स्त्रियांना ‘ट्रॉली’ म्हणून किती दिवस वागवणार…?

27

सध्या उसाचा गळप चालू आहे. ऊस शेतातून कारखान्यात न्यायाला अवजड वाहने वाहतुकीसाठी लागतात. आम्ही लहान असताना, ट्रकचा वापर त्यासाठी व्हायचा; पुढे ट्रक जाऊन ट्रॅक्टर्स आले. जे मुख्यतः शेतीच्या कामासाठी उपयोगात आणले जाऊ लागले. ट्रक व ट्रॅक्टर्समध्ये एक फरक आहे, ट्रकच्या ‘हेडला’ म्हणजे पुढील मुख्य भागाला ट्रेलर एकजीव जोडलेले असते, जणू ते स्वतःहून कार्य करत असावे. ट्रॅक्टर्सला हेड व ट्रॉली वेगळी केलेली पण जोडलेली असते. जिचे काम हेड जाईल तिकडे जाणे असते. मग, ऊस वाहतुकीसाठी एका हेडच्या मागे एक,दोन किंवा कुठे तीन ट्रॉल्याही जोडल्या जातात. त्या सर्व ट्रॉल्या हेड जिकडे नेईल तिकडे धावतात.

मुळात इतके मी आपल्याला का सांगतोय? लेखाच्या शिर्षकात ‘ते’ नाव आहे म्हणून; आणि त्याचा दुसऱ्या कर्त्याशी काहीतरी संबंध येतो म्हणून. ज्या गोष्टी एका लेख स्वरूपात समजावून सांगता येतात, त्या केवळ एका ओळीत समजावून सांगता येत नाहीत, समजत नाही. काही दिवसांपूर्वी असा प्रयत्न मी केला होता; पण स्त्रियांना ‘ट्रॉली’ म्हणून कसे काय दुय्यम समजू शकता? योग्य शब्द वापरा! स्त्रियांचा सन्मान करा! म्हणता-म्हणता माझ्या बायकोलाही स्त्रियांचा सन्मान करणारे ‘ट्रॉली’ म्हणून गेले. मला वाटले स्त्रियांविषयी असे आदर करणारे खूप आहेत. त्यांना त्यांचा आदर कोणता आणि अनादर कोणता? हे समजावून सांगावे लागेल, हे मनाशी पक्के केले. त्यामुळे ह्यांना नाहीतर दुसऱ्यांना, स्त्रियांची समाजातील भूमिका काय असायला हवी आणि काय आहे, हे लिहून सांगू म्हटले. चार ओळींवर बिनडोकी प्रतिक्रिया देणाऱ्यांपेक्षा 1000 शब्दांचा लेख वाचून फोन करून चार शिव्या देणारे वाचक परवडले. निदान त्यांनी मत व्यक्त करायला आणि मी लिहायला गडबड तर केली नाही, म्हणून मनाचे समाधान तर होईल. पटणे न पटणे, हे ज्याचे-त्याचे मत! पण, पटवून देणे हे माझे काम. असो!

नम्रता व विनम्रता मध्ये जितका फरक आहे तितका स्त्रियांना सन्मान देणे, आणि आम्ही सन्मान देतो! हे सांगणे यात आहे. स्त्री जन्माचे कौतुक होत आहे; हे मी समजू शकतो. त्याची कारणे जे असतील ती असतील! पण, ज्यांचा खूप दिवसांपूर्वीच जन्म झाला आहे, ज्या जन्मलेल्या घरी नसून सासरी नवऱ्यांकडे आहेत, त्यांचा असा एकदम होत असलेला सन्मान संशयास्पद आहे. एखाद्याची जिंदगी जाते डोक्यावरचे पांढरे केस दाखवून, त्यावर आता काळा रंग लावून उपयोग होत नाही. कारण तुम्ही म्हातारे झालेले सर्वांनी आधीच पाहिलेले आहे. त्यामुळे अचानक लावलेला रंग उगाच विचार करायला लावतो. म्हणजे, लग्न झाले तसे बाईने झाडझुड पासून धुणे, भांडी ते लेकरांची शी काढली आणि आता तिचा सन्मान म्हणून बँकेत खाते निघत आहे. हो! सुरुवात मस्त आहे. तिला स्वतःचे आर्थिक व्यवहार शिकवले जात आहेत. जे स्वागतार्ह आहे. पण, माझ्या बायकोचे स्वतःचे बँकेत खाते आहे म्हणायचे आणि तेवढ्यानेच तिला प्रतिष्ठा प्राप्त झाली म्हणणे हे अगदीच बरोबर नाही.

वरील बाब आणखी तपशिलात सांगतो. खाते तिचे काढले, पण नन्तर हातोळतोय कोण? नवराच न! 100% म्हणत नाही मी, आणि 80% ही नाही! पण 50% तर आहेच. हेच का ते स्त्रियांना अपेक्षित असलेले 50% आरक्षण. बायकोचे खाते काढले, पासबुक- चेकबुक -ए.टी.एम. व त्याचे पिनही नवऱ्याजवळच. बाळाचा हट्ट पुरवावा तसा तिचा हट्ट पुरवला इतकेच!

