पाहिला श्रीकृष्ण भगवंत : देखियल्या देवा दंडवत !

32

[भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त]

महाभारतातील कुरुक्षेत्रावर दोन्ही योद्ध्यांचे सैन्य सन्मुख उभे ठाकले. ऐनवेळी धनुर्धर अर्जून मात्र मायेच्या मोहपाशात गुरफटून माघार घेऊ इच्छित होता. तत्क्षणी परमात्मा भगवान श्रीकृष्णाने सारथ्य सोडून त्यास ब्रह्मज्ञानाचे डोस पाजले. त्याच्या पुढे एका क्षणात आपले निर्गुण, निरंकार, शाश्वत व अजरामर रुपात प्रकटले. ते रुप पाहण्याची त्यास ज्ञानदृष्टीही प्रदान केली. तेव्हा अर्जूनाने ते भव्यदिव्य विराट रुपाचे दर्शन घेऊन ते कायम डोळ्यात साठवून घेतले होते. येथे या अशाच आत्मप्रचिती साक्षात्काराचा उहापोह..!

संत महापुरुषांनी देव अर्थात परमपिता परमात्म्यास आपण पाहिल्याची प्रचिती छाती ठोकपणे सांगितलेली आहे. देवभोळी माणसे देव आपसूकच भेटला पाहिजे म्हणून आपल्या मताने मनमती वापरून भक्ती करतांना दिसतात. संत सज्जनांनी दाखविलेल्या मार्गावर चालून भक्ती सुसफल होऊ शकते. मात्र आपण उच्चविद्याविभूषित व अनेकानेक आध्यात्मिक ग्रंथाचे पठणपाठण केले असल्याने आपल्याला हमखास भक्ती करता येतेच, या भ्रमात ते वावरतात. आपल्याला सद्गुरूची गरजच काय? या आविर्भावात राहून कर्मकांड व पूजापाठाचा मनमतीने श्रीगणेशा करतात. म्हणून सांगावेसे वाटते-

“तुझ्या माझ्या अंगसंग!
उभा असे रे ठाकला!!
गुरू चरणांचा रंग!
भाळी लावता दिसला!!
दाही दिशी संचरला!
मनी दास आनंदला!!
पाही तयां ठाई ठाई!
कृष्णदास उतराई!!”

अशी मनमर्जीची भक्ती फलद्रुप होत नाही, हे शास्त्रांनीच गर्जून सांगितले आहे. सद्गुरूच्या निस्सीम कृपेने ईश्वरप्राप्ती होते, या संतवचनावर अजिबात विश्वास नसतो की काय? हेच कळत नाही. असे तर त्या संतश्रेष्ठांना पूज्य व वंदनीय म्हणताना आढळतात. म्हणजेच संतांच्या रुपांना अर्थात नश्वर देहांना भजतात, पुजतात. मात्र संतांच्या वचनांना अर्थात ईश्वर- अभंग संतोक्तींना फेटाळून लावले जाते. मग याहून दुर्बुद्धी ती कोणती असू शकेल? संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकारामजी महाराज सांगतात-

“जेथे जातो तेथे तू माझा सांगाती।
चालवीशी हाती धरोनिया।।”

बाल्यावस्थेपासूनच दासाला अध्यात्म ज्ञानाविषयीचे आकर्षण होते. आधी आपण हरिकथा, पुराण, कीर्तन, भजन व पूजन आदी ईश्वरभक्तीची साधने जवळून ऐकली, वाचली, न्याहाळली आणि मनोमन समजून घेतली. त्यानंतर आपण देवदर्शी म्हणजेच ब्रह्मनिष्ठ सद्गुरूचा शोध घेत राहिलो. अनेक मंत्र-तंत्रगुरूंना पारखल्यानंतर दासाला मनोवांच्छीत सद्गुरू मिळाला, तो म्हणजेच निरंकारी बाबा युगदृष्टा सद्गुरू हरदेवसिंहजी महाराज! महाभारतातील त्या विराट रुपदर्शन भागात अर्जुनांनी म्हटल्याप्रमाणे दासानेसुद्धा डोळ्याची पापणी लवते न लवते त्या परमेश्वर, अभंग, निरंकार, निराकार परमात्म्याला सद्गुरू बाबाजींनी दोन्ही हातात पकडून दाखविले. तो साजिरा गोजिरा देवाजीचा मुखडा आपण प्रथमच पाहिला. तेव्हापासून तो हा विठ्ठल परब्रह्म दासाच्या अंगसंग वावरू लागला आहे. ती खरेच माझ्या भक्तवत्सल सद्गुरूरायाची अगाध किमया! याबद्दल दास आजन्म त्यांचा ऋणी राहिल, ही काळ्या दगडावरची रेघ समजा! निरंकारी संतकवी लक्ष्मणजी महात्मांनी म्हटले-

“आता न उरली कशाची खंत।
सबाह्य अंगसंग पाहिला अनंत।।
खेळ खिलाडी हा भगवान।
लीला जाणे पालनहार।।”

आपण केलेला सद्गुरू खरा किं खोटा? हे दुसरे कोणी गळा फाडून सांगण्याची गरज नसते. ते आपण स्वतः कसोटी लावून पडताळू शकतो. त्यांना अनुभव, अनुभूती किंवा प्रचिती असेही म्हटले जाते. त्या तीन कसोट्या- १) शास्त्रप्रचिती, २) गुरुप्रचिती व ३) आत्मप्रचिती अशा आहेत. येथे दास उहापोह करत आहे तो आत्मप्रचितीचा म्हणजेच आत्मानुभूतीचा होय. एकदा ईश्वरदर्शन झाले की तो आपली साथ सोडत नाही. दास तर त्याला सदासर्वकाळ आपल्या अंगसंग असल्याचे नेहमीच बघत आहे. आपण त्याला सर्व स्थळी, सर्व काळी व सर्व परिस्थितीत आळविले पाहिजे अर्थात सद्गुरूचे गुणगान केले पाहिजे. ग्रंथकार संतशिरोमणी अवतारसिंहजी महाराज आनंदीत होऊन त्यास अरदास करतात-

“अंगसंग तुझको देखके,
अवतार करे अरदास।
तू राजा अधिराज हैं,
मैं दासन का दास।।
इक तू हि निरंकार।।२।।”

खरी ईश्वरभक्ती अशी नव्हेच की केवळ नेमक्या स्थळी, नेमक्या वेळी वा नेमक्याच परिस्थितीतच करावी. सर्वसामान्य भक्तांचा असा गैरसमज असतो की शुभ व अशुभमुळे भक्ती प्रभावित होते. असे मुळीच होत नाही. श्रावण मास, कार्तिक मास, सोमवार, गुरूवार, शनिवार, पौर्णिमा आदी भक्तीस योग्य व बाकी अयोग्य मानले जावून भक्ती ही खंडाखंडपणे केली जाते. देवभक्ती अखंडपणे केली जावी, असा संतांचा अट्टाहास आहे. कारण संतोक्ती स्पष्ट करते-

“जडली संताचिया भेटी।
पूर्व पुण्य आले गाठी।।
‘पुंडलिका’ पाहुनी स्मरी।
अंगसंग हा श्रीहरी।।”

तो हा परमेश्वर प्रभू परमात्मा निरंकार दासाच्या सदैव अंगसंग असतो. आपण खातो, पितो, बसतो, जातो, झोपतो आदी समयी अंगसंगच असतो. तर सकाळी दास तोंड धुतलेला नसतो, अंघोळ केलेला नसतो, मलमुत्रादी विसर्जन आदी गोष्टी ज्यांना लोक घाणेरड्या व अपवित्र मानतात त्या करत असतानाही तो हा आपला देव अंगसंग असतोच. मग आपण त्याचे गुणगान, नामस्मरण, जप वा ध्यान का बरे करणार नाही? आपण ते तर श्वासांगणिक करतच आहे. संतवचन साक्षी आहे-

“मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश।
माझ्याकडे देव माझा पहात आहे।।”

हिलाच अखंड ईश्वरभक्ती म्हणतात. मग सुमिरणास निषिद्ध असा कोणता बरं काळ-वेळ असू शकेल? कोणताही नाही. अशा आत्मानुभूतीचा कवडसा खरोखरच देव आपल्या अंगसंग वास करीत असल्याची साक्ष देतो. म्हणून देखल्या देवा दंडवत घालत सदोदित सुमिरणात तल्लीन राहण्यास बजावतो.. जय श्रीकृष्ण, तू हि निरंकारऽऽऽ…!

!!पुरोगामी संदेश परिवारातर्फे भक्तांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !!

✒️संत चरणरज:-श्रीकृष्णदास निरंकारी (बापू)द्वरा- प. पू.गुरूदेव हरदेव कृपानिवास,मु. रामनगर वॉर्ड नं.२०, गडचिरोली.पो. ता. जि. गडचिरोली.मोबा- ९४२३७१४८८३.
इमेल- Krishnadas.nirankari@gmail.com