रोख स्वरूपात भरलेल्या आयकर रकमेची अफरातफर

55

🔸चिमुर पंचायत समितीमधील शिक्षण विभागातील प्रकार

🔹पुरोगामी शिक्षक समिती चिमुरच्या शिष्टमंडळ भेटीदरम्यान खुलासा

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमुर(दि.14डिसेंबर):-पंचायत समिती चिमुर अंतर्गत कार्यरत शिक्षकांचे आर्थिक वर्ष २०२०- २०२१ चे कार्यालयाने आयकर रक्कम माहे फेब्रुवारी पेड मार्चचे वेतनातून कपात करण्यात आली. जास्तीची आयकर रक्कम शिक्षकांनी प्रत्यक्ष लेखा विभागात जमा कराव्या अशा सुचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे चिमुर पंचायत समिती अंतर्गत सुचना मिळालेल्या शिक्षकांनी जास्तीची आयकर रक्कम लेखा विभागात जमा करून रितसर पावती देखील घेतली. परंतु सदर रोख स्वरूपातील रक्कम आयकर विभागाला जमा करण्यात आली नसल्याचा प्रकार नुकताच माहितीच्या अधिकारात उघडकीस आला. या प्रकाराने पंचायत समिती चिमूरमध्ये खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक समितीने वारंवार याबाबत चौकशी करण्याकरिता पत्रव्यवहार केला. परंतु कार्यालयामार्फत उडवा-उडवीचे उत्तरे मिळत होती. शेवटी माहितीच्या अधिकारात माहिती मागवून प्रकरणाची स्थिती जाणून घेण्यात आली. कार्यालयाने शिक्षकांकडून जमा केलेली रक्कम शिक्षकांना परतही केली नाही आणि आयकर विभागाला जमा देखील केली नाही. त्यामुळे या रकमेची अफरातफर झाली असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. ही रक्कम कुणाजवळ आहे, अशी रोख रक्कम कशी स्वीकारली, आजपर्यंत याबाबत अधिका-यांना काहीच माहिती कशी नाही, असल्यास मौन का बाळगण्यात आले असे प्रश्न शिक्षक विचारीत आहेत.

सदर प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी. अन्यथा संघटना पोलीसात गुन्हा दाखल करून आंदोलन उभारेल अशाप्रकारचे पत्र संघटनेने जिल्हा परिषद चंद्रपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पंचायत समिती चिमुरचे संवर्ग विकास अधिकारी यांना दिले आहे. आयकर उशिरा इ फिलिंग केल्यास आयकर विभागाचा शिक्षकांवर दंड बसल्यास ती जबाबदारी पंचायत समिती चिमूर कार्यालयाची असेल. दंडाची रक्कम लेखा विभाग व संवर्ग विकास अधिकारी यांचेकडून वसूल करण्यात यावी असे निवेदन महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक समिती शाखा चिमूर यांनी दिले.

निवेदन सादर करताना संघटनेचे नरेंद्र मुंगले, रवी वरखेडे, गोविंद गोहणे, गोवर्धन ढोक, सलीम तुरके, जनार्धन केदार, प्रदीप गौरकार, मुरलीधर नन्नावरे, शेंडे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
———————————————-
एफआयआर दाखल करण्यास परवानगी द्या!
मार्च महिन्यात पंचायत समिती कार्यालयाने कपात केलेला आयकर डिसेंबर महिना लागला तरी शिक्षकांच्या पॅन नंबर वर दिसत नाही. कार्यालयाला वारंवार संघटनेने मागणी करून देखील आयकर १६ नंबर फार्म शिक्षकांना दिल्या गेले नाही. त्यामुळे आयकर रकमेबाबत अफरातफर झाल्याचा संशय संघटनेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक समिती तालुका शाखा चिमूर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र लिहून लेखा विभाग व संवर्ग विकास अधिकारी चिमूर यांचे विरुद्ध पोलिसात एफआयआर दाखल करण्यास परवानगी मागितली आहे.