नियोजन हवेच

34

ज्याचे नियोजन असते त्याच्या कार्यात कितीही संकटे आली तरी ध्येयापासून परावृत्त होत नाही . छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनचरित्र नियोजनाचे उत्तम उदाहरण आहे . काय बनायचे , हे त्यांच्या जन्माआधीच नियोजित होते . मरण सोडता शिवरायांनी कोणतेही पाऊल विना नियोजनाने उचलले नाही . त्यामुळे त्यांना अपयशाला सामोरे जावे लागले नाही . दूरदृष्टी असल्याने , दूरदर्शी विचार करून दोन पावले मागे आले . पण ध्येय ढळू दिले नाही . एकदा आपले ठरले की , काय बनायचं . काय करायचं . मग आवश्यक कृतीचे नियोजन नसेल तर वादळात घिरट्या घालणारे तुकडे वावटळीत गोल गोल फिरून जमिनीवर आदळतेच . नियोजित ध्येयाला अडवण्याची ताकत कोणत्याच संकटात नाही . एखादे स्वप्न उराशी बाडगले तर नियोजनबद्ध साकार करता येते . ते स्वप्न उगड्या डोळ्यांनी बघितलेले असावे . झोपेतली स्वप्ने म्हणजे मृगजळ ।
छत्रपती शिवाजी महाराजांकडे स्वराजाचे नियोजन होते . विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडे अस्पृश्यता निवारण व समाज उद्धारासाठी नियोजन होते . ते त्यासाठी झटले आणि यशस्वी झाले .

आमच्याकडे काय करावे , याचेच व्यवस्थापन नसल्याने मनातल्या उर्मी मनातच विरून जातात . मनात आले की , मला हे करायचे आहे . असे बनायचे आहे . त्यासाठी आवश्यक शक्यशक्यता पडताळून व्यवस्थापन करता आले , त्याने यशापर्यंत मजल मारलेली आहे . यश अनपेक्षित कधीच चालून येत नाही . स्वतःची वाट तयार करावी लागते . छत्रपती शिवाजी महाराजांनी अनपेक्षितपणे कोणत्याच लढाईत उडी टाकली नाही . प्रत्येक मोहिमा या नियोजनाच्या कसोटीवर घासून निघालेल्या किस्साचा यशस्वी परिपाक आहे . मनात आणले आणि पदरात पडले . असे कधीच घडत नाही . कृतीचा आराखडा आपल्याजवळ असावाच लागतो . कृतीला पूरक साधनसामग्री व मनुष्यबळ व्यवस्थापनाच्या मूलभूत अंगात येतात . त्याची जुळवाजुळव ज्याला करता आली , तो यशसागरात तरुन गेला . नाहीतर नाकातोंडात पाणी जाऊन गटांगळ्या खाल्याशिवाय पर्याय नाही .

उद्देश चांगला असेल आणि नियोजन नसेल , तर ‘वेडा महंमद’ झाल्याशिवाय राहणार नाही . ध्येय गाठण्यासाठी वेडा होऊन वाहून घ्यावं लागते . हे खरं असले तरी , व्यवस्थपनाशिवाय वेडेपणा करणे मूर्खपणाचे लक्षण ठरते . जीवनाला सुसूत्रता आणण्याची प्रत्येकात धडपड असते . ही धडपड अस्ताव्यस्त असावी की नीटनेटकी हे मात्र आपल्या हातात असते . पावसात भिजावे लागू नये म्हणून आपण उन्हाळ्यात कामाला लागतो . ध्येयाचेही तसेच आहे . मला साध्य करायचे आहे . मग साऱ्या तपशीलवार इत्यंभूत कार्यवाही करता आल्याच पाहिजे . डोंगर चढायचे असेल तर पायथ्यापासून शिखरापर्यंतच्या साऱ्या संकटांना सामना करण्याचे व्यवस्थापन माझ्याजवळ अपरिहार्य आहे . घनदाट अरण्यात घुसायचे तर श्वापदांना हुसकावून लावण्याचे तंत्र अवगत करावेच लागेल . मार्गक्रमण करताना खचखडग्यांचा अंदाज पाहिजे . काट्यांची कल्पना घेऊन पाय ठेचाळले तरी मलमपट्टीचा पर्याय रक्तबंबाळ करणार नाही .

नियोजनाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे . नदीला आलेला पूर हाहाकार माजवून जातो . पण त्याच नदीवर धरण बांधून वळवलेले पाणी हिरवळ फुलवते , तहान भागवते . उध्वस्त करायचं की नंदनवन फुलवायचे आपल्या हातात असते . नियोजनाअभावी कोरोनाकाळात सारीकडे तारांबळ उडाली होती . श्रीमंत असो की गरीब प्रत्येकाच्या जीवनात नियोजनाशिवाय पर्याय नाही . आम्ही खूप ठरवतो ; मला हे करायचं आहे , मी ते करिन , मला हवंच . पण काही करताना , मिळवताना ; कस करायचं ? कसे मिळेल ? याबद्दल कोणता विचार केला आहे . जीवनात अशक्य काहीच नाही . करण्याची , मिळवण्याची जी कला आहे , ती आधी आत्मसात केली पाहिजे . मला खूप वाटते . पण वाटण्याला अर्थ नसून तिथपर्यंत पोहोचण्याला महत्व आहे . हे महत्व नियोजनाच्या गर्भातून जन्म घेत असते . व्यवस्थापनाचा ज्याला विसर पडला , त्याच्या स्वप्नांची धुळमाती झाल्याशिवाय राहणार नाही .

पशु , पक्षी , किडे , मुंग्या यांच्या व्यवस्थापनाचे उदाहरण बुद्धिमान मानवाला दिले जातात . जगाच्या पाठीवर ज्यांनी ज्यांनी नियोजन केला , त्यांनी त्यांनी इतिहास घडविला . जपान देशात जन्मतःच प्रत्येक बालकांचे नियोजन ठरलेले असते . त्यामुळे त्यांना अपयशाचे पोवाडे गाण्यात वेळ नसते . नवीन नवीन आविष्काराचे धनी फुकटच बनत नाहीत . एक विशिष्ट दिशा असली की कृतीला वेग येते . ‘बिनभरवशाची म्हैस प्रत्येकवेळी गाभण राहत नाही .’ तूप पदरात पाडून घ्यायचे असेल तर दुधाला आवश्यक त्या प्रक्रियेतून जावेच लागेल . अन्यथा दूध नासल्याशिवाय राहणार नाही . नियोजन हे यशासाठी सुसंगत व्यवस्थापन . नियोजन व्यवस्थित असेल तरच यश पायाशी लोटांगण घालते . ‘अग अग म्हशी मला कुठं नेशी’ वाले लोक चिखलात रुतून बसतात . तर ज्याला योग्य वाट धरता आली त्याचा रथ चिखल पार करून यशाचे क्षितिज गाठत आलेला आहे . मानवी मन चंचल आहे . त्याला योग्य साच्यात बांधता आले तर यशाच्या कित्येक इमारती तयार होतील . त्यासाठी कोणती सामग्री कशी वापरायची याचे व्यस्थापन करता येणे गरजेचे आहे . उत्तम नियोजनाच्या पायव्यावरच यशाचा कळस उभा असतो .

✒️लक्ष्मण खोब्रागडे(जुनासुर्ला,ता.मूल,जि.चंद्रपूर)मो:-९८३४९०३५५१