निवडणुकीपूर्वी मतदारांना हरकती व नोंदणीसाठी अखेरची संधी : उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ

29

🔸मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.2ऑक्टोबर):-आगामी होणा-या सार्वत्रिक, पोटनिवडणुक, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदेच्या मतदार यादीमध्ये आपले नाव आहे किंवा नाही याची खात्री करण्याकरिता तसेच नावात दुरुस्ती, मय्यत, दुबार, कायमस्वरूप स्थलांतरित मतदारांना वगळणे, हरकती स्वीकारणे तसेच नूतन मतदार नोंदणी करण्याकरिता मतदार यादीचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम २०२२ जाहीर झाला आहे. भारत निवडणुक आयोगाकडून १ ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत हरकती व दावे स्वीकारण्यात येणार आहे. ज्यांचे वय १ जानेवारी २०२२ रोजी १८ वर्ष पूर्ण होत आहे. त्यांचे नाव मतदार यादीत समविष्ट करण्यात येणार आहे. अशा नागरिकांनी फाँर्म ६ भरून द्यावा असे आवाहन ७४ चिमूर विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांनी केले आहे.

या कार्यक्रम अंतर्गत दिनांक १ नोव्हेंबर २०२१ रोजी ७४ चिमूर विधानसभा मतदार संघातील ३१२ मतदार केंद्रावर तसेच तहसील कार्यालय, पंचायत समिती चिमूर, नागभीड, ब्रम्हपुरी येथे प्रारूप यादी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. १ ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत हरकती व दावे स्वीकारण्यात येणार आहे. त्यानंतर 5 जानेवारी २०२२ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे.

या मोहिमेमध्ये मतदार यादी अचूक आणि निर्दोष होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. फाँर्म आँनलाईन पद्धतीने भरण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल. मतदार यादीत नवीन मतदारांनी नावे समाविष्ठ करणे अथवा नोंदीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज करण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांनी केले आहे.