ती शिकलेली नाही. हे एक मस्त कारण दिले जाते. तर तो अकाउंट हाताळणारा किती शिकलेला आहे? हे पण पहा! बँकेत व्यवहार, सही पाहिले की होतात; यात काही शंकाच नाही. पण, चेकबुक कधी काढायचे, खात्यात पैसे जमा व खर्च किती करायचे? हे सर्व तिचा नवरा म्हणजे पुरुषच ठरवतो. बायकोचे खाते त्यानेच काढले; पण स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी. असतील ते स्वार्थ, जे असतील ते! मला त्यात पडायचे नाही.

हाच झाला तो हेड व ट्रॉलीचा प्रकार. नवरा बायकोचे संयुक्त खाते असेल तर ट्रकचा प्रकार व तिचे स्वतंत्र असले तर ट्रॅकटर्सचा प्रकार. कारण संयुक्त खाते नवरोबाला चालवायला पण बायकोची सही लागते.

ट्रॉलीला ओढतात व ढकलतात; ढकलणारा व ओढणारा ठरवतो तिला कुठे न्यायचे ते. ट्रॉली, हेड म्हणेल तिकडे धावते. अर्थात विज्ञानाच्या भाषेत दोघेही इथे निर्जीव आहेत; आणि विज्ञातील ज्या तंत्रज्ञानाने जे इंजिन जोडले,ते त्या ट्रॅक्टर्सला सजीवासारखेच धावायला सांगते; ते फक्त हेडला आहे; म्हणून ट्रॉलीची मजबुरी समजू शकतो. पण, आमची स्त्री जिती-जागती सजीव आहे. तिला मन,मेंदू,ह्रदय सगळेच आहे. सोबत संवेदना पण आहेत. पुरुषाला जीवशास्त्राने जे दिले ते सर्व तिच्यापाशी आहे. फक्त नर-मादी फरक सोडला तर, आणि हा फरक पुरुषाला पण लागू होतोच. इंजिनच्या जागी मेंदू दोघांनाही आहे. तिथे स्त्रियांना ट्रॉलीची वागणूक पुरुष देत असेल तर विज्ञानात माणूस हुशार नाही तर पुरुष हुशार आहे, असाच अर्थ निघेल. कारण माणूस तर स्त्रीही आहे; आणि तिचा मेंदू आपल्या मेंदूवर चालवणे म्हणजे घरात सगळ्या दालनात विजेचे बोर्ड लावले पण कंट्रोल एका एम.सी.बी.वर ठेवले,तसेच काही! म्हणजे मीटर एक व सबमिटर अनेक.

समजतेय न? मी काय म्हणतोय ते. स्त्रीला ट्रॉली व्हावे लागले म्हणजे तिच्यात क्षमता नाही म्हणून का? तर तसे अजिबात नाही. तिच्यात क्षमता व सहनक्षमता पुरुषांहून कैक पटीने अधिक आहे. पण, मेंदूपेक्षा शरीराने बलाढ्य असणाऱ्या पुरुषाला ती खपवून घ्यायची कुठे आहे! ‘शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ’, ही म्हण जगात 50% असणाऱ्या स्त्रियांना लागू होऊ द्यायची नाही; म्हणजे ती म्हण अर्धी फोलच म्हणावी लागेल.

मुख्यतः या स्त्रीयांना सन्मान देतो म्हणणारे त्यांचे नवरेच असतात; आणि अपमानही जास्त तेच करतात. जसे जन्मभर मालकीण म्हणून तिला मिरवायचे आणि तिच्याकडून काही चूक झाली किंवा दोघांत भांडण झाले तर मालक मी आहे म्हणून मोकळे व्हायचे; आणि पुन्हा काम पडले की ती पुन्हा मालकीण. म्हणजे हा हेड म्हणेल तेव्हा ट्रॉलीला वळवणार. स्त्रियांची संख्या 50% आहे; म्हणून बरेच राजकीय पक्ष त्यांच्या जाहीरनाम्यात महिला सशक्तीकरणाचा समावेश करतात. मग त्यांचा हेतू काही का असेना! पण जिथे या 50% मधील 90% स्त्रिया नवऱ्याला विचारून मतदान करत असतील नाहीतर नवराच त्यांना सांगत असेल किंबहुना बजावत असेल,की ‘अमुकला मतदान कर’,वैगरे. तिथे या हेडची मानसिकता बदलण्याची वेळ आली आहे. नाहीतर ट्रॉली ही ट्रॉली नसून स्वतंत्र हेड आहे, हे त्या दोघांनाही सांगाण्याची गरज आहे.

बँकिंग क्षेत्रातील हे मी सर्वसामान्य उदाहरण सांगितले. जे गैरलागू नाही, आणि सर्वत्र लागूही नाही. जिथे नोकरी लागलेली स्त्री, नवऱ्याला विचारून स्कुटी घेते. तिला कळत नाही का? तो तिने नवऱ्याला दिलेला सन्मान असतो. तिथे तिला किंवा आपल्या स्वतः ला(पुरुषाला) मोबाईल घ्यायचे म्हटले तर, ‘तुला काय समजते!’ म्हणून आपण आपला बेसूर आळवतो.

त्या नोकरीवाल्या स्त्रीला आपण स्वतःच्या पायावर उभी राहिली असे म्हणतो. तिने तिच्या प्रत्येक निर्णयात आपल्या नवऱ्याला विचारायला काही हरकत नाही. कारण तिचा तो नवरा, तिचा जीवनसाथी-मित्र आहे. पण, तिच्या पगारावर कर्ज काढून तिची टू व्हीलर खरेदी करायची आणि तिचे जमा पैसे याच्या ऐशोआरामासाठी वापरायचे हे शहाणपणा पुरुषांनी स्त्रियांना शिकवावे इतक्या त्या वेंधळत नक्कीच नाहीत.

मी असे अजिबात म्हणत नाही, की प्रत्येक स्त्रीची अशीच स्थिती आहे. बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच माझ्या मित्रांच्या घरी अगदी मनमोकळे किंबहुना स्त्री म्हणेल तसे गोड वातावरण आहे. त्यांचे ते कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे. पण, जिथे त्यांचा सन्मान होत नाही तिथे दुर्लक्षून कसे चालेल!

मोलमजुरीवर रोजाने जाणाऱ्या बाईची अवस्था तर फारच वाईट आहे. दिवसभर काम हिने करायचे, आणि पैसे मालकाला द्या म्हणायचे. चुकीचे नाही का हे? मालकाला समानार्थी शब्द ‘नवरा’ असेल तर ठीक! पण इथे तो मालकच वाटतो; जो कामावरील नोकराचा असतो.

ज्या स्त्रियांच्या नावे प्लॉट आहे, त्यांनी तो पाहण्यापूर्वीच मालकाने विकला आणि ही मी प्लॉट घेतला म्हणून गावभर गलबला करून मोकळी झाली. शेती ज्या स्त्रियांच्या नावावर झाली तिने न कधी पेरा पाहिला की दुष्काळ निधी की पिकांचा पैशात आलेला हंगाम. तिला मोठेपणा आहे, ते मी या शेताची मालकीण म्हणून! मग, त्यासाठी ती जन्मभर धुरे खिसत का बसेना.

कित्येक गावात स्त्री सरपंच आहे, पण नाव मालकाचेच. ती काय तर सहीपुरती म्हणे. पं.स.सदस्य ते जि.प.सदस्य यांची काही वेगळी अवस्था नाही. तिथे ग्रा.पं.सदस्या किती स्त्रिया येतात अन जातात, ते तर नवरेही नोंद घेतात की नाही, कोणास ठाऊक!

जे म्हणतात न आम्ही बायकोला मोबाईल वापरू देतो, तिच्या आवडी जोपासतो. फार मोठे जगावेगळे काम नाही हे. करा! कोण नको म्हणते. तिला वांग्याची भाजी खायची होती म्हणून केली असेल तर तुमचीही ती आवड होती. पण, तिला कधीच न आवडलेली टोमॅटो चटणी तिने आयुष्यभर केली; ते फक्त तुमच्या आवडीपायी. आम्ही कधी ते विचारले नाही की जाणले नाही. पण बाळाची शी धुवायची वेळ येते, तेव्हा जर ओरडून तिला बोलावत असाल तर तिचा तो मातृत्वाचा अधिकार नसून, ‘तू स्त्री आहेस’, हेच सांगणे असते. तिला भलेमोठे बँकेचे खाते नको पण तुमच्याच खात्याचे कधी ए.टी.एम. तिला परस्पर वापरू द्या, तिच्यावर विश्वास ठेवा! तो खऱ्या अर्थाने तिचा सन्मान होईल आणि नवरा म्हणून तीही तुमचा आदर करेल.

मला खरंच अभिमान वाटतो त्या खेड्यातल्या पुरुषांचा जे बायकांना गावातील महिला बचत गट चालवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देतात. तिला मोकळ्या हवेत जगण्याचे सामर्थ्य देतात. आणि लाज वाटते त्यांची जे स्त्रियांचे नाव वापरून स्वतःचे हेतू साध्य करतात.

स्त्रीत्व जपण्यासाठी अगोदर मन जपावे लागेल, आणि मन जपले की स्त्री सशक्तीकरणाच्या सगळ्या संज्ञा फिकट दिसतील इतकी ती मोठी होईल.

शेवटी, एक ठणकावून सांगतो, ‘स्त्री ही ट्रॉली नसून, हेड आहे!’

तू रणरागिणी आहेस

गरज नाही दुर्गाच व्हायची

वाघाला तू झुकवू शकते

पुरुष तिथे चाल काय देणार तुला

परंपरा उघडून पहा आपल्या संस्कृतीच्या

स्त्री सदैवच घरची मालकीण आहे.

✒️लेखक:-अमोल चंद्रशेखर भारती(नांदेड)मो:-8806721206