“घरा – घरात घडावी जिजाऊ”

34

“स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ जयंती निमित्य विनम्र अभिवादन”

धन्य ती जिजाऊ / तिचे उपकार /
कसे फिटणार / सांग माते//

आज आपल्या महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात घरा घरात जिजाऊ जन्माला यावी, असे सर्वांना वाटते. हल्लीच्या काळात ‘वीर शिवाजी’ ही मालिका टेलिव्हिजन वर पाहून काही महिला प्रेरित होतांना दिसतात. खास करून जेव्हा जिजाऊ आऊसाहेब आपल्या मुलाला म्हणजे शिवबाराजे यांना ज्ञान, कौशल्य, शस्त्र चालविणे व आपल्या प्रजेचे रक्षण करतांना शिकवितात तेव्हा घरातल्या महिलांचे चेहरे पाहण्यासारखे असतात, जणु त्या भुमिका मध्ये त्या स्वत:ला पाहतात… पण हे भाव त्यांच्या चेहऱ्यावर मालिका बघतांनाच येतात. बाकी वेळेला कुठे जातात ह्या घरातल्या माता?जिजाऊंचे कौशल्य, विचार फक्त पुस्तकात, मोबाईल व टेलिव्हिजन पुरतेच मर्यादीत आहेत का ? का महिलांना वाटत नाही की आपल्या पोटी देखिल एक वीर जन्माला यावा ? कारण यांना एकीकडचे दुसरीकडे आणि दुसरीकडून तिसरीकडे करण्यापासून वेळच नसतो!बऱ्याच ठिकाणी काही पाट्यावर लिहिलेल्या ओळी असतात “राजे तुम्ही पुन्हा जन्माला या” राजे घरा घरात जन्माला येतील त्या आधी तशी शिकवण व संस्कार देणारी आऊ जिजाऊ घरात असायला हवी , तरचं राजे पुन्हा जन्माला येतील. इथे आमच्या तमाम मातांना पार्टी , शॉपिंग मॉल , वाढदिवस सेलिब्रेशन , सिनेमाघर आणि टेलिव्हिजनच्या मालिकांपासून सुटका भेटत नाही.

तर मुलांना संस्कार देणारी माता कुठे पाहायला मिळणार ? आजच्या पिढीतल्या मातांना आपला मुलगा काय करतोय, कुठे जातोय, कुणासोबत फिरतो, कुठं बसलेला आहे हे सुद्धा माहित नसते. आहो हे सोडा, साधा लहान मोठ्यांचा सन्मान कसे करावे हे देखिल बऱ्याच जणांना माहित नसते आणि विचारतात कसे…”कुठे नेवुन ठेवलाय महाराष्ट्र?” याला जबाबदार कोण आहे ? “बिज तैसे फळ” हे बोलणे वांगावे ठरणार नाही आजच्या युगाला!जर जिजाऊ घडवायची असेलच तर मुलांना चांगल्या वाईट गोष्टीची मग तो मुलगा असो वा मुलगी यांना लहान असल्यापासून शिकवणी द्यावी लागेल, मुलांवर प्रत्येक संस्कार करावे लागतील, अनेक थोर विचारवंतांच्या गोष्टी सांगाव्या लागतात. ज्ञान, कौशल्य हे काही जन्मताच मिळत नाही तर ते द्यावे आणि घ्यावे लागत असते असा विचार करणे खरंच खूप गरजेचे आहे.आपण फक्त इतिहास वाचला पण घडवण्याचे सामर्थ्य आपल्या अंगी घेतलेच नाही कारण आम्हाला ह्या गोष्टी शिकायला वायफळ कामातून वेळचं मिळत नाही.

इतिहास वाचा ओ सर्व महिलांनो…. ज्यांनी स्वराज्य उभं करण्यासाठी उभं आयुष्य दावणीला बांधले होते, महाराष्ट्रातील एकही स्त्री अशिक्षीत राहू नये म्हणून आई सावित्री फुले झटल्या होत्या, माझ्या भारताला सर्व हक्क मिळावे असे म्हणणारे डॉ. भिमराव आंबेडकर, समाजाची सुधारणा व्हावी म्हणून झटणारे जोतिबा फुले, बहुजन समाजाच्या उन्नतीकरीता झटणारे छत्रपती राजर्षी शाहू महाराज, राजा मोहनरॉय, दयानंद सरस्वती, राजा सयाजीराव गायकवाड अशा थोर महात्मांचा इतिहास वाचा. तरच पुन्हा घडतील शिवबा तसेच या सर्वांचा व खास करूनराजमाता जिजाऊ आऊसाहेबांचा नुसतेच आदर्श वाचू नका तर त्याचे आचारण पण करा तरच खऱ्या अर्थाने घरा-घरात जिजाऊ घडतील व त्यांच्या पोटी शिवबा जन्माला येतील!

“एक पाऊल , समाज घडविण्याकडे!”
साहित्यिक : शब्दशृंगार , तू फक्त माझीच

✒️विशाल पाटील वेरूळकर(मो:-9307829542)