे संवर्धन करू शकतो. आपले वाढदिवस किंवा कुटुंबातील व्यक्तींचे वाढदिवस वृक्ष लावून साजरे करू शकतो. विविध सेवाभावी संस्थांना आर्थिक मदतीच्या माध्यमातून वृक्ष लागवड व संवर्धनात खारीचा वाटा उचलू शकतो. विविध कार्यक्रमाच्या वेळी पाहुण्यांना भेट म्हणून फळांची रोपे देऊन निसर्ग आणि आप्त नातेवाईक दोघांचाही मान आपणास राखता येतो.आजचे बालक उद्याचे भावी नागरिक आहेत. तेव्हा बालवयातच शालेय जीवनात मुलांना वृक्ष लागवडीचे व संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले पाहिजे.

मुलांच्या माध्यमातून विविध वनस्पतींच्या बियांचा संग्रह करून छोटेखानी रोपवाटिका तयार करता येऊ शकते. व त्या रोपांची चांगली वाढ झाल्यानंतर आजूबाजूच्या परिसरात त्याची लागवड करू शकतो. वृक्ष लागवड व संवर्धन ही लोक चळवळ झाली पाहिजे. या पृथ्वीवर जगणाऱ्या प्रत्येक माणसाने स्वतःच्या व आपल्या भावी पिढीच्या भविष्यासाठी वृक्ष लागवड व संवर्धन केले पाहिजे. शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या वृक्ष लागवडीसाठी चालना दिली पाहिजे. चंदन,आंबा, चिकू, संत्री, मोसंबी, सागवान, लिंबू, चिंच, आवळा, सीताफळ, बोर यासारख्या फळझाडांची फळबाग शेतकऱ्यांनी लावावी यासाठी मोठ्या प्रमाणात अनुदान उपलब्ध होणे आवश्यक आहे. आपले भविष्य आरोग्यदायी व सुखी राहावे असे जर आपणांस वाटत असेल तर, आत्ताच वृक्ष लागवडी च्या व संवर्धनाच्या मोहिमेत सामील व्हा. विविध सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून हे काम हाती घ्या. आपला आठवड्यातील किमान एक तास तरी निसर्गासाठी द्या. तरच आपले भविष्य आरोग्यदायी असेल.

” चला जोडुया निसर्गाशी नाळ, निसर्ग करेल आपला सांभाळ.”

✒️लेखक:-जगदिश सु. जाधव ( प्रा.शिक्षक तथा सदस्य वसुंधरा सेवाभावी संस्था,पुसद